
अमरावती : उमेश कोल्हे हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना ही गोष्ट त्यांना पुन्हा लक्षात आणून दिली आहे. उद्धव ठाकरे सत्तेत होते. मुख्यमंत्री होते पण त्यांनी काहीच पावले उचलली नाहीत, अशा शब्दांत त्यांनी सडकून टीका केली. अमित शाह म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामललाची प्राणप्रतिष्ठा त्यांच्या मंदिरात केली. यावेळी विरोधकांनाही निमंत्रण पाठविण्यात आलं होतं. मात्र, त्यापैकी नकली शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे सोनिया गांधींना घाबरून मंदिरात दर्शनाला गेलेले नाहीत.
शरद पवारांना निमंत्रण दिलं होतं, त्यांनी तब्येतीचं कारण पुढे केलं. मग आता निवडणूकीच्या प्रचारात कसे फिरतात. राहुल गांधींनाही निमंत्रण दिलं होतं. पण त्यांनीही दर्शन घेतलं नाही. राहुल गांधी आता अमरावतीच्या सभेत फिरत आहेत. मात्र, त्यांचं ऐकणारं कुणीही नाहीये, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंसह विरोधकांचा समाचार घेतला. अमरावतीच्या सभेत नवनीत राणांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची सभा होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते.
अमित शाह म्हणाले, "काश्मीर आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. पण मल्लिकार्जून खर्गे म्हणतात, महाराष्ट्राशी काश्मीरचं काय नातं? खर्गे कान उघडून ऐका महाराष्ट्रातील प्रत्येकजण काश्मीरसाठी आपलं जीवन समर्पित करण्यासाठी तयार आहे. कलम ३७० हटविण्याच्या बाजूने जनता होती. मात्र, विरोधकांनी ७० वर्षे फुटीरतावाद्यांना मांडीवर खेळवत बसले. राहुल गांधी म्हणाले होते, 'कलम ३७० हटवाल तर रक्ताचे पाट वाहतील.' राहुल बाबांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की, एक खडा फेकण्याची हिम्मत कुणाची झाली नाही.", असे म्हणत त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले.
"शरद पवार इतके वर्ष केंद्रात कृषीमंत्री होता महाराष्ट्रात मुख्यमंत्री होता. माझ्य़ा विदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तुम्ही विदर्भाच्या सिंचन क्षेत्रासाठी काय केलं? माफी मागायची आहे तर त्या विदर्भातील मृत शेतकऱ्यांची माफी मागा. त्या विधवा भगिनींची माफी मागा. मी आज सांगतो, महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रसाठी ७९ हजार कोटींची इंटरलिंक परियोजना देवेंद्र फडणवीसांनी सुरू केला. आकोला, बुलडाण्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना या सिंचनाचा फायदा होणार आहे. बाणगंगा नदी प्रकल्प, अकोला नदी प्रकल्पाची सुरुवात आम्ही केली, असेही त्यांनी म्हटले.
"काँग्रेस पक्ष वारंवार अफवा पसरवत आहे. की, भाजप सत्तेत आल्यावर आरक्षण घालवतील. मी आज स्पष्ट करू इच्छितो. भाजप कधीही आरक्षणाच्या विरोधात होता आणि राहणारही नाही. काँग्रेस तिहेरी तलाक पद्धती पुन्हा आणणार असल्याची घोषणा करतात. मला त्यांना सांगायचे आहे की, ना राहुल गांधी परत येणार ना तिहेरी तलाक पद्धत परत येणार, हे त्यांनी लक्षात घ्यावं. इथेच उमेश कोल्हेंची हत्या झाली. स्वतःला हिंदूरक्षक म्हणविणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदावर असतानाही त्यांनी काहीच केले नाही. एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेनेचे पाईक आहेत. भविष्यात पुन्हा कुठल्याही उमेशची हत्या होणार नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंचा समाचार घेतला. अमरावतीकरांनी इतक्या जोरात इव्हीएमचे बटन दाबा की, मत इथे पडेल पण करंट इटलीवाल्यांना लागेल," असा घणाघात त्यांनी केला.