योगिक : धैर्य, निर्वैरता

    23-Apr-2024
Total Views |

Yoga



योगसाधना करणार्‍या व्यक्तीला आवश्यक आहे की, तिने स्वतःला प्रश्न विचारावा :
प्रश्न-1: मी काय केले, ज्यामुळे मला हा जन्म प्राप्त झाला? काय उत्तर देणार?

श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत सांगतात : प्रकृती स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्॥ (श्रीमद्भगवद्गीता अ-9, श्लोक -8.)
अर्थात, आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूतसमुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मांनुसार उत्पन्न करतो. म्हणजेच उत्तर काय, तर आपलेच कर्म. केव्हा केले, तर मागील जन्मात. म्हणून हा उत्तम मनुष्य जन्म मिळाला, जो अत्यंत दुर्मीळ आहे. जिथे कर्म करणार्‍यांना आपल्या कर्माची बरीवाईट फळं मिळतात. फक्त इथेच कर्म करण्याचा अधिकार आहे. म्हणून या जन्मात निश्चितच चांगलं कर्म करावं लागणार. कर्म चांगलं का वाईट, ही निवड करण्याचा अधिकार आपलाच. वाईट कर्म ही सहजतेने, नकळतपणे घडतं असतात. उदा: आपण चालत असतो, आपल्या पायाखाली अनेक सूक्ष्म जीव मरत असतात. आपण एखाद्याची इतरांसमोर स्तुती करतो, इतरांना वाईट वाटतं इत्यादी. चांगली कर्म ही जाणीवपूर्वक करावी लागतात. कर्म चांगले का वाईट, हे सुरुवातीला ठरवणं फार अवघड असतं. कारण, कर्माचे परिणाम कर्म पूर्ण झाल्यावर कळतात, ही खरी अडचण आहे. त्यामुळे प्रत्येक जण ‘मी चांगलेच कर्म करतो’ असे म्हणेल, अगदी चोर, डाकु, लुटेरे, भ्रष्ट राजकारणीसुद्धा. मग, उपाय काय? उपाय म्हणजे कर्म करताना योगशास्त्राचे पहिले अंग यम याचे पालन करणे.
ते कसे करावे ते क्रमवार बघू.
यम : सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून कर्म करणे.
यमातील पहिली शिस्त सत्य होय. विचार, उच्चार, आचार व व्यवहार सत्य करा, ज्यांचे फळ धैर्य प्राप्तीत होते. जो एक महत्त्वाचा सद्गुण. धैर्याशिवाय जीवनात परिस्थितीचा सामना होत नाही. धैर्य नसल्यास परिस्थितीपासून पळून जाण्याची वृत्ती तयार होते. धैर्य कमी पडल्यास माणूस आत्महत्या पण करतो. म्हणून सत्य पालन हे जीवनात परिस्थितीचा सामना करण्यासाठी, जीवन घडविण्यास आवश्यक आहे. थोड्या थोड्या गोष्टीसुद्धा व्यवहारात नाहक खोटे बोलू नये.

त्यासाठी करावयाची प्रार्थना - ‘असतो मा सत् गमय॥’
म्हणून आपले प्रत्येक कर्म संयुक्तिक होण्यासाठी सत्य पालन होणे गरजेचे आहे. सत्य पालनातले अपवाद म्हणजे निर्दोशांची सुरक्षा, सज्जनांचे हितार्थ असत्य क्षम्य असते. उदाहरणार्थ, सध्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना समाजात घडत आहेत. समजा, आपल्या घरात जीवाच्या भयाने एक तरुणी येऊन लपली आहे आणि काही लोक त्या ‘लव्ह जिहाद’च्या वाईट हेतूने दरवाजा वाजवून आपणांस विचारतात‘लडकी छुपी हैं क्या इधर?’ आता त्या लपलेल्या तरुणीला सुरक्षा द्यायची असेल, तर असत्याचा आधार घ्यावा लागेल, ते असत्य क्षम्य आहे. कारण, तिला सुरक्षा देणे हे पण आपले सामाजिक कर्तव्य आहे इत्यादी.

योगातील दुसरी शिस्त - अहिंसा : जी तीन प्रकारची आहे.

अ) शारीरिक अहिंसा : म्हणजे कोणत्याही प्राण्यांची शारीरिक हानी करायची नाही. कारण, प्रत्येक प्राणिमात्रामध्ये तेच ईश्वरी तत्व विराजमान आहे, जे आपल्यामध्ये आहे, ज्याला प्राणतत्व, आत्मतत्व किंवा चैतन्य, आत्मा असे म्हणतात. जे इथून तिथून सारखेच आहे. त्याचा अभ्यास आपण ‘ध्यान’ या लेखात करू. जेव्हा कोण्या प्राण्याची आपल्याकडून हिंसा होते, तेव्हा त्या प्राणतत्वापोटी आपला अपराध होतो आणि म्हणून ज्याला योग करायचा आहे, त्याने मांसाहार करू नये, प्राणी मारून खावू नये. शाकाहार घ्यावा. याला पण अपवाद आहेत. जेव्हा आपलेच अस्तित्व धोक्यात आहे, तेव्हा प्राणी मारू शकता. उदा: देश रक्षणासाठी लढाईत शत्रूला मारा. याउपर मारामारी थांबवा. घरात होणार्‍या डास, ढेकूण, झुरळ, पाली यांना मारू नका. कारण, या सृष्टीवर सर्वांनाच अधिकार आहे. फक्त आपलाच अधिकार आहे, असे नाही. त्यासाठी रोज घरात अग्निहोत्र करून त्यांना पळवून लावा. त्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करा.

तमसो मा ज्योतिर्गमय

ब) मानसिक अहिंसा : म्हणजे मनांत कोणाविषयी वाईट विचार, ईर्षा, द्वेष, मत्सर बाळगू नका. कोणालाही शाप देऊ नका. इत:पर असे घडलेच, तर परमेश्वराची प्रार्थना करा. सर्वेषां स्वस्तिर्भवतु...

क) वाचिक अहिंसा : आपल्या वाणीने कोणालाही दुखवायचे नाही. परिस्थितीजन्य लक्षपूर्तीसाठी कोणाला काही बोलावेच लागले,तर ती परिस्थिती निवळल्यावर त्या व्यक्तीला ती आपल्या भूमिकेची आवश्यकता होती, असे समजावून देऊन झाल्या प्रकाराबद्दल माफी मागावी. माफी तीच व्यक्ती मागू शकते, जिच्याकडे धैर्य असते.
अशाप्रकारे अहिंसा पालन केल्यास आपल्याला निर्वैरता प्राप्त होईल. आपला कोणी मत्सर करणार नाही. आपला व आपल्या कुटुंबाचा विकास होईल. ईत:पर अहिंसा पालनात आपण पूर्णपणे सक्षम नसू, तर घरासमोर काळी तुळस लावा. आपल्या उत्पन्नातून कमीत कमी 6.25 टक्के रकमेचे सत्पात्री दान करा. कारण, आपल्याकडे येणारा पैसा, धन हे पर्यायाने समाजाकडून येत असते. त्यामुळे आपल्यावर समाज ऋण असते. ते वैयक्तिकरित्या समाजासाठी श्रम करून वा धन देऊन परत करावे, असे मनशक्ती केंद्र लोणावळाचे संस्थापक स्वामी विज्ञानांनंद पण सांगतात. मात्र, हे दान किंवा श्रम सत्पात्री असावे. आपण केलेल्या दानामुळे कोणाला आयतं बसून खाण्याची सवय लागू नये. आपण केलेल्या दानामुळे कोणाला नशापाणी करण्यात साह्य होऊ नये, म्हणजे सत्पात्री दान करणे साध्य होणार.


ही प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी करावी.
ॐ असतो मा सद्गमय।
तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्मा अमृतं गमय।
ॐ शांतिः शांतिः शांतिः॥
(क्रमशः)

- डॉ.गजानन जोग
(लेखक योगोपचार तज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)
9730014665