आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा!

    22-Apr-2024
Total Views |
loksabha
राज्यातील रेकॉर्डब्रेक उन्हाच्या झळांनी केवळ तापमानातच लक्षणीय वाढ झालेली नाही, तर उष्माघाताच्या बळींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. तेव्हा, ऋतुनुसार जीवनशैलीतील बदलांचा विचार करता, उन्हाळ्यात केवळ द्रवपदार्थांचे सेवन वाढवण्याबरोबरच अन्य पथ्येही पाळणे तितकेच गरजेचे. तेव्हा एकूणच उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
वर्षी उन्हाळ्याने कहर केला आहे. महामुंबईच्या काही भागांत तापमानाचा पारा चक्क ४० अंश सेल्सियसच्या वर गेला. मुंबई हे समुद्र किनार्‍यालगतचे शहर, त्यामुळे येथे तीनही ऋतू सुसह्य असायचे. आता मात्र परिस्थिती बदलत चालली आहे. शहरीकरणाच्या नावाखाली येथे सिमेंटचे जंगल उभारण्यात येत आहे. वृक्ष लागवड हा इतिहासजमा झालेला विषय. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यास काय परिणाम होतो, हे आपण सर्वच जण अनुभवत आहोत. मुंबईत राहून आपण नागपूरचा उन्हाळा अनुभवत आहोत. मुंबईची हवा दमट असल्यामुळे या दिवसात घामदेखील प्रचंड येतो. अंगावरील कपडेदेखील ओले होऊन जातात. उन्हाळ्यातील उष्णतेमुळे अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. काही महिन्यांपूर्वी आपण अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे प्राणप्रतिष्ठापना केली. ५०० वर्षांनी अयोध्येत रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. आध्यात्मिकदृष्ट्या या सर्व गोष्टी बघायला मिळत आहे, हे आपले भाग्य आहे. हे सर्व घडत असताना माणुसकीला काळीमा फासणारी वर्तवणूक आपल्यातील काही लोकांकडून घडत आहे आणि त्याची शिक्षा आपण सगळेच भोगत आहोत.
 
माणसची हिंसाचारी वृत्ती, धर्मांमध्ये असलेलीतेढ, आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणारी दीर्घकालीन युद्धे, दहशतवाद, राष्ट्रविरोधी कारवाया, दिवसाढवळ्या होणारा गोळीबार, गँगवॉर, खंडणी, भ्रष्टाचार, सत्तेचा वापर अमर्याद संपत्ती जमा करण्यासाठी करणे या सर्व गोष्टींमुळे निसर्ग आपल्यावर नाराज आहे. अवर्षण आणि अतिवर्षण, अवकाळी पाऊस ही सर्व कोपलेल्या निसर्गाची रुपे आहेत. नाही देवासारखे वागता आले तरी किमान माणसासारखेवागा, अशी निसर्गाची आपल्याकडून माफक अपेक्षा आहे. पण, जेव्हा तीदेखील आपल्याकडून पूर्ण होत नाही, तेव्हा आपल्याला निसर्गाच्या प्रकोपास सामोरे जावे लागते. सध्या अनुभवत असलेला प्रचंड उन्हाळा हा त्याचाच एक भाग.
 
उष्माघातामुळे अनेकांना हॉस्पिटल गाठावे लागते, तर काहींना मृत्यूला सामोरे जावे लागते. मागे स्तंभलेखनात उष्माघातावर विस्ताराने लेख लिहिला होता. याशिवाय कडक उन्हाळ्याची काही लक्षणे शरीरात दिसू लागतात. घाम जास्त येणे, थकवा येणे, भूक मंदावणे, डोक्यामध्ये व अंगावर फोड्या उठणे, अंगावर घामोळे येणे. अंगाला खाज येणे, नायट्यासारखे चर्मरोग होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
 
आहारातील बदल
उन्हाळ्यामध्ये आहारात बदल करण्याची गरज असते. मसालेदार, तिखट जेवण टाळावे. शक्य असल्यास मासांहाराचे प्रमाण कमी करावे. वरण-भात, कमी तिखट भाजी, दही किंवा ताक आणि सॅलड असे साधे जेवण असावे. या दिवसांमध्ये कच्च्या कैर्‍या उपलब्ध असतात. कच्च्या कैरीचे लोणचे जेवणाची चव वाढविते. ताक, लिंबू, सरबत, फळांचा रस, पन्ह यांचे सेवन नियमित करावे. जेवणाच्या वेळा नियमित ठेवाव्या व पाणी जास्त प्रमाणात प्यावे. या दिवसांमध्ये बाजारात देवगड आंबा आलेला असतो. डायबेटीस नसल्यास आंब्याचे सेवन माफक प्रमाणात करण्यास हरकत नाही. नारळ पाणी, ताडगोळे, निरा हे पदार्थदेखील उन्हाळ्यात फायदेशीर ठरू शकतात.
 
उन्हाळ्यात सकाळी लवकर उठावे. व्यायाम, योगा आणि ध्यानसाधना ऊन चढेपर्यंत आटोपून घ्यावे. ऊन जास्त असल्यास घराच्या बाहेर पडणे जरूरी असेल तरच जावे. शक्य असल्यास डोक्यावर पांढरे उपरणे घ्यावे, पोशाख पांढरा असावा. काळे कपडे घालणे टाळावे. स्त्रियांनी डोक्यावर पांढरा स्कार्फ लावावा. स्कूटरचा वापर करणार असाल, तर स्कूटरच्या सीटवर जाडसर रुमाल टाकावा.
 
उन्हाळ्यात मेहनतीची कामे करणार्‍या मजुरांनी विशेष काळजी घ्यावी. अंगमेहनतीचीकाम करणारे शेतमजूर, सफाई कामगार, रस्त्यावर खोदकाम करणारे, इमारतीचे बांधकाम करणारे मजूर यांना उन्हाचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. अशा लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असते. ठरावीक वेळानंतर सावलीत बसणे, पाणी भरपूर प्रमाणात पिणे, कामाची सुरुवात सकाळी लवकर करणे म्हणजे उन्हाचा कमी त्रास होतो. उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी. शक्य असल्यास दिवसातून दोन वेळा आंघोळ करावी.
ज्यांच्या घरी वातानुकूलिन यंत्र, कुलर आहे, अशा लोकांना ऊन बाधत नाही. ते जास्तीत जास्त वेळ थंड वातावरणात असतात. फार कमी लोकांना हे सुख अनुभवता येते. चाळीमध्ये राहणारे, पत्र्याच्या घरांमध्ये राहणारेलोक यांचे खरे हाल या उन्हाळ्यात होतात. लहानशा घरात, छताचे पत्रे तापल्यावर तेथे बसणेदेखील कठीण होऊन जाते. पंख्याच्या हवेचा अशा वेळेस काही उपयोग होत नाही.
 
उन्हाळ्यात आजारी पडल्यास अजिबात हयगय करू नये. डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा. ताप, उलट्या, जुलाब, अंगावर पुरळ उठणे, गालगुंड होणे यांसारख्या आजारांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे व लवकर बरे व्हावे.उन्हाळ्याच्या सुरुवातीस शारीरिक व्याधी जडतात. जसा उन्हाळा स्थिरावतो, आपल्या शरीरातही विशिष्ट बदल होतात व आपलेशरीर रखरखत्या उन्हाळ्याशी सामना करण्यास सज्ज होते.
 
प्रतिबंधात्मक उपाय
उन्हाळा आपल्याला बाधणार नाही, यासाठी काळजी घ्यावी. सकाळी लवकर उठून आपली कामे लवकर आटोपून घ्यावीत. न्याहरीमध्ये भाताची पेज, घावणे, पोहे, उपमा यांचा समावेश असावा. शक्य असल्यास न्याहरीच्या वेळेस एखादे फळ घ्यावे. न्याहरीनंतर दोन ते तीन तासांनी लिंबू सरबत, ताक, पन्हे, नारळाचे पाणी घ्यावे. वरिष्ठ नागरिकांनी उन्हामध्ये घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. दुपारचे जेवण वेळेवर घेऊन वामकुक्षी घ्यावी. संध्याकाळी वातावरण थोडे थंड झालेले असते. अशा वेळेस बागेत चालण्याचा व्यायाम करण्यास हरकत नाही.
 
शक्य असल्यास रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करणे. त्यामुळे पुढच्या दिवशी सकाळी लवकर उठता येईल. आपली दिनचर्या सुटसुटीत ठेवावी. वरिष्ठ नागरिकांनी आपले छंद जोपासावे व सांसारिक जबाबदार्‍या कमी करण्यावर भर द्यावा. आपले मन आनंदी राहील यासाठी प्रयत्न करावा. वैयक्तिक पातळीवर वरील काही उपाय उपयोगी पडू शकतात.
 
कुटुंब म्हणून व समाज म्हणून आपण प्रतिबंधात्मक उपायांचा विचार केला, तर तो जास्त प्रभावी ठरतो. प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून करावी. आपले अनुकरण इतरांनी करावे, असे आपले वागणे असावे. धुम्रपान, मद्यपान शक्यतो टाळावे.
प्रतिबंधाचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा संपूर्ण समाजाचा त्यात सहभाग असावा. फक्त पंतप्रधान वा मुख्यमंत्री यांच्या आदर्श वागण्याने परिस्थिती सुधारणा नाही, तर त्यात संपूर्ण समाजाचा सहभाग अपेक्षित आहे. २०१४ साली सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ला चांगला प्रतिसाद मिळाला. पंतप्रधानांनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले. त्याला सर्व समाजाचा चांगला प्रतिसाद मिळाला. आज आपण कचरा स्वैरपणे कुठेही टाकत नाही. मुंबईतर कचराकुंडी मुक्त झाली आहे.
पर्यावरणाच्या बाबतीतही असेच काही घडावे. शहरात उत्तुंग इमारती बांधतांना त्याचा किती ताण शहरावर पडेल, याचा विचार टाऊन प्लॅनिंगच्या वेळेस व्हावा. उत्तुंग इमारतीमुळे वाढणारी वस्ती, वाढलेल्या मोटर गाड्या, स्कूटर्स, वाहतुकीचा होणारा खोळंबा, वाढते प्रदूषण यांचादेखील विचार नवीन इमारतींना परवानगी देताना करावा. दाटीवाटीने वसलेले शहर, तेथील वाहतूक समस्या, प्रदूषण या सर्वांचा विचार फक्त सरकारने न करता तो सामान्य नागरिकांनीदेखील करावा व प्रदूषण रोखण्यात आपला खारीचा वाटा उचलावा. आपल्या कार-स्कूटरची सर्व्हिसिंग नियमित करून घ्यावी. आपले पीयुसी चेकिंग नियमित करून घ्यावे, ज्याने प्रदूषणावर आळा बसू शकेल.
 
आता वळू या ‘झाडे लावा’ मोहिमेकडे...
शहरात वाढलेल्या इमारतींमुळे झाडे लावण्यास अनेक अडचणी येतात. नवीन इमारती बांधताना अनेक झाडांची कत्तल केली जाते. नवीन झाडे लावण्यासाठी विकासकाला सांगितले जाते. पण, ते फक्त कागदोपत्री राहते. झाड लावले जाते, पण ते जीवंत आहे का हे बघण्याचा कुणी त्रास घेत नाही. त्या झाडाला नियमित पाणी दिले जात नाही. त्यातही एखादे झाड मोठे झाले, तर ती प्रभूकृपा समजावी. आपल्याकडे अनेक सामाजिक संस्था वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतात. यासाठी लागणारी रोपे महानगरपालिकेतर्फे फुकट वितरित केली जातात. बर्‍याचशा संस्था फोटो काढण्यासाठी असे कार्यक्रम करतात. पुढे त्या झाडाचे काय झाले, त्याला नियमित पाणी दिले जाते की नाही, त्याची वाढ होते की नाही हे पाहण्यासाठी संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडे वेळ नसतो. या मानसिकतेत बदल होण्याची नितांत गरज आहे. वर्षाकाठी एक किंवा दोनच झाडे लावावी. पण, त्यांना नियमित पााणी घालण्याची व त्याची देखभाल करण्याची पण आपण जबाबदारी स्वीकारावी. आज मुंबईत ४० अंश सेल्सियसचा उन्हाळा आपण सोसतो आहे. त्यावर मात करण्याचा प्रयत्न फक्त सरकारने न करता त्यात संपूर्ण समाजाचा मनापासून सहभाग असावा.
हा कडक उन्हाळा आपल्याला सुसह्य व्हावा, ही सदिच्छा!
डॉ. मिलिंद शेजवळ
९८९२९३२८०३