संगीत ते समाधी भाग ३४

    24-Apr-2024
Total Views |
बदु
 
सोमाने सिंधुद्वीपाला वरील ऋचा सांगितली म्हणजे, सिंधुद्वीपाने सोमरसपान केले असले पाहिजे. साध्या रसपानाने असली शब्दानुविद् सविकल्प समाधी अवस्था प्राप्त होऊ शकत नाही. सोमपान केवळ रसपानच नसून, त्यावर सामगायनादी मंत्रप्रयोगाने सिद्ध झालेल्या अमृतरसाचे पान असले पाहिजे, असा निष्कर्ष निघू पाहतो. आणखी एक वैदिक मंत्र आहे- ’जातवेदसे सुनवामसोममरातीयतो निदहाति वेदः’ यातही सोमाचे महत्त्व सांगितले आहे. या विवेचनावरून सोमरस पान साधे रसपान नसून उच्च गानयोगाने भारलेल्या अमृतरसाचे पान असावे असे दिसते. गानयोगाचा आणि सोमरसपानाचा इतका निकट संबंध आहे. असल्या शिवतमरसाचे पान करणारा गानयोगी अमर गंधर्व होऊन स्वर्गातील अमरावतीत स्वच्छंद विहार करीत असल्यास नवल ते काय? गानयोगी आणि गंधर्व ही एकच अवस्था असली पाहिजे, असेही यावरून अनुमान काढता येते.
 
दुर्दैवाने सोमरसाचे प्रतीकात्मक रुप म्हणजे मद्य, गांजा, अफू असल्या मादक पदार्थांना आपल्या गानसाधनेत स्थान दिल्यास आश्चर्य वाटावयास नको. अनेक उच्च क्षमता असलेले गायक या सवयीला बळी पडून आपल्या शरीराचा आणि पर्यायाने गायनकलेचा नाश करीत आहेत. कोठे ती गानयोग्यांची आणि सोमपानाची अमृतपरंपरा आणि कोठे ही मदिरापानाने धुंद होऊन स्वरविस्तारातच धन्यता मानणार्‍यांची परंपरा! अजून काही बिघडले नाही. अजूनही आम्ही आमच्या अमर परंपरांना उजाळा देऊ शकतो आणि भारतीय संगीताची साक्ष जगाला पटवू शकतो.
 
सिद्धीभोग ते समाधी
समाधी म्हटली की, साधारणांना एकप्रकारचे कुतूहल किंवा भय उत्पन्न होते आणि समाधी अवस्थेशी साधारणांना काय करायचे आहे? असा भाव त्यांचे मनात उत्पन्न होतो. समाधी अवस्था ही काही वाटेवर पडलेली सहजप्राप्य घटना नव्हे, हे खरे आहे. अनेक जन्मांतून केलेल्या योगमार्गातील अभ्यासाचे फल म्हणजे समाधी होय. ’अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परां गतिम’ असे गीतेत सांगितले आहे. चित्ताची साम्यावस्था म्हणजे समाधी. प्रपंचातील काम्यकर्मातून वृत्ती निवळल्याशिवाय चित्तसाम्य प्राप्त होत नाही. भोग भोगल्यामुळे आगीत तेल ओतल्याप्रमाणे ताण अधिकच वाढतो, हे जरी खरे असले, तरी भोग भोगल्याशिवाय त्यातून चित्त निवळत नसते. चित्त निवळण्याकरिता समर्थपणे भोग भोगणे आवश्यक आहे.
 
भोगांचा मालक म्हणून भोग भोगावेत, दास म्हणून नव्हे. सर्वशक्तिसामर्थ्याचा परमोच्च अभ्युदय करून नंतर त्यांचे निश्रेयस म्हणजे अनासक्तिवृत्तीने राहणे हेच धर्मजीवन होय. ज्यांना भोगाबद्दल आकर्षण नसेल किंवा अनासक्ती असेल, त्यांची असली अनासक्त वृत्ती त्यांना एकदमच प्राप्त होत नसते. ती त्यांच्या पूर्वजन्मांतील आणि इहजन्मातील उत्तम संस्कारांचेच फल असते. असले सिद्धिभोगाचे आणि त्यातून उत्पन्न होऊ शकणार्‍या तृप्तकाम अवस्थेचे संस्कार अनेक मार्गाने होऊ शकतात. गानयोग हा त्यांतील एक मार्ग आहे. स्वरांच्या योग्य अभ्यासाने गानयोगी आपतत्वातील आत्यंतिक सुखसिद्धी भोगून त्यातून धन्यकाम होऊन चित्त शांत करू शकतो. असले तृप्तकाम जीवात्मेच समाधीच्या सुखदुःखविरहित अवस्थेला प्राप्त होऊ शकतात, सावध आणि सामर्थ्यशील भोग हे आर्यधर्माचे प्रमुख लक्षण मानले आहे. भोगांच्या उच्च-उच्चतर कक्षा गाठणे यातच पुरुषार्थ आहे.
 
शेवटी सर्व भोग भोगून ते निःसत्व करून एखाद्या चोथ्याप्रमाणे बाहेर फेकणे, हेच जीवंतपणाचे लक्षण होय. आर्य माणूस भोगाला कधीच पाठ दाखवित नाही, उलट ते भोगून तो तृप्तकाम होताना वरच्या सामर्थ्यसंपन्न अवस्थांना प्राप्त होत असतो. नैराश्य किंवा रसहीनता ही आर्यवृत्ती नव्हे. भोगांना भीत असेल तो भित्रा आणि भोगांचा दास बनत असेल तो गुलाम होय. आर्य धर्माला या दोन्ही गोष्टींचे वावडे आहे. मनात भोगाबद्दल आस्था ठेवून वरकरणी दुर्लक्ष केल्यासारखे दाखविणे यासारखी आत्मवंचना आणि फसवेगिरी दुसरी कोणतीच नाही. भोगांच्या उच्च-उच्चतर अवस्था भोगल्यानेच त्यातून वृत्ती निवळतात आणि माणूस नंतर धन्यकाम बनतो. समाधी अवस्था या धन्यकाम अवस्थेची पलीकडील सर्वस्थित अवस्था होय. सिद्धिभोगातून ही सर्वस्थित अवस्था प्राप्त होत असते.
 
गानयोग
आर्य पराक्रमी असल्यामुळे सर्व भोगांची प्राप्ती करून ते पूर्ण भोगून आणि मनाला पूर्ण तृप्त करुन मगच ते समाधीला हात घालीत. इहलोकीच्या भोगप्राप्तीकडे त्यांनी कधीच औदासिन्याने पाहिले नाही आणि भोग प्राप्त झाल्यावर त्यात ते कधीच घुटमळले नाहीत. पृथ्वीतत्वातील मर्यादित जड भोग त्यांना कमी वाटत म्हणून आपतत्वातील सिद्धिभोगांना म्हणजे अप्सरांना ते भोगीत असत. असले तृप्तात्मे आर्यच समाधीच्या परमशांत, परमचैतन्यमय अवस्थेला योग्य ठरू शकतात. पाश्चात्य राष्ट्रांतील तरुणांची आज दयनीय अवस्था झाली आहे. भोग भोगण्याची साधने त्यांच्याकडे इतकी विपुल आहेत की, आता ते त्या भोगसाधनांना कंटाळले असून, त्यापेक्षा उच्च भोगानंदाकरिता आसुसले आहेत. आता अनेकजण पुरातन भारतीय जीवनाकडे आकृष्ट होऊन वैदिक हिंदू परंपरेचे निस्सीम भक्त बनत आहेत. याचे कारण त्यांची भोगलालसा अजून तृप्तकाम झाली नाही. आत्मतृप्तीकरिता अशांना उच्च तत्वांचीच कास धरावी लागेल. गानयोगाद्वारे आपतत्वातील सिद्धी आणि अप्सराभोग प्राप्त करता येतात. सिद्धीभोगापासून समाधीपर्यंत सर्व समर्थ अवस्था प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य गानयोगात आहे. गानयोग संस्कारांनी रंजकही होऊ शकतो. रंजकतेची पराकोटी म्हणजे योगशास्त्र आणि म्हणून असल्या तृप्तात्म्याला आपोआप समाधी अवस्था प्राप्त होत असते. म्हणून गानयोगाची धाव सिद्धीभोग ते समाधी अशी आहे.
 
गानयोग अजून नष्ट झाला नाही. झाडावरील फळ खाली पडताना पाहून न्यूटनला गुरुत्वाकर्षणाची कल्पना सुचली असेल. पृथ्वीतील ती गुरुत्वाकर्षण शक्ती न्यूटनचा त्याबाबतचा शोध लागण्यापूर्वीही होती आणि ही पृथ्वी असेपर्यंत अबाधित राहील. गानयोगाबद्दलचे अज्ञान गानयोगाच्या स्वयंभूशास्त्राला नष्ट करू शकत नाही. गानयोग वेदांप्रमाणे सनातन आणि अपौरुषेय आहे. भारतात आजही असे महात्मे आहेत की, जे गानयोगाची रहस्ये जाणतात आणि इतरांना शिकवू शकतात. ते तृप्तकाम असल्यामुळे आजकालच्या सवंग प्रसिद्धी कलेपासून सर्वथा अलिप्त आहेत. त्यांना शोधणे आमचे काम आहे. शोधल्यास कित्येकवेळा ते आमच्या शेजारी असल्याचे आम्हाला आढळून येईल. गानयोगाच्या पूर्वपरंपरा पुनश्च सुरू होऊन, त्याचे अध्ययन आणि साधना होऊन त्यात संशोधनांची पुन्हा भर पडणे अत्यावश्यक आहे. भारतभर अनेक संगीतशाळा आणि विद्यापीठे आहेत. त्यातून गानयोगाला प्रोत्साहन दिले जाऊ शकते. संस्कार केल्यास गानयोगही देशी संगीताप्रमाणे रंजक होऊ शकतो, हे अनुभवांती कळून येईल. प्रयत्न होणे मात्र अगत्याचे आहे. वेदोनारायणाची एक ऋचा उद्धृत करून विराम घेऊ.
’भद्रं नो अपिवातय मनः’ भगवंता आमच्या अंतकरणाला सत्कर्माची आवड द्या!
समाप्त

-योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७