विरोधकांचा प्रचार राज्यहिताचा नाही!- विनोद तावडे

23 Apr 2024 18:22:30
vinod tawade
 
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सुरू असलेला प्रचार राज्याच्या हिताचा नाही. कोणी उठून वरिष्ठ नेत्यांना काहीही म्हणतो, हे शोभनीय नाही. अशा खालच्या पातळीवरचा प्रचार पाहून मनाला वेदना होतात, असे परखड मत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवार, दि. २३ एप्रिल रोजी व्यक्त केले.
 
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह उपस्थित होते. विनोद तावडे म्हणाले, पहिल्या टप्प्यात भाजपला अपेक्षित मतदान झाले आहे. आम्ही चांगल्या जागा मिळवू. परंतु, राज्यातील विरोधकांचा प्रचार ज्या पद्धतीने सुरू आहे, तो कुणाच्याही हिताचा नाही. जनतेने त्याचा विचार करायला हवा. मोदींना मत देऊन काय मिळाले, असा सवाल विरोधक करीत आहेत. पण, मी त्यांना सांगू इच्छितो, मोदींना मत देऊन महाराष्ट्राचा सर्वाधिक फायदा झाला. महाराष्ट्राला कराचा सर्वात जास्त वाटा मिळाला, चार कोटी घरांपैकी २७ लाख घरे महाराष्ट्राला मिळाली, असेही तावडे यांनी सांगितले.
 
मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेतून ४ कोटी घरे बांधली. त्यासाठी लागलेल्या साहित्यात लाखो लोकांना रोजगार मिळाला. पीएम आवासमधील २७ लाख घरे महाराष्ट्राला मिळाली. देशभरात मोठ्या प्रमाणात शौचालये बांधली गेली. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत कार्ड वितरण केले, गरजूंना रेशनवर मोफत अन्नधान्याचा पुरवठा सुरू आहे. महाराष्ट्राला ११ हजार ७११ कोटी रुपये बिनव्याजी कर्ज केंद्राने दिले. राज्याला २५३ टक्के अनुदानाच्या रूपाने आले. त्यामुळे आपल्या राज्याची प्रगती कशात आहे, याचा विचार व्हायला हवा, असेही तावडे म्हणाले.
 
काँग्रेसने ८० वेळा संविधान बदलले
भाजपला संविधान बदलण्यासाठी ४०० पार जायचे असल्याचा आरोप काँग्रेस नेते करीत आहेत. परंतु, काँग्रेसच्या काळात ८० वेळा संविधान बदलण्याचा कार्यक्रम झाला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी संविधान समोर ठेवून आम्ही आमचे संकल्प पत्र जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसचे राहुल गांधी लोकांना संभ्रमित करण्याचे काम करीत आहेत, अशी टीका विनोद तावडे यांनी केली.

Powered By Sangraha 9.0