वंचित समाजाला पुरोहित प्रशिक्षण बाबासाहेबांना खरी आदरांजली

    23-Apr-2024
Total Views |
as
 
सालाबादप्रमाणे यंदादेखील दि. २ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीमध्ये श्री बालाजी मंदिर, गंगापूर रोड, नाशिक येथे पुरोहित प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण वर्गाबाबत काही...
 
नाशिक शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर येथे प्रवेशासाठी आंदोलन केले होते. पण, दुर्दैवाने तत्कालीन समाजाने त्यांना मंदिर प्रवेश दिला नव्हता, त्या शहरांमध्ये आता वंचित समाजातील युवकांना पुरोहितांचे प्रशिक्षण दिले जात आहे. ही निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. बाबासाहेबांचा आंदोलन करण्यामागचा उद्देश सफल करण्याचे काम या ठिकाणी होत आहे, ही समस्त भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. मंदिरात प्रवेश नाकारला गेला हा इतिहास आपणास ठाऊक आहे. पण नंतर मात्र समरसता यात्रेच्या निमित्ताने हिंदू समाजाकडून झालेली चूक सुधारत तत्कालीन सगळ्या कुप्रथा मिटवल्या गेल्या होत्या हेदेखील आपण जाणून घेण्याची गरज आहे. आता तर त्याही पुढची स्थिती म्हणजे मंदिरात प्रवेश कोणाला द्यायचा हे ठरवणार्‍या पुजार्‍यांच्या जागीच दलित वंचित समाजाला स्थान मिळू लागले आहे. समाजातून नवनवीन युवक पुढे येऊन पुरोहित प्रशिक्षण पूर्ण करीत आहेत.
 
भारतीय समाजव्यवस्थेत झालेला हा बदल निश्चितच आनंददायी आहे. विविध संस्कारांसाठी आवश्यक असे कुशल पुरोहित निर्माण करण्यासाठी डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य न्यास व धर्म जागरण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १२ वर्षांपासून नाशिक येथे पुरोहित प्रशिक्षण वर्ग चालविला जात आहे. आतापर्यंत या वर्गात विविध अनुसूचित जाती व जमातीमधून ५०४ युवकांनी पुरोहित प्रशिक्षण पूर्ण केला आहे. मागील १२ वर्षांपासून ते आपापल्या गावात पुरोहित म्हणून वावरत आहेत. विशेष म्हणजे अन्य सर्व समाजातून त्यांचा यथोचित सन्मान व गौरव केला जात आहे. सोबतच त्यांच्या दैनंदिन रोजगाराचीसुद्धा त्यातून सोय झाली आहे. संघाचे प्रचारक व तत्कालीन धर्म जागरण प्रमुख मुकुंदराव पणशीकर यांच्या मूळ प्रेरणेतून हा उपक्रम सुरू झाला आहे.
 
या ठिकाणी प्रशिक्षण वर्गात सर्व प्रशिक्षणार्थींना बारशापासून ते तेरवीपर्यंत सर्व प्रकारचे विधी शिकविले जातात व धर्मशास्त्राच्या दृष्टीने आवश्यक त्या पुस्तिका संदर्भासाठी भेट दिल्या जातात. सोबतच कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण शुल्क आकारले जात नाही. या वर्गाचा समारोप निलेश गद्रे, क्षेत्र कार्यकारिणी सदस्य सामाजिक समरसता यांनी केला. त्यावेळेस शहरातील या नव प्रशिक्षित पुरोहितांना शुभेच्छा व आशीर्वाचन देण्यासाठी कीर्तनकार हभप माधवदास राठी, संस्थेचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी, क्षेत्र धर्म जागरण प्रमुख महेंद्र रायचुरा, प्रांत धर्मजागरण प्रमुख नितीन कमळापूरकर, प्रांत विधी प्रमुख शिवशंकर खिचडे उपस्थित होते.
निलेश गद्रे
८२७५०४३९८७