आपत्कालीन परिस्थिती हाताळत एका तासात रेल्वे रुळावर

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे मॉक ड्रिल

    22-Apr-2024
Total Views |

railway

मुंबई, दि.२२ :
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलासोबत (एनडीआरएफ) मोठ्या अपघातांच्या वेळी दक्षता आणि प्रतिसाद वेळ तपासण्यासाठी संयुक्त मॉक ड्रिल घेण्यात आले. सोमवार, दि. २२ एप्रिल रोजी इगतपुरी अप यार्ड येथे संयुक्त मॉक ड्रिल सादर करण्यात आले. कृत्रिम अपघाताची परिस्थिती निर्माण करून, ज्यात एक डबा रुळावरून घसरून अचानक आग लागलेल्या डब्यात प्रवासी अडकल्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली.
 
 
संकटकाळातील तयारी आणि प्रभावी प्रतिसाद यंत्रणेच्या माध्यमातून प्रवाशांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेची वचनबद्धता या सरावातून दिसून आली. विविध यंत्रणांमधील यशस्वी समन्वयामुळे आपत्कालीन परिस्थिती सक्षमपणे हाताळण्याची रेल्वेची तयारी यामुळे अधोरेखित होते. अशी कोणतीही दुर्घटना भविष्यात घडू नये तसेच अशी कोणतीही घटना घडल्यास तत्काळ कारवाई करण्यात यावी, असे मुंबई विभागाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. अपघाताची पूर्वतयारी आणि त्याच्या जलद प्रतिसादासाठी रेल्वेकडून संयुक्तपणे असे सराव सुरू राहतील. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या सुरक्षा विभागाने या सरावाचे संयोजन केले होते.

असा घडला घटनाक्रम

डब्याला तात्काळ आग लावण्यात आली. सदर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांकडून सकाळी ११.१० वाजता मुंबई विभागाच्या नियंत्रण कक्षाला निरोप देण्यात आला. नियंत्रण कक्षाने तातडीने कार्यवाही करत एनडीआरएफ, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि रेल्वे अपघात मदत वाहन (एआरटी) आणि सर्व संबंधितांना संदेश पाठविला. सकाळी सव्वा अकरा वाजता रेल्वेची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तसेच एनडीआरएफची एक तुकडी सकाळी ११.१९ वाजता घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी तत्काळ संरक्षण दलाच्या व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. रेल्वेच्या कार्यरत कर्मचाऱ्यांकडून अग्निशामक यंत्रांचा वापर करून त्यांनी ११.२४ वाजता आग नियंत्रणात आणली. स्थानिक पोलिस सकाळी ११.३५ वाजता घटनास्थळी दाखल झाले. अपघात मदत वैद्यकीय उपकरणे (एआरएमई) सकाळी ११.३८ वाजता घटनास्थळी पोहोचली. या वेळेत एकूण १८ जखमींना एनडीआरएफच्या टीमने वाचवले. त्याचवेळी एनडीआरएफ आणि एआरटी च्या पथकांनी सदर डब्याचे छत दोन्ही बाजूंनी कापून प्रत्येकी एक जीव वाचवला. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी, एनडीआरएफला प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.
  
अग्निशमन दलाच्या जवानांनी डब्यात घुसून आग पूर्णपणे आटोक्यात आणली. एनडीआरएफच्या टीमने लाइव्ह बॉडी डिटेक्शन श्वान पथकासह उच्च शोधमोहीम सुरू केली व त्यांना त्यादरम्यान दुपारी १२ वाजून ९ मिनिटांनी शौचालयात एक बेशुद्ध व्यक्ती आढळली. अवघ्या काही क्षणात त्याची तेथून सुटका करण्यात आली. या पथकात 'फेरो' नावाचा आठ वर्षांचा कुत्रा देखील आपली भूमिका बजावत होता. दुपारी १२ वाजून १४ मिनिटांनी सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींवर प्रथमोपचार आणि रेल्वेच्या वैद्यकीय पथकाकडून प्रत्येकाच्या तब्येतीची तपासणी करण्यात आली. याकाळात सर्व संबंधितांनी तात्काळ प्रतिसाद दिला आणि तासाभरातच त्यांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. एआरटीने १२.०३ वाजता रेलिंगचे काम पुन्हा सुरू केले आणि १२.१९ वाजता सदर ट्रेन पुन्हा रुळावर आणण्यात आली.