राहुल गांधी यांची डीएनए चाचणी करा; डाव्या आघाडीचा हल्लाबोल

23 Apr 2024 18:02:55
p v
 
नवी दिल्ली : राहुल गांधी हे चतुर्थ श्रेणीचे नागरिक असून त्यांची डीएनए चाचणी करण्याची गरज आहे, असा टोला डाव्या आघाडीचे आमदार पी. व्ही. अन्वर यांनी लगावला आहे.
 
केरळमध्ये काँग्रेस आणि डावी आघाडी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी हे वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर भाजपसह डाव्या आघाडीनेही उमेदवार उभा केला आहे. केरळमध्ये प्रचार करताना डावे आणि काँग्रेस एकमेकांवर यथेच्छ टिका करत आहेत.
 
डाव्या आघाडीतर्फे पलक्कड येथे आयोजित एका प्रचारसभेत आमदार पी. व्ही. अन्वर यांनी राहुल गांधी यांच्यावर तोंडसुख घेतले. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे चतुर्थ श्रेणीचे नागरिक झाले आहेत. ‘गांधी’ हे आडनाव लावण्याची त्यांची लायकी नसून त्यांना आता केवळ 'राहुल' असेच संबोधण्यात यावे. नेहरू घराण्यातील व्यक्ती असे बोलूच शकत नाही, त्यामुळे राहुल गांधी यांची डीएनए चाचणी करण्याचीही गरज असल्याचे अन्वर म्हणाले.
 
केरळमध्ये काँग्रेसचा प्रचार करताना राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर टिका केली होती. ,राहुल गांधी म्हणाले होते की, देशातील दोन मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आहे, मात्र विजयन अद्यापही बाहेर असल्याविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. आपण २४ तास भाजपवर टिका करतो, मात्र विजयन हे २४ तास आपल्यावर टिका करत असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले होते.



Powered By Sangraha 9.0