अर्धे वर्ष पाताळात, तर अर्धे वर्ष जमिनीवर; देवीच्या नावे पालीच्या नव्या प्रजातीचे नामकरण

23 Apr 2024 20:43:35
new gecko species



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
तामिळनाडू राज्यात पसरलेल्या दक्षिण-पश्चिमी घाटामधून निमास्पिस कुळातील पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे (new gecko species). या प्रजातीचे नामकरण 'निमास्पिस पर्सेफनी' आणि 'निमास्पिस 'सँक्टस' असे करण्यात आले आहे. (new gecko species)

‘निमास्पिस’या कुळातील पालींना ‘ड्वार्फ गेको’ असे म्हणतात. या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या साप आणि पालींपेक्षा प्राचीन असून त्यांची उत्क्रांती साधारणपणे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी पश्चिम घाटामध्ये झाली. त्यांच्या गोल आकाराच्या बुबुळांच्या वैशिष्ट्यामुळे या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या इतर पालींपासून सहज वेगळ्या ओळखून येतात. भारतातील इतर पालीची बुबुळे उभी असतात. देशात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पाली निशाचर आहेत. परंतु, ‘निमास्पिस’ कुळातील पाली मुख्यत्वे दिनचर असतात. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांना ‘डे गेको’ असेही संबोधले जाते. नव्याने शोध लागलेल्या पालींच्या वैशिष्ट्यपूर्ण गोल बुबुळांवरुन त्यांचा समावेश निमास्पिस या कुळात केलेला आहे. हे संशोधनामधे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि इशान अग्रवाल यांचा सहभाग आहे. सदरचे संशोधन हे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून भारतीय द्वीपकल्पामधे सुरु असलेल्या पालींच्या सर्व्हेक्षणाचा भाग आहे.
 
 
नव्याने शोधलेली 'निमास्पिस पर्सेफनी' ही प्रजाती अनामलाई व्याघ्र प्रकल्पामधे आढळून आली. या पालीचे नामकरण ग्रीक पौराणकथेतील 'पर्सेफनी' या देवीच्या नावावरुन केलेले आहे. ही देवी अर्धे वर्ष पाताळात घालवते आणि अर्धे वर्ष जमीनीवर घालवते अशी आख्यायिका आहे. नव्याने शोधलेली पाल अशीच वर्षातील बहुतांश काळ दगडांखाली असणार्‍या काळ्या मातीच्या खाली आणि कुजलेल्या लाकडांच्या ओंडक्यांमधे असते. ही पाल रात्रीच्या वेळी काही काळासाठी बाहेर येते. तिच्या या वैशिष्ट्यपूर्ण वर्तनावरुन तिचे नामकरण 'निमास्पिस पर्सेफनी' असे केलेले आहे. 'निमास्पिस 'सँक्टस' ही प्रजाती कन्याकुमारी जिल्ह्यातील पाथुकणी गावातील टेकडीवरती आढळून आली जिथे चर्च आणि मंदिर एकाच ठिकाणी स्थित आहे. या प्रजातीचे नामकरण तिच्या मंदिर आणि चर्च परिसरामधे आढळण्यावरुन 'सँक्टस' या लॅटीन शब्दाने केलेले आहे. 'सँक्टस' हा शब्द लॅटीन भाषेत 'पवित्र' या अर्थाने वापरला जातो. नव्याने शोधलेल्या दोन्ही पाली निशाचर आहेत. छोटे किटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे
Powered By Sangraha 9.0