हिंदूंच्या यापूर्वी लुटलेल्या संपत्तीचे काय?

    23-Apr-2024
Total Views |

rahul modi


काँग्रेस केंद्रात सत्तेवर येईल, याची शक्यताही नसली, तरी त्या पक्षाच्या हेतूंकडे कदापि दुर्लक्ष करून चालणार नाही. हिंदू आणि अन्य धर्मांमध्ये काँग्रेसने नेहमीच भेदभाव केलेला आहे. हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणाखाली आणण्याचा हेतूच या मंदिरांमध्ये जमा होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवर ताबा मिळविणे हा होता. या निधीचा वापर आपल्या मुस्लीम मतपेढीला अनेक सुविधा मोफत देण्यासाठी केला जातो. आता तर काँग्रेसने लोकांच्या वैयक्तिक संपत्तीवरच डोळा ठेवला आहे, हे आक्षेपार्ह आहे.
 
काँग्रेस निवडणूक जाहीरनाम्यात नेहमीच वादग्रस्त मुद्दे असतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ मुस्लिमांसाठी रुग्णालये बांधण्याचे आश्वासन दिले होते. त्यातूनच काँग्रेसची धार्मिक आधारावर भेदभाव करण्याची मानसिकता स्पष्ट होते. यावेळी तर काँग्रेसने सूचकपणे एक भयंकर आश्वासन दिले आहे. ‘इंडी’ आघाडी सत्तेवर आल्यास देशात जातीय जनगणना तर केली जाईलच, पण जनतेची सामाजिक व आर्थिक पाहणीही केली जाणार आहे. वरकरणी ही तशी क्षुल्लक बाब वाटत असली, तरी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून त्यामागचा कुटिल हेतू उघड केला. “या आर्थिक पाहणीनंतर देशातील श्रीमंत लोकांकडील संपत्तीचे फेरवितरण केले जाईल आणि देशातील गरिबीचे एका झटक्यात उच्चाटन केले जाईल,” असे राहुल गांधी यांनी सांगितले. थोडक्यात, सरकार चक्क लोकांनी कष्टाने कमावलेली संपत्ती ताब्यात घेईल आणि आपल्या मतपेढीत तिचे वाटप करील. ही गोष्ट भाजप नेत्यांनी, विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे आपल्या भाषणातून उघड केली आहे. आपले कुटिल कारस्थान उघड झाल्यामुळे चिडलेल्या काँग्रेस नेत्यांनी, ‘चोरी, उपरसे सीनाजोरी’ अशी भूमिका घेऊन मोदी यांच्यावरच जातीयवादाचा आरोप केला आहे.
 
मोदी यांनी राजस्थानमधील प्रचारसभेत काँग्रेस लोकांकडील केवळ पैसेच नव्हे, तर दागिने, सोनेनाणे तसेच अचल संपत्तीही सरकार जप्त करणार असून, त्याची वाटणी अल्पसंख्य समाजात करणार असल्याचे सांगत, काँग्रेसचा खरा हेतू उघड केला. काँग्रेसचा हा हेतू ही त्या पक्षाची पूर्वीपासूनच इच्छा आहेे. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी ‘देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे,’ असे नि:संदिग्ध विधान केले होते. त्या विधानाचे व्यावहारिक स्वरूप म्हणजेच ‘काँग्रेसप्रणित संपत्तीचे फेरवाटप’ असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. पण, केवळ संपत्तीचे फेरवाटप करण्यापुरतेच काँग्रेसचे हे कारस्थान मर्यादित नाही. त्याचा व्यापक अर्थ आणि भावी परिणाम लक्षात घेणे गरजेचे आहे.
 
काँग्रेसचे मनोधैर्य पूर्णपणे गळून गेले असून, सत्तेप्राप्तीसाठी काँग्रेसने थेट जातीयवादाचा आश्रय घेतला आहे. केवळ मुस्लिमांच्या मतांवर या पक्षाची भिस्त आहे. त्यामुळे कसेही करून मुस्लिमांचे लांगूलचालन करण्याचे नवनवे उपाय हा पक्ष शोधतो आहे. राहुल गांधी यांनी नुकत्याच आपल्या एका भाषणात देशातील गरिबीचे एकाच झटक्यात उच्चाटन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार देशातील गरिबांच्या (म्हणजे फक्त मुस्लिमांच्या) खात्यात पैसे कसे ‘खटाखट खटाखट’ भरले जातील, ते राहुल गांधी यांनी सांगितले होते. ते आश्वासन ते कसे पूर्ण करणार आहेत, तेच मोदी यांनी स्पष्ट केल्यावर मात्र काँग्रेसला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला.
 
हिंदूंच्या संपत्तीवर परकीयांचा डोळा पूर्वीपासूनच होता. भारतावर प्राचीन काळापासून अनेक आक्रमणे झाली, त्यांचा हेतूच भारतातील संपत्तीची लूट करणे, हा होता. भारतातील सोमनाथ, मथुरा, काशी, अयोध्या वगैरे प्रमुख देवस्थानांकडे अपार संपत्ती होती. सगळ्याच परकीय आक्रमकांनी भारतातील सर्व संपत्ती अक्षरश: ओरबाडून नेली. पण, हिंदूंची लूट स्वातंत्र्यानंतरही थांबली नाही. केवळ जन्माने भारतीय असलेले, पण मनाने इंग्रजांची मानसिकता जोपासलेल्या सत्ताधार्‍यांनी हिंदूंचा आर्थिक, सामाजिक, धार्मिक शक्तिपात केला. स्वकीयांच्या या गद्दारीने हिंदूंमधील तेजस्वी क्षात्रतेज लोपून गेले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सत्ताधार्‍यांनी देशात हिंदू वरचढ होऊ नयेत, यासाठी विविध कायदे केले. जम्मू-काश्मीरमध्येही ८०-९०च्या दशकात हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले. मशिदींच्या भोंग्यांवरुन हिंदूंना जीवेमारण्याच्या, त्यांच्या बायकांची अब्रू लुटण्याच्या धमक्या देऊन, हिंदूंना काश्मीरमधून पलायन करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. त्यानंतर घरदार आणि जमीनजुमला मागेच सोडून गेलेल्या हिंदूंची संपत्तीही हडप करण्यात आली. काही वर्षांपूर्वी कैरानामध्येही धर्मांधांच्या भीतीने हिंदूंनी घरदार सोडून पलायन केल्याचाही धक्कादायक प्रकार घडला होताच.
 
आजही मुंबईतील मालवणीसारख्या मुस्लीमबहुल वस्तीत ‘लॅण्ड जिहाद’ची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे आक्रमकांची हिंदूंच्या संपत्तीच्या लुटीची जिहादी मानसिकता आजही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समाजात कायम दिसते. केवळ भौतिक संपत्ती, मालमत्ताच नव्हे तर शिक्षण क्षेत्रातही खोटा आणि सोयीस्कर इतिहास शिकविला गेला आणि पुढील तीन पिढ्यांचे ‘ब्रेनवॉशिंग’ करण्यात आले. हिंदूंना त्यांचेच धर्मग्रंथ शिकण्यावर बंदी घालण्यात आली. देशातील सर्व मंदिरे सरकारच्या नियंत्रणाखाली आली, पण मशिदी व चर्चेस मात्र संबंधित धर्मातील धर्मगुरूंच्याच हाती ठेवण्यात आली. हिंदूंचे सक्तीने लोकसंख्या नियंत्रण करण्यात आले, पण अन्य धर्मियांवर तशी कोणतीच सक्ती करण्यात आली नाही. लवकरच मुस्लिमांसाठी वैयक्तिक कायदा करण्यात आला. वक्फ बोर्डाचा कायदा करण्यात येऊन हजारो एकर जमिनी त्या बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आल्या. हीसुद्धा हिंदूंची लूटच होती. पुढे तर नरसिंह राव यांनी प्रार्थनास्थळांचा कायदा करून हिंदूंच्या धार्मिक उत्थानाचे मार्गच बंद केले.
 
लूट केवळ पैशांची नसते. एखाद्या समाजाचा आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि आत्मभान हिरावून घेणे हीसुद्धा लूटच आहे. ही लूट करणारे तुघलक आजही काँग्रेसमध्ये आहेत. पैशाची लूट भरून काढता येईल, पण गेलेला आत्मविश्वास आणि आत्मसन्मान भरून येण्यास कित्येक दशके जावी लागतील. त्यासाठी समाजाला एकजूट आणि एकसंध करावे लागेल. त्याला त्याच्यावरील अन्यायाची जाणीव करून द्यावी लागेल आणि तो अन्याय दूर करण्याची उमेद जागृत करावी लागेल. मोदी आणि भाजप नेमके हेच काम करीत आहेत. हिंदूंना जाग येण्यास नेहमीच वेळ लागतो. पण अन्य समाजांना मोदी आणि भाजपचे हेतू काय आहेत, ते अचूक ठाऊक झाले आहेत. मोदी यांना विरोध होत असतो, तो याचमुळे की ते सत्तेवर राहिले, तर हिंदू पुन्हा आत्मविश्वास मिळवेल आणि आपल्यावरील अन्यायाचे परिमार्जन करेल. त्याचा प्रारंभ झाला असला, तरी तो व्यापक प्रमाणात पसरू नये, म्हणून हिंदूंना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे कारस्थान काँग्रेसने रचले आहे. मोदी यांनी ते उघड केल्यामुळे काँग्रेसची मते मात्र ‘खटाखट खटाखट’ कमी होतील, अशी अपेक्षा आहे.