गोष्ट अहिल्येची

    23-Apr-2024
Total Views |
ahilya
 
‘अहिल्या महिला मंडळ’ ही संस्था गेली २७ वर्ष ’स्वयंसेवेतून समाज स्वास्थ्याकडे’ या उद्दिष्टाने समाजातील सर्व थरातील महिलांचा सर्वांगीण विकास करत आहे. महिलांचे सक्षमीकरण करतानाच तिच्या कुटुंबाचे आणि त्याद्वारे समाजाचे उत्थान करणार्‍या ‘अहिल्या महिला मंडळा‘च्या कार्याचा मागोवा घेऊया... 

गगन सदन तेजोमय,
तिमिर हरुन करुणाकर,
दे प्रकाश देई अभय,
गगन सदन...
 
पेण येथिल ‘अहिल्या महिला मंडळ’, ही संस्था दि. १८ ऑक्टोबर, १९९६ रोजी अस्तित्वात आली. संस्थापिका वासंती देव यांनी ही संस्था पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना आदर्श मानून स्थापन केली. अहिल्या हे नावच घेऊन त्या थांबल्या नाहीत, तर ’स्वयं निर्मितीतून स्वयंपूर्णतेकडे’ हे ब्रीदवाक्य त्यांनी प्रत्यक्षात आणले. अहिल्याबाईंना साजेसा करारीपणा, दूरदृष्टी, विचारांमधील कमालीची सुस्पष्टता ते विचार मांडण्याचे धाडस, अहिल्याबाईंची जिद्द आणि सेवेचा वसा असे सगळे गुण वासंतीताईंच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतात. नुसते व्यक्तिमत्त्वातच नाही, तर त्यांच्या सगळ्या प्रकल्पामधून ते प्रत्यक्ष दिसतात.
 
शिक्षण, आरोग्य, सेवा, कला, स्वीकृत कार्य, याद्वारे सर्व समाज घटक स्वावलंबी बनवणे, महिलांचे स्वास्थ्य, त्यांना स्वावलंबी बनवणे हे संस्थेचे ध्येय आहे. हे ध्येय गाठत असताना आपण करत असलेले कर्म सर्व प्रकारच्या कुशलतेने पार पडले पाहिजे, यावर अहिल्या महिला मंडळ, संस्थेचा कटाक्ष असतो. ‘योग: कर्मसु कौशल्यम्’ ही योगाची व्याख्या इथे प्रत्यक्षात उतरताना दिसते. नवीन शिकण्याची इच्छा, कामाचा ध्यास, प्रकल्प बघताना जाणवतो. ताईंच्या व्यक्तिमत्त्वात अनेक पैलू आहेत. निस्पृहता, हा त्यांचा मोलाचा गुण सगळ्या उपक्रमात प्रकर्षाने जाणवतो. निस्पृहवृत्तीने येणारे तेज त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सहज दिसते. याच गुणातून त्यांनी सहकार्‍यांची एक सक्षम, आणि शिस्तबद्ध काम करणारी टीम तयार केली आहे हे सहकारी अत्यंत, विश्वासाने, प्रेमाने परंतु शिस्तीत काम करतात. त्यामुळे आज मंडळाचे १७ उपक्रम अत्यंत यशस्वी पद्धतीने चालत आहे. महिलांबरोबरच आबालवृद्धांसाठी हे उपक्रम चालवले जातात.
 
वासंतीताईंच्या संवेदनशील स्वभावातून,‘अहिल्या महिला मंडळा‘ची स्थापना झाली. विश्व हिंदू परिषदेचे काम करताना आजूबाजूच्या स्त्रियांची परिस्थिती त्या पाहत होत्या. स्त्रियांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी, त्यांनी या स्त्रियांचे समुपदेशन करायला सुरुवात केली. त्यामुळे बरेच संसार सुरळीत चालू लागले. आजही समुपदेशनाचे कार्य चालू आहे. ‘माहेर’ या उपक्रमाअंतर्गत अल्प का होईना परंतु अर्थार्जन करू इच्छिणार्‍या महिलांकडून भाजणी, मेतकूट, मसाले, विविध प्रकारची लोणची, पापड, मिरगुंड, दिवाळी फराळ, तीळगूळ इ. उत्पादन करून घेऊन त्या उत्पादनाची विक्री मंडळाच्यामार्फत केली जाते. ‘स्वयंसिद्धा’ या उपक्रमात शिलाईचे प्रशिक्षण दिले जाते. आदिवासी महिला, विधवा परिवक्त्या यांना यातून काम मिळते. लहान बाळांसाठी सुती कपडे, फ्रॉक, रजया आणि विविध प्रकारचे कपडे येथे शिवले जातात. या उपक्रमातून ५०० महिलांना शिलाईचे शिक्षण मिळाले असून, ३० महिलांना कायमस्वरूपी रोजगार निर्माण झाला आहे. याच पद्धतीने तरणखोप जवळ आरोहिणी उद्योग केंद्रात महिलांसाठी विविध उद्योग निर्मिती करणे हा उपक्रम राबवला जातो.
 
ahilya
 
‘स्वाद भारती’ या उपक्रमाद्वारे विविध ठिकाणी काम करणारे कर्मचारी पुरुष अथवा स्त्री, कॉलेज शिक्षणासाठी येणारी मुले यांना डबे पुरवण्याचे काम केले जाते. शिवाय सण-समारंभासाठी मागणी केलेले पदार्थ, अथवा नाश्ता तयार केला जातो. ताजे व चविष्ट अन्न रोज २०० लोकांना पुरवले जाते. सरकारच्या ‘शालेय पोषण आहार योजने’द्वारा दिला जाणारा आहार येथे बनवला जातो. या उपक्रमाद्वारे, दहा महिलांना काम मिळाले आहे. तसेच अहिल्या महिला मंडळाच्या सेवा प्रकल्पाचा भाग म्हणून चालवण्यात येणार्‍या आनंदी वसतिगृहातील मुली व संजीवन आश्रमातील आजी आजोबा, यांच्यासाठीसुद्धा भोजन व्यवस्था इथेच होते. दि. ३१ डिसेंबर या दिवशी वर्षातून एक दिवस तरी माहेरपणाचे सुख अनुभवावे या हेतूने, ‘स्नेह सखी’ या प्रोजेक्टअंतर्गत ४० ते ६० वयोगटातील महिलांसाठी मेळावा घेतला जातो. या मेळाव्यात विविध वयोगटातील महिलांसाठी अनेक विषयातील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. आजवर ५०० महिलांनी यांचा लाभ घेतला आहे. या मेळाव्यातसहभागी होणार्‍या महिलांना अल्पशी भेटदेखील दिली जाते.
 
मुक्ताई विद्या मंदिर हा प्रकल्प पेणपासून आठ किलोमीटर असलेल्या हेटवणे या गावी आहे. आदिवासी पाड्यावरील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, या हेतूने शिशुवर्ग ते चौथीपर्यंत वर्ग सुरू आहेत. ५० विद्यार्थी संख्येने सुरू झालेल्या या शाळेत इयत्ता चौथीपर्यंत २५० विद्यार्थी शिक्षण घेतात. विनाअनुदान तत्त्वावर चाललेल्या या शाळेत दोन प्रशिक्षित शिक्षक व दोन सेविका मानधनावर काम करतात. या कार्यात शिक्षकांचे फार मोठे व मोलाचे योगदान आहे. आजपर्यंत चौथी पास होऊन पाच हजार विद्यार्थी बाहेर पडले आहेत. हे विद्यार्थी आज सर्व क्षेत्रात प्रगतिपथावर आहेत. इयत्ता चौथीतील दोन मुलांना शिष्यवृत्तीदेखील मिळाली आहे, यात काही मुलींचा खर्च संस्था उचलते. आज या मुली बारावी उत्तीर्ण होऊन कॉलेज शिक्षण घेत आहेत. अहिल्या महिला मंडळाची धुरा पुढच्या पिढीने हाती घेतली आहे. वासंतीताईंच्या कन्या अश्विनी यांच्या समर्थ हातात ही जबाबदारी सोपवली आहे. यापुढेही ‘अहिल्या महिला मंडळा‘च्या महिला सक्षमीकरणाचे हे कार्य समाजासाठी दीपस्तंभच असणार आहे.
संजीवन आश्रम
उतारवयात येणारा एकाकीपणा नाहीसा व्हावा, त्यांच्या मनात विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी संजीवन आश्रम सुरू झाला. आज आश्रमात ५० ज्येष्ठ राहत आहेत, त्यामध्ये मतिमंद, गतिमंद, निराधार, विकलांग, मूकबधिर इत्यादींचा समावेश आहे. अहिल्या महिला मंडळाच्या कामाचा पसारा अफाट आहे, संस्थापिका वासंती देव यांच्या मार्गदर्शनातून उत्तम सहकार्‍यांची टीम निर्माण झाली आहे. त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने इतके सगळे उपक्रम लीलया पार पाडतात.
इंदिरा संस्कृत पाठशाळा
सर्वसामान्य व्यक्तीस संस्कृत भाषा परिचयाची व्हावी आणि संस्कृत भाषेचा वारसा अखंड चालू राहावा, या हेतूने इंदिरा संस्कृत पाठशाळेची निर्मिती झाली. आज विविध विद्यालयात ४० हजार विद्यार्थी पुरुष आणि महिला शिकत आहेत. १२ महिला पौराहित्याचे शिक्षण घेऊन पौराहित्य करू लागल्या आहेत. ‘नलिनी प्रशिक्षण केंद्र’ याद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्याकरिता विविध प्रकारचे प्रशिक्षण महिलांना दिले जाते. तसेच, स्वयंरोजगारास प्रोत्साहन दिले जाते.
आनंदी वसतिगृह
डोंगर पाण्यात राहणार्‍या सुमारे दहा पाड्यावरील इयत्ता तिसरी ते बारावीमध्ये शिकणार्‍या कातकरी समाजातील मुलींसाठी आनंदी वसतिगृह चालवले जाते. आज या वसतिगृहाचा लाभ ३८ मुली घेत आहेत. याशिवाय डॉक्टर घाटे आरोग्य केंद्र, पॅथॉलॉजिकल लॅब, कृष्णाजी रानडे ब्लड स्टोरेज सेंटर, कौटुंबिक सल्ला केंद्र, असे वैद्यकीय सेवा पुरवणारे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले जातात.

कल्याणी काळे
९८१९२२६०६७