वसई किल्ल्यातील बिबट्या जेरबंद; २५ दिवस दिला वन विभागाला चकवा

    23-Apr-2024
Total Views |
vasai fort leopard


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वसई किल्ल्यात मागील पंचवीस दिवसांपासून तळ ठोकून बसलेल्या बिबट्याला मंगळवार दि. २३ मार्च रोजी पहाटे जेरबंद करण्यात आले (vasai fort leopard). वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या जेरबंद झाला. (vasai fort leopard)

२९ मार्च रोजी वसई किल्ल्यात बिबट्या आढळून आला होता. याठिकाणाहून जाणाऱ्या एक मोटारसायकल स्वाराला त्याची धडक बसली होती. तेव्हापासून हा बिबट्या वसई किल्ल्याच्या परिसरातच तळ ठोकून होता. त्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने किल्ल्यातील भागात ट्रॅप कॅमेरे, रेस्क्यू पथक, आवश्यक ठिकाणी पिंजरे लावले होते. परंतु मानवी वर्दळ व इतर अडचणी यामुळे २० ते २५ दिवस उलटून गेले तरी या बिबट्याचा शोध लागला नव्हता. त्यानंतर वनविभागाकडून सातत्याने बिबट्या पकडण्याच्या नियोजनामध्ये बदल करून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्यानुसार पिंजरे लावले जात होते. वसई किल्ला देखील बंद करण्यात आला होता. येथील वसई-भाईंदर रो-रो सेवेवर देखील त्याचा प्रभाव पडला होता.

अखेरीस मंगळवारी पहाटे साधारण ३.३० वाजण्याच्या सुमारास किल्ल्यातील एका पिंजऱ्यात बिबट जेरबंद झाला. हा बिबट्या जवळच असलेल्या तुंगारेश्वर वन्यजीव अभायरण्यामधून याठिकाणी स्थलांतर करुन आला होता. तुंगारेश्वरमधील बिबट संशोधनादरम्यान त्याचे छायाचित्र टिपण्यात आले होते. त्यामुळे त्याचा सुगावा लागला होता. किल्ल्यात वास्तव्यास असताना तो भटक्या कुत्र्यांची शिकार करत होता. आता हा बिबट जेरबंद झाल्याने त्याला पुन्हा तुंगारेश्वर येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची शक्यता आहे.