बीएमसी मालमत्ता करसंकलनाचे उद्दिष्ट गाठणार

24 Apr 2024 20:17:03

bmc


मुंबई, दि.२४ :
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ताकर कर संकलनाचे उद्दिष्ट एकूण ४ हजार ५०० कोटी रुपये आहे. तर कर भरणा करण्याचा अंतिम दिनांक २५ मे आहे. यापैकी दिनांक २३ एप्रिलपर्यंत सुमारे ३ हजार ५६९ कोटी रूपयांच्‍या मालमत्‍ताकराचे संकलन झाले आहे. निर्धारित लक्ष्‍य ४ हजार ५०० कोटी रूपयांच्या तुलनेत हे प्रमाण ७९ टक्‍के इतके आहे. देय दिनांकांच्‍या उर्वरित एक महिन्‍याच्‍या कालावधीत जनजागृती, थकबाकीदारांकडे पाठपुरावा करून १०० टक्‍के कर संकलन करण्‍याचा ठाम निर्धार महानगरपालिका प्रशासनाने व्‍यक्‍त केला आहे.

मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी मालमत्ताकर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. बीएमसीच्या हद्दीत असणाऱ्या मालमत्‍तांची संख्‍या ९ लाख ५५ हजार ३८ इतकी आहे. त्‍यापैकी ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱया निवासी इमारती / निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. या मालमत्‍तांची संख्‍या ३ लाख ५६ हजार ६५२ इतकी आहे. एकंदरीतच ५ लाख ९८ हजार ३८६ मालमत्‍ता कर आकारणी कक्षात येतात.

बीएमसी करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे उद्दिष्टाइतके मालमत्ता कर संकलित करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न अद्यापदेखील सुरूच आहे. यंदाच्या वर्षीच्या करसंकलन उद्दिष्टपूर्तीसाठी करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांमधील मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानंतर अनेक मालमत्‍ताधारकांनी देय दिनांक २५ मेपूर्वी कर भरण्‍याचे आश्‍वासित केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करता यावा, यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाच्या वतीने वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. तथापि, अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळीच कर जमा करुन दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0