रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने हटवा : बीएमसी

वृक्ष छाटणीच्या कामात वाहने ठरतायेत अढथळा

    22-Apr-2024
Total Views |

tree cutting


मुंबई, दि.२२ : प्रतिनिधी 
बीएमसी उद्यान विभागाच्यावतीने पावसाळापूर्व खबरदारी म्हणून मोठ्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणीची कामे हाती घेण्यात आली आहेत. आतापर्यंत २२ हजार ३३४ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. तर, खासगी तसेच शासकीय मालकीच्या परिसरामधील झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासंदर्भात ४ हजार ९०९ आस्थापनांना नोटीस जारी करण्यात आली आहे. झाडे छाटणी करण्याचे काम महानगरपालिका प्रशासनाकडून प्रगतिपथावर असले तरी या कामांमध्ये रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा येत आहे. नागरिकांनी अडथळा निर्माण करणारी वाहने इतरत्र हलवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. यापैकी १५ लाख ५१ हजार १३२ एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर १० लाख ६७ हजार ६४१ झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण झाडांपैकी १ लाख ८६ हजार २४६ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. त्यापैकी १ लाख ४८ हजार १६९ हजार झाडांची छाटणी अपेक्षित आहे. त्यापैकी दि. १९ एप्रिल अखेरपर्यंत २२ हजार ३३४ झाडांची छाटणी झाली आहे. तर दि. ७ जून अखेरपर्यंत उर्वरित झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे. मृत आणि कीड लागलेली तसेच वाकलेली ४३३ झाडे सर्वेक्षणादरम्यान आढळली आहेत. यापैकी ३८६ झाडे काढून टाकण्यात आली असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी सांगितले.
 
मुंबई महानगरामधील धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यापक मोहीम सुरू आहे. संबंधित भागांमध्ये झाडांच्या छाटणीसंदर्भात त्या त्या भागाच्या महानगरपालिका विभाग कार्यालयाकडून नागरिकांना आधीच अवगत केले जात आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या वेळेनुसार आपापली वाहने संबंधित ठिकाणाहून काढून सुरक्षित अशा अन्य ठिकाणी न्यावीत. प्रशासनाने आवाहन करूनही जर नागरिकांनी संबंधित ठिकाणांहून वाहने काढली नाहीत आणि फांद्या छाटणीदरम्यान दुर्दैवाने वाहनांचे नुकसान झाले तर प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
 
 
खासगी जागा याठिकाणी असणाऱ्या धोकादायक झाडे छाटणीसाठी संपर्क साधा
 
 
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्याच्या कडेची झाडे तसेच सार्वजनिक ठिकाणच्या झाडांची छाटणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून केली जाते. गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय - निमशासकीय संस्था, खासगी जागा याठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. त्यामुळे, अशाप्रकारच्या खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक