काँग्रेसी ‘शरीया’ मानसिकता

    24-Apr-2024
Total Views |
 RAHUL SAM
 
सॅम पित्रोदा हे राहुल गांधींचे सल्लागार म्हणून ओळखले जातात. या सॅम पित्रोदांनी नेहमीच देशहिताच्या विरोधात भूमिका घेतली. आताही वारशांना केवळ ४५ टक्के इतकाच हक्क देणारा, अमेरिकी वारसा हक्क भारतात लागू करण्याची आवश्यकता पित्रोदांनी व्यक्त केली. देशभरातून त्यांच्या या व्यक्तव्याचा निषेध होऊ लागल्याने, काँग्रेसने हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हणत हात झटकले असले तरी यावरुन काँग्रेसची ‘शरीया’वादी मानसिकताच स्पष्ट होते.
 
काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी वारसा करासंदर्भात केलेले वक्तव्य वादाच्या भोवर्‍यात सापडले असून, हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे लक्षात येताच, काँग्रेसने पित्रोदा यांचे ते वैयक्तिक मत असल्याचे सांगत ‘हात’ झटकले. भाजपने पित्रोदा यांच्या या विधानाचा समाचार घेतला असून, काँग्रेसच्या या ओरबाडणार्‍या मानसिकतेवर प्रहार केला. अमेरिकेच्या काही राज्यांत प्रचलित असलेल्या प्रथेचा दाखला देत, भारतातही अशाच पद्धतीचा कायदा राबवण्यात यावा, असे वादग्रस्त विधान पित्रोदांनी केले. त्यावर काँग्रेस आता तुमच्या मृत्यूनंतरही तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या मुलांना वारसा हक्काने मिळणार्‍या संपत्तीवरही काँग्रेसचा डोळा असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. “जोपर्यंत तुम्ही हयात आहात, तोपर्यंत काँग्रेस जास्त कर लावेल आणि तुम्ही हयात नसाल, तेव्हादेखील तुमच्यावर वारसा कराचा बोजा काँग्रेस लावणार आहे. काँग्रेसी युवराज भारतीयांना त्यांची मालमत्ता मुलांना देण्यापासून वंचित ठेवणार आहेत,” असा घणाघात मोदींनी केला आहे.
 
पित्रोदांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस अडचणीत आली असून, जयराम रमेश यांनी लगोलग ट्विट करून सॅम पित्रोदांचे वक्तव्य वैयक्तिक मत असल्याचे म्हटले. अमेरिकेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याची ५५ टक्के संपत्ती सरकारकडे जाते आणि केवळ ४५ टक्के संपत्ती ही वारसा हक्काने मुलांना मिळते. भारतात अशा पद्धतीचे धोरण आखण्याची गरज आहे, असे अजब विधान पित्रोदांनी केले होते. अमेरिकेत असा कायदा लागू असल्याचा दावा त्यांनी केला खरा, पण प्रत्यक्षात अमेरिकेतील मोजक्याच राज्यांमध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे. एकूणच काय तर संपत्तीच्या पुनर्वितरणावर काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचे समर्थन पित्रोदांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी तुमच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे, असे म्हणत काँग्रेसवर आरोप केले होते. अर्थातच, काँग्रेसने तो नाकारला.
 
गांधी घराण्याच्या जवळचे असणारे पित्रोदा यांनी यापूर्वीही काँग्रेसला अनेकदा अडचणीत आणले आहे. त्यांनी घेतलेल्या अशाच चित्रविचित्र भूमिकांमुळे काँग्रेसने त्यांच्यापासून अंतर राखलेले दिसून येते. १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिखांचे हत्याकांड करण्यात आले, त्याबद्दल त्यांना मे २०१९ मध्ये विचारणा केली असता, ‘झाले तर झाले, त्यात काय,’ असे म्हणत देशभरात एकच खळबळ उडवून दिली. ‘१९८४ मध्ये जी घटना घडली, त्यावर आता कशाला भाष्य करायचे,’ अशी उर्मठपणे विचारणा त्यांनी केली होती. भाजपने अर्थातच त्यांच्या या विधानाचा निषेध केला होता. आताही पित्रोदांनी प्रकरण अंगाशी येत आहे, हे पाहताच माफी मागितली आहे. मात्र, ते युवराज राहुल यांचे सल्लागार असल्याने, माफी ही राहुल यांनी मागितली पाहिजे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये, पित्रोदांनी पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोट ‘एअर स्ट्राईक’ केला. त्याच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे हेच महाशय होते. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा आम्हीही पाकिस्तानात विमाने पाठवून बदला घेऊ शकलो असतो. मात्र, काँग्रेसने असे केले नाही.
 
आठ दहशतवाद्यांसाठी संपूर्ण देशाला जबाबदार धरणे बरोबर नव्हे, असे अजब तर्कट त्यांनी मांडले होते. तसेच या ‘एअर स्ट्राईक’चे पुरावे मागण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. संपूर्ण पाकला जबाबदार धरू नका, असा आग्रह मांडत, त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. म्हणूनच, पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका करत राष्ट्रहितापेक्षा दुसरे काही असू शकते का, अशी विचारणा केली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरावेळीही पित्रोदांनी गेल्यावर्षी जूनमध्ये असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. देशातील बेरोजगारी, महागाई, शिक्षण आणि आरोग्य या समस्या मंदिर उभारल्यामुळे सुटणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे, अमेरिकेतील एका कार्यक्रमात पित्रोदांनी जेव्हा अकलेचे तारे तोडले, तेव्हा राहुल गांधीही त्यांच्याबरोबर होते. अयोध्या आज जगाची धार्मिक राजधानी म्हणून उदयास आली आहे, त्याशिवाय ती हजारो हातांना थेट रोजगार देत आहे. मंदिरे उभारून काय होणार, असा प्रश्न विचारणार्‍यांची बोलती अयोध्येमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळाल्यामुळे बंद झाली आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा संविधानाची निर्मिती करण्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सर्वाधिक योगदान आहे, असा दावा पित्रोदा यांनीच केला होता. भाजप पुन्हा सत्तेवर आले, तर संविधान बदलले जाईल, असा आरोप करणारे काँग्रेस अशावेळी गप्प बसते. राहुल गांधी यांचे ते सल्लागार आहेत, ही एकच बाब पित्रोदांच्या विश्वासार्हतेवर भाष्य करणारी ठरते. मध्यमवर्गाने अधिक कर भरण्याची तयारी ठेवावी, असेही एक तर्कट त्यांनी २०१९ मध्ये मांडले होते. अमेरिकेप्रमाणे येथेही ५०-६० टक्के वारसा-कर लावायला हवा म्हणणारा मूर्ख सॅम पित्रोदा हे लक्षात घेत नाहीत की, केवळ अशा एका घटकाचा वेगळा विचार करून चालत नाही. जी अमेरिका स्वत:च्या नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वस्त विमा किंवा तत्सम स्वरूपाचा विचार करू शकत नाही, तेथील केवळ वारसा-कर लावा असे सांगणारे पित्रोदासारखे दिवटे ज्यांचे सल्लागार असतात, त्यांचे राजकीय दिवाळे निघणे हे निश्चित. ‘ब्रेव्हहार्ट’मधील व्हिडिओमध्ये इंग्लंडचा राजा ज्याला खाली फेकत आहे, तो सॅम पित्रोदा आहे, रघुराम राजन आहे की जयराम रमेश आहे, हे ज्याने त्याने ठरवावे. राजपुत्र म्हणजे काँग्रेसी ठोंब्या आहे, यावर मात्र सर्वांचे एकमत होईल. काँग्रेसला या देशात ‘शरीया’ कायदा आणायचा आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी मागेच म्हटले आहे. सॅम पित्रोदा यांनी काँग्रेसची ही मानसिकता स्पष्ट शब्दांत मांडली. इतकेच!