बीएमसीच्या १० तरण तलावांमध्ये मिळणार पोहण्याचे प्रशिक्षण

तीन तुकड्यांमध्ये २१ दिवस प्रशिक्षण वर्ग सुरू करण्‍यात येणार

    23-Apr-2024
Total Views |

bmc


मुंबई, दि.२३ :  
मुंबई महापालिकेच्या १० जलतरण तलावांवर उन्‍हाळी सुट्टी दरम्‍यान पोहण्‍याचे प्रशिक्षण देण्‍यासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्‍यात येणार आहे. दि. २ मे २०२४ पासून २१ दिवसांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. तर याच प्रशिक्षणाच्या दुस-या कालावधीचा प्रारंभ दि. २३ मेपासून होणार आहे. प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी लिंक बुधवार, दि. २४ एप्रिल सकाळी ११ वाजेपासून कार्यान्वित होणार आहे.

मुंबईकर नागरिकांना या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे १० तरण तलाव कार्यरत आहेत. पोहणे शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांना बीएमसीने यंदाच्या उन्हाळ्यात अशी संधी उपलब्ध करून दिली आहे.या जलतरण प्रशिक्षणासाठी माफक शुल्क आकारणी केली जाणार आहे. पंधरा वर्षांपर्यंतची मुले, ६० वर्षांपुढील नागरिक, दिव्‍यांग व्‍यक्‍ती यांच्‍यासाठी २ हजार १०० रूपये, तर १६ ते ६० वयोगटातील नागरिकांसाठी ३ हजार १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे. हे प्रशिक्षण दररोज दुपारी १२.३० ते १.३०, दुपारी २ ते ३ आणि ३.३० ते ४.३० अशा तीन तुकड्यांमध्ये २१ दिवस आयोजित केले जाणार आहे.
 
सदर विशेष उन्हाळी सत्राची सभासद नोंदणी फक्त ऑनलाईन पध्‍द्तीनेच दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सुरू होणार आहे. तर, दिनांक २३ मे २०२४ ते दिनांक १२ जून २०२४ या कालावधीतील प्रशिक्षण वर्गाची सभासद नोंदणी दिनांक ६ मे २०२४ पासून सुरू करण्‍यात येईल. सभासदत्वासाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करावा. सभासद नोंदणीच्‍या चौकशीसाठी १८००१२३३०६० या टोल फ्र‍ि क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्‍यात येत आहे.


तलावांचा तपशील पुढीलप्रमाणे 

१. महात्मा गांधी स्मारक ऑलिंपिक जलतरण तलाव, दादर (पश्चिम)
२. जनरल अरूणकुमार वैद्य ऑलिंपिक जलतरण तलाव, चेंबूर (पूर्व)
३. सरदार वल्लभभाई पटेल ऑलिंपिक जलतरण तलाव, कांदिवली (पश्चिम)
४. बृहन्मुंबई महानगरपालिका दहिसर (पश्चिम) जलतरण तलाव, कांदरपाडा,दहिसर (पश्चिम)
५. बृहन्मुंबई महानगरपालिका मालाड (पश्चिम) जलतरण तलाव, चाचा नेहरु मैदान,
मालाड (पश्चिम)
६. बृहन्मुंबई महानगरपालिका अंधेरी (पश्चिम) जलतरण तलाव, गिल्‍बर्ट हिल, अंधेरी (पश्चिम)
७. बृहन्मुंबई महानगरपालिका अंधेरी (पूर्व) जलतरण तलाव, कोंडिविटा गाव, अंधेरी (पूर्व)
८. बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी जलतरण तलाव, वरळी जलाशय टेकडी, वरळी
९. बृहन्मुंबई महानगरपालिका विक्रोळी जलतरण तलाव, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
१०. बृहन्मुंबई महानगरपालिका वडाळा जलतरण तलाव, वडाळा अग्निशमन केंद्र, वडाळा