प्रयत्न प्रामाणिक असल्यास यश निश्चित...

    23-Apr-2024
Total Views |
mansa
आईवडील आजही रोजंदारीवर शेतमजूर. अशात केवळ नशिबाला नावे ठेवत, रडत न बसता जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालणार्‍या धुळ्यातील दीपक निकम यांची ही यशोगाथा...
साध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास, तुका म्हणे’ या उक्तीप्रमाणे एखादी गोष्ट साध्य करायची असेल, तर त्यामागील एकमेव कारण म्हणजे, अभ्यासात सातत्य ठेवणे होय. ही संतवाणी आजच्या जगात खरी ठरताना दिसते. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर दुष्काळी भागातील शेतमजुराच्या मुलाने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.
 
दीपक निकम यांना गरिबी तशी पाचवीला पुजलेली. आईवडील ऊस तोडणीसाठी गुजरातमध्ये गेले असता, तिथेच दीपक यांचा जन्म झाला. दीपक यांचे आईवडील आजही शेतात रोजंदारीवर मजुरी करतात. दीपक यांचे सिताने हे धुळ्यातील छोटेसे गाव. दीपक यांना दोन भाऊ, एक बहीण. तिघांची लग्न झालेली. घरात आजोबा असल्यापासून घरगुती हिंसाचार हा रोजचाच. त्यामुळे दीपक यांना बालपणापासून स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराविषयी प्रचंड चीड. अशात आपल्याला काय करता येईल, याचा विचार ते नेहमी करत. घरची मंडळी गुजरातमध्ये ऊसतोडणीसाठी गेल्यावर दीपक यांना शिक्षणासाठी आजीकडे ठेवत. दीपक यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. पुढे पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण जळगाव जिल्ह्यातील मेहूनबारे येथील बोर्डिंग शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. तसेच, पदवीचे शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण केले. पाचवीपासूनच त्यांना वाचनाची विशेष आवड असल्याने ग्रंथालयात ते पुस्तकांमध्ये तासन्तास रमून जात. त्यामुळे, संपूर्ण शैक्षणिक जीवनात अभ्यासाचा ताण कधीच जाणवला नाही.
 
दरम्यान, आठवीत असताना दीपक यांच्या शाळेला सध्याचे ‘आयआरएस’ प्रवीण चव्हाण यांनी भेट दिली होती. त्याच दरम्यान दीपक यांनी आपणही असाच मोठा अधिकारी होण्याचे ठरवले. दीपक हे बालपणापासूनच अभ्यासात हुशार असल्याने त्यांना खात्री होती की, स्पर्धा परीक्षेत त्यांना यश मिळवता येईल आणि अभ्यास हीच आपल्या जमेची बाजू ठरेल, हे त्यांना पक्के ठाऊक होते. दीपक यांना स्पर्धापरीक्षेची तयारी खरंतर बारावी झाल्या झाल्या करायची होती, परंतु घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने ‘प्लॅन बी’ म्हणून त्यांनी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करून घेतला जेणेकरून स्पर्धापरीक्षांमध्ये यश न मिळाल्यास, डिप्लोमाच्या आधारे कोठेतरी नोकरी मिळवता येईल. दरम्यान, घराला आर्थिक हातभार लागावा आणि स्पर्धापरीक्षांच्या शिकवणीसाठी पैसे जमवता यावे, यासाठी त्यांनी पुणे येथे खासगी कंपनीत नोकरी केली. दीड वर्ष नोकरी करून जमवलेले पैसे काही घरी दिले, तर काही शिकवणीसाठी वापरले.
 
याच काळात त्यांना डबल न्युमोनिया आणि टीबीने ग्रासले. अशात २०१९चे सहा महिने आजारपणातच गेले. उरलेल्या सहा महिन्यांत घरीच पूर्णवेळ अभ्यासाला सुरूवात केली. कोरोना असल्याने कोठे बाहेरही जाणे होत नसल्याने पुरेपूर फायदा करून घेत सामान्य ज्ञान पक्के करून घेतले. परंतु, कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती आणखीनच ढासळली. यामुळे दीपक यांनी पुन्हा नोकरी करण्याचा निर्णय घेतला. छ. संभाजीनगरमध्ये एका कंपनीत नोकरी करत असताना, जसा वेळ मिळेल तसा अभ्यास सुरू केला. सन २०२० मध्ये पहिली परीक्षा दिली. परंतु, यशाने अगदी थोडक्यात हुलकावणी दिली. खचून न जाता, नोकरी आणि अभ्यास सुरूच ठेवला. त्याच दरम्यान २०२१ साली पुन्हा भरतीची जाहिरात निघाली. हा आपल्यासाठी शेवटचा पर्याय समजून नोकरीला राजीनामा देत पूर्णवेळ अभ्यास करून पूर्वपरीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आणि पोलीस उपनिरीक्षक आणि विक्रीकर निरीक्षक पदासाठी पात्र झाले. घरातच घरगुती हिंसाचार पाहिला असल्याने पोलीस पदावर असल्यावर चांगल्या रितीने काम करता येईल, या उद्देशाने पोलीस उपनिरीक्षक पदाची निवड केली.
 
पुढे मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली. वेळप्रसंगी मंदिरातदेखील अभ्यास केला व मुख्य परीक्षाही चांगल्या गुणांनी दीपक उत्तीर्ण झाले. दरम्यान, शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी असलेली परीक्षादेखील ते उत्तीर्ण झाल्याने त्यांच्या बर्‍याच आर्थिक अडचणी दूर झाल्या. आणि पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करता आले. नोकरी करत असतानासुद्धा त्यांनी अभ्यासात कधीच खंड पडू दिला नाही. नोकरी करून दहा-बारा तास अभ्यास केला. स्वत:च्या भाषेत नोट्स काढत नियोजनबद्ध अभ्यास करत, पुढे मुलाखतीचा टप्पा यशस्वीरित्या पार करत दीपक यांनी यशश्री खेचून आणली.
 
“आजची बरीचशी तरुण पिढी मोबाईल, सोशल मीडिया यांच्या आहारी गेली असल्याचे चित्र आहे. परंतु, दुसरीकडे हीच तरुण मंडळी मोबाईलचा वापर हा शिकण्यासाठी करून घेत असतात. मी स्वतः युट्यूबसारख्या माध्यमाचा वापर पूर्णतः शिकण्यासाठी करून घेतला. त्यामुळे मोबाईलचा वापर कोणी कशासाठी करायचा, हे ज्याने त्याने ठरवायला हवे. आजच्या तरुणाईने आपल्या परिस्थितीलाच आपल्या प्रेरणेचा स्रोत बनवले पाहिजे. अभ्यासाचे उचित नियोजन करून दिवसभरात आठ-दहा तास जरी अभ्यास केला, तरी कोणत्याही परीक्षेत यश मिळवता येते. फक्त त्यासाठी प्रयत्न हे प्रामाणिक असावे लागतात,” असे ते आवर्जून सांगतात. दीपक निकम यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ तर्फे शुभेच्छा.
-गौरव परदेशी
८६०५७६८३६६