मातृशक्तीच्या माध्यमातून पुन्हा एनडीएचे सरकार आणूया!; सुनिल तटकरे यांचे आवाहन

पेण शहरात महायुतीचा महिला मेळावा संपन्न

    23-Apr-2024
Total Views |
sunil
 
मुंबई : "देशात 'नमो नारी शक्ती' अभियान सुरू झाले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अदितीने चौथे महिला धोरण राज्यातील महिलाशक्तीसाठी जाहीर केले आहे. या सरकारने मातृशक्तीचा सन्मान केला आहे. या मातृशक्तीच्या माध्यमातूनच पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आणून नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करायचे आहे", असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी सोमवार, दि. २३ एप्रिल रोजी महिला मेळाव्यात केले.
 
महायुतीच्या महिला मेळाव्याला माजी मंत्री आमदार रवींद्र पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार धैर्यशील पाटील, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, पेणच्या नगराध्यक्ष प्रितम पाटील, यांच्यासह महायुतीच्या महिला तालुकाध्यक्षा, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांना संबोधित करताना तटकरे म्हणाले, महिलांना संसदेत व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण कॉंग्रेसने दिले नाही मात्र नरेंद्र मोदी यांनी आरक्षण देऊन ही किमया केली आहे. क्रांतिकारी निर्णय मोदींनी घेतले आहेत. सूक्ष्म - लघू उद्योगातून ३३ टक्के सबसिडी महिलांना मिळते. बचत गटांना फिरता निधी ३० हजार रुपयांचा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला, अशी माहितीही त्यांनी दिली.
 
आचारसंहिता लागू आहे याचे भान मला आहे पण तुमच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विलंब लागणार नाही. दूर पल्ल्याच्या गाड्या पेण येथे थांबण्यासाठी प्रयत्न करेन. खासदार झाल्यावर पेण ते मुंबईपर्यंतचा जोडणारा रेल्वे आखणीचा रोडमॅप माझा तयार असणार आहे. पेण तालुक्यातील गावाखेडयात ४जी आणि ५जी नेटवर्क उभे केले जाईल. जगाच्या पाठीवर गणपतीच्या मूर्ती तयार करणारे एकमेव पेण हे शहर आहे. मूर्तीबाबत पर्यावरण विभागाने काही अटी टाकल्या आहेत. हा प्रश्न लोकसभेत सोडविण्याचा प्रयत्न करेन. मतदाराच्या रुपाने मी पेणकर असल्याने या शहराचा कालबद्ध पध्दतीने विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आश्वासन सुनिल तटकरे यांनी दिले.
 
मतदारसंघाचा कालबद्ध पद्धतीने विकास करणार
रायगड लोकसभा मतदारसंघातील विकाकामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. घड्याळाला मत म्हणजे राष्ट्रहिताला मत... घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत... घड्याळाला मत म्हणजे तटकरेंना मत... हे घराघरात जाऊन सांगावे लागेल, असे सुनिल तटकरे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले.