मुंबई, दि.२२ : ठाकरे सरकारच्या काळात धीम्या गतीने सुरू असलेल्या दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाला फडणवीस शिंदे सरकारच्या काळात गती मिळाली. या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील सर्व कामे पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए)कडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे काम दोन टप्प्यात केले जात आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील कामांसाठी सुमारे २५० कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थानाचे जतन व संवर्धन करण्याचा कामाचा समावेश आहे. त्याचबरोबर १५३० चौरस मीटर क्षेत्रफळावर इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकाम करण्यात आले आहे. या इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये संग्रहालय, ग्रंथालय, कलाकार दालन यांचा समावेश आहे. त्याचबरोबर बहुद्देशीय सभागृह आणि प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर बागबगीचा तयार केला जात आहे. ही कामे जवळपास पूर्ण झाली असून अंतिम टप्प्यातील किरकोळ कामे राहिली असून ती पूर्ण करणे सुरू आहे.
दरम्यान, आता एमएमआरडीएने दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी आभा लांबा असोसिएट या सल्लागाराची नियुक्ती केली आहे. सल्लागाराने दुसऱ्या टप्प्यातील डिझाईनचा अहवाल एमएमआरडीएला सादर केला आहे. त्यामुळे एमएमआरडीएकडून या कामासाठी लवकरच कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, चित्रपट, व्हर्चूअल रिअलिटी, हार्डवेअर आणि सहाय्यभूत सेवा, तंत्रज्ञान विषयक कामे केली जाणार आहे. तसेच दृकश्राव्य माध्यमातून कथा सांगितली जाणार आहे. दरम्यान, या स्मारकाच्या कामाला एप्रिल २०२१ मध्ये सुरुवात झाली होती. त्यावेळच्या नियोजनानुसार या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्च २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र त्याला विलंब झाला होता. अखेर या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास गेले आहे, अशी माहिती एमएमआरडीएकडून मिळते आहे.