अधिकस्य अधिकं फलम्...

    24-Apr-2024
Total Views |
 
महायुती

महाराष्ट्रात सध्या राजकीय पक्षांची गर्दी वाढलेली दिसत असली, तरी त्यात भाजपच्या मित्रपक्षांचीच संख्या अधिक आहे. या राजकीय वास्तवाचा लाभ कशा प्रकारे उठवायचा, त्याचे अचूक आकलन हे भाजपला, त्यातही देवेंद्र फडणवीस यांना झाल्याचे दिसून येते. आहे त्या परिस्थितीत पक्षाला आणि आपल्या आघाडीला सर्वाधिक लाभ कसा होईल, हे फडणवीसांनी लवकर ओळखले असून, त्याचे प्रतिबिंब दि. ४ जून रोजीच्या निकालात पडलेले दिसेल.
 
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे चित्र काहीसे अस्पष्ट दिसत असले, तरी त्यात ठळक रंग हा भाजपचाच आहे. राज्यात प्रथमच चार ते पाच प्रमुख पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढवीत असल्याने, आगामी निकालांचा अंदाज बांधणे काहीसे अवघड बनले आहे. पण, या गुंतागुंतीच्या परिस्थितीचे स्पष्ट आकलन झालेला एकमेव नेता म्हणजे भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होत. अलीकडेच त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत राज्यातील भाजप आघाडीतील वाढलेल्या मित्रपक्षांचे समर्थन करताना, या गोष्टी राजकीय वास्तव म्हणून आणि व्यापक धोरणाचा भाग म्हणून कशा स्वीकाराव्या लागतात, ते त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मुलाखतीमुळे राज्यातील भाजपचे डावपेच आणि त्यांचे राजकीय आडाखे काय आहेत, त्याची काहीशी कल्पना येते.
 
महाराष्ट्रात ‘युती’ हा शब्द भाजप आणि शिवसेना या पक्षांच्या आघाडीसाठी वापरला जातो, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या युतीला ‘आघाडी’ म्हटले जाते. पूर्वी शिवसेना एकसंध असताना भाजप आणि शिवसेना हेच प्रमुख पक्ष या युतीत होते. गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याने भाजप आणि सेना यांच्या युतीचे रुपांतर आता ‘महायुती’त झाले. त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही प्रवेश झाला. इतक्या सगळ्या पक्षांची मोट भाजपने कशी आणि का बांधली? त्यामुळे भाजपमधील नेत्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी पडले आहे का? तसेच त्याचा फडणवीस यांच्या नेतृत्वावर परिणाम झाला आहे का, यांसारखे अनेक प्रश्न राज्यातील मतदारांच्या मनात उभे राहिले होते. पक्षा-पक्षांच्या जंजाळात नेमके सत्य काय आहे आणि या मित्रपक्षांच्या मांदियाळीचा नेमका अर्थ फडणवीस यांनी या मुलाखतीत समजावून सांगितला आहे.
 
उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक सत्तालालसेने शिवसेना पक्ष फुटला आणि त्याचा प्रमुख भाग हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकवटला. शिवसेनेची हिंदुत्वाची आणि मराठी माणसाची विचारधारा शिंदे यांच्याकडे चालत आली. परिणामी, ते पुन्हा भाजपशी जोडले जाणे अपरिहार्यच होते. शिंदे यांचा गट हाच मूळ शिवसेना पक्ष आहे, यावर न्यायालयात शिक्कामोर्तब झाले असून उद्धव ठाकरे यांची सेना हा फुटीर गट झाला आहे. तिच बाब राष्ट्रवादी काँग्रेसची. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे सध्यातरी न्यायालयाने मान्य केल्याने शरद पवार हे फुटीर गटाचे नेते बनले आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वामुळे राज्यातील एक पक्षतरी घराणेशाहीच्या जाचातून सुटला, असे म्हणावे लागते.
 
दोन्ही पक्षांतील या फाटाफुटीचा लाभ घेत आपल्या पक्षाच्या मतांचा पाया विस्तारणे, हे भाजपचे सध्याचे लक्ष्य. गेल्या निवडणुकीत भाजपला राज्यात ४६ टक्के मते पडली होती. आता राष्ट्रीय स्तरावर ‘एनडीए’ आघाडीला ‘४०० पार’ जायचे असल्याने, प्रत्येक राज्यातील भाजपच्या मतांची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातही भाजपला ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते पडली, तर जास्तीत जास्त जागा जिंकता येतील आणि त्यासाठी अन्य मित्रपक्षांची मदत घेणे अनिवार्य आहे. भाजपच्या युतीत पक्षांच्या वाढलेल्या संख्येमागे हे गणित आहे. ज्याप्रमाणे, राष्ट्रीय स्तरावर भाजपने राष्ट्रीय लोकदल, तेलुगु देसम, नितीशकुमारांचा जेडीयू आणि देवेगौडा यांच्या जेडीएस या पक्षांबरोबर पुन्हा युती केली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही वेगवेगळ्या पक्षांबरोबर युती करणे आवश्यक होते. त्यासाठी काही प्रमाणात तडजोडही अटळ आहे आणि या नव्या राजकीय वास्तवाचा स्वीकार भाजप कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना करावा लागेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
 
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी या मित्रपक्षांबरोबर थोडा संघर्ष झाला, जो अपरिहार्य होता. पण, शेवटी सर्वच पक्षांना थोडीफार तडजोड करावी लागली. या व्यापक युतीचा लाभ सर्वच मित्रपक्षांना मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-उबाठा सेना यांच्या आघाडीत स्थान मिळू शकले नाही. याचा विपरित परिणाम या दोन्ही बाजूंना भोगावा लागेल. वंचितच्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता आता मावळली असून, त्यांच्या मतांमुळे काँग्रेस आघाडीच्या मतांची मात्र वजावट होणार आहे. उलट, भाजपच्या महायुतीचा फक्त लाभच संबंधित पक्षांना होईल.
 
काँग्रेसने उबाठा सेनेपुढे सपशेल लोटांगण घातल्याने, त्या पक्षाचे नैतिक धैर्य रसातळाला गेले आहे. कार्यकर्ते मनातून धुमसत आहेत. या आघाडीत खरेतर काँग्रेस हाच त्यातल्या त्यात मोठा आणि एकसंध पक्ष होता. पण, त्या पक्षाने ‘इंडी’ आघाडीच्या भ्रामक एकतेपायी आपल्याच पायावर कुर्‍हाड मारली आहे. पक्षफुटीनंतर उबाठा सेना अधिकच क्षीण होऊनही लोकसभा निवडणुकीत या आघाडीत सर्वाधिक जागी उमेदवार उभे आहेत, हे धक्कादायक. भ्रामक एकतेच्या नादी लागून काँग्रेसने उबाठा सेनेची शक्ती नसलेल्या सांगलीसारख्या जागेवरही पाणी सोडले. परिणामी, वसंतदादा पाटील यांच्या नातवाने तेथे बंडखोरी केली आहे. मित्रपक्षांची मदत होत असेल, तर त्याच्याशी आघाडी करणे, हे राजकीय शहाणपण आहे. पण, ज्या पक्षाकडे स्वत:चा पाया नाही, त्या पक्षासाठी आपला पाया असलेली जागा सोडणे, यासारखा मूर्खपणा दुसरा नाही. या फाटाफुटीमुळे भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित झाला आहे.
 
भाजपच्या महायुतीतील प्रत्येक पक्षाचे स्वत:चे असे मतदार आहेत. सर्वाधिक दुबळा असला, तरी मनसेचीही काही हजार मते आता महायुतीलाच मिळतील. शिवाय मनसेने भाजप आघाडीला पाठिंबा दिला आहे, अशी सकारात्मक प्रतिमाही मतदारांच्या मनात उभी राहते, त्याचाही त्यांना लाभ होईल. ‘अधिकस्य अधिकं फलम्’ यावर ही महायुती आधारलेली आहे. महाराष्ट्रातील रोखठोक राजकीय वास्तव स्वीकारून आणि स्वप्नाळू तात्त्विकतेच्या आहारी न जाता, भाजपने ही महायुती साकारली आहे. ते करताना वैयक्तिक आकांक्षांना थोडी मुरड घालण्याचे राजकीय शहाणपणही भाजपच्या नेत्यांनी दाखविले आहे. इतका बोध जरी या महायुतीतील अन्य पक्षांनी घेतला, तरी त्याचा त्यांना भविष्यात फायदाच होईल.

-राहुल बोरगांवकर