“महाराष्ट्र सरकार आणि सायबर सेलकडे…”, दिग्दर्शकाची चिन्मय मांडलेकरसाठी पोस्ट

22 Apr 2024 13:45:47
मराठी कलाविश्वातून कलाकारांकडून चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशई विनंती केली जात आहे.
 

chinmay  
 
मुंबई : अभिनेते चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांना त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यामुळे त्यांनी मोठा निर्णय घेत यापुढे कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही असे जाहिर केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतूनही त्यांचे समर्थन अनेकांकडून (Chinmay Mandalekar) केले जात आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी एक विशेष पोस्ट करत महाराष्ट्र सरकारकडे ट्रोलर्स विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
चिन्मय मांडलेकर यांनी त्यांची ही भूमिका मागे घ्यावी अशी मागणी त्यांचे चाहते आणि मराठी कलाकार देखील करत आहेत. गौतमी देशपांडे, सुरुद गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर, शिवाली परब, मृण्मयी देशपांडे अशा अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत त्यांना पाठिंबा देत ‘कृपया हा निर्णय मागे घे’ अशी विनंती केली आहे. आता रवी जाधव यांनी देखील एक पोस्ट करत लिहिले आहे की, “चिन्मय आणि नेहा आम्ही सर्व सदैव आपल्या कुटुंबाबरोबर आहोत. असल्या ट्रोलर्सवर कडक कारवाई करण्याची विनंती मी सायबर सेल तसेच महाराष्ट्र सरकारकडे करतो. चिन्मय आपण आपला निर्णय मागे घ्यावा ही नम्र विनंती”.
 

chinmay
काय म्हटले चिन्मय यांनी व्हिडिओमध्ये?
 
“छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो, असं चिन्मयनं त्याच्या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. मी लेखक, दिग्दर्शक , अभिनेता अशा अनेक भूमिका पार पडल्या. छत्रपती शिवरायांच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. पण माझ्या मुलाचं नाव जहांगिर आहे म्हणून आम्हाला अतिशय वाईट पद्धतीनं ट्रोल केलं जातंय. एक व्यक्ती म्हणून मला त्याच्या खूप त्रास होतोय . माझ्या कुटुंबियांना अशा पद्धतीचा मानसिक त्रास होणार असेल तर, मी आज नम्रपणे सांगतो की, इथून पुढं मी ही भूमिका करणार नाही. मी आज पर्यंत सहा चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, पण आता नाही. छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो”. असे चिन्मयने स्पष्ट केले आहे.
Powered By Sangraha 9.0