बोगसगिरी संपणार

    22-Apr-2024   
Total Views |
haidrabad
 
हैदराबाद लोकसभा निवडणूक दिवसेंदिवस अधिक चुरशीची होत चालली आहे. भाजप उमेदवार माधवी लता यांनी एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या खोट्या विकासाचा आणि तुष्टीकरणाचा बुरखा टराटरा फाडलाय. ओवेसीसारख्या मातब्बर उमेदवाराला माधवी लता जोरदार टक्कर देत असून, झंझावाती प्रचारामुळे आता ओवेसी हैदराबादच्या गल्लीबोळात मतांची भीक मागत फिरताना दिसतात. पसमांदा मुस्लीम विकासाच्या प्रवाहाबाहेर ठेवल्याचा मुद्दा माधवी यांनी समोर आणला आहे. त्यातच हैदराबादमध्ये ओवैसी यांच्या सलग जिंकण्याचे कारण बोगस मतदार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. हैदराबादमध्ये सहा लाखांहून अधिक बोगस मतदार असून त्यातील दीड लाख लोकांकडे दोन-दोन ओळखपत्र आहेत, असे माधवी यांनी म्हटले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने हैदराबाद जिल्ह्यातील ५ लाख, ४१ हजार बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून हटविली आहेत. यामध्ये ४ लाख, ३९ हजार, ८०१ स्थलांतरीत मतदार, ५४ हजार, २५९ नकली आणि ४७ हजार, १४१ मृत मतदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ओवेसींना मोठा झटका बसला आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत हैदराबाद मतदारसंघात एकूण मतदार होते, १९ लाख, ५७ हजार, ९३१. मतदान झाले ४४.८४ टक्के. म्हणजेच, ८ लाख, ७७ हजार, ९४१ मतदारांनी मतदान केले. ओवेसी यांना ५ लाख, १७ हजार, ४७१ मते मिळाली. म्हणजेच, ओवेसी यांनी २ लाख, ८२ हजार, १८६ मतांनी विजय मिळविला. परंतु, आता इतक्या मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार यादीतून वगळल्याने ओवेसींसाठी वाटतो तितका विजय सोपा नक्कीच नाही. सध्या तेलंगणात काँग्रेसचे सरकार आहे आणि भाजपनेही माधवी लता यांच्यासारखा तडफदार आणि कट्टर हिंदुत्ववादी उमेदवार रिंगणात उतरविला आहे. त्यामुळे, हैदराबाद जिंकणे ओवेसींसाठी सध्या तरी दुरापास्तच दिसत आहे. म्हणूनच, त्यांची भंबेरी उडाली असून बिफच्या दुकानात जाऊन त्यांनी ‘तू कापत राहा,’ असा संदेश दिला. यातून हिंदूंच्या भावना दुखविण्याचा प्रयत्न ओवेसींनी केला. त्याचप्रमाणे, माधवी लता यांच्या तीर मारण्याच्या अर्धवट व्हिडिओवर वक्तव्य करून दिशाभूल केली. बोगस मतदार हटविल्यानंतर पराभव फार जवळ आला आहे, हेच ओवेसींच्या सध्याच्या प्रचारावरून दिसून येत आहे.
शिव्यांचे लोण बिहारमध्ये!

बिहारमध्ये लालुपुत्र तेजस्वी यादव यांच्यासमोर लोकजनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांना शिवीगाळ करण्यात आली. जमुई येथील प्रचारसभेदरम्यान पासवान यांना राजद कार्यकर्त्याकडून आईवरून शिवी देण्यात आली. यावेळी लालुपुत्र तेजस्वी याचठिकाणी उपस्थित होते. याचा व्हिडिओदेखील बनवला गेला. तेजस्वी भाषण करत राहिले. मात्र, शिवीगाळ करणार्‍यावर त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. वैचारिक मतभेद आणि विचारधारा या गोष्टी वेगळ्या असतीलही; परंतु एखाद्यावर कौटुंबिक शाब्दिक हल्ले आणि आईवरून शिवीगाळ करून राजदचे कार्यकर्ते नेमका कोणता पराक्रम गाजवत आहेत? दरम्यान, तेजस्वी यादव आणि यादव परिवाराशी कौटुंबिक नाती जपत असल्याचा आरोप चिराग पासवान यांच्यावरही अनेकदा होत असतो. असे असतानाही तेजस्वी यांनी यावर सोयीस्कर मौन बाळगले, याचे दुःख झाल्याचे चिराग यांनी सांगितले. तसेच, “त्याजागी मी असतो, आणि अशी घटना तेजस्वी यांच्यासोबत घडली असती, तर मी संबंधित व्यक्तीला सडेतोड उत्तर दिले असते,” असेही चिराग म्हणाले. विशेष म्हणजे, माध्यमांशी बोलताना तेजस्वी यांनी, “मला ऐकू आले नाही. मला काही समजले नाही. आम्हालाही अशा शिव्या दिल्या जातात. या गोष्टीला उगाच मोठे करू नये,” असे अजब उत्तर दिले. शिवी देणार्‍यावर कारवाई करण्याची मागणीसुद्धा तेजस्वी यांनी केली नाही. पाटणामध्ये एनडीएच्या महिला कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मुळात ‘इंडी’ आघाडीतील अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अगदी आई, कुटुंब यावरून शिवीगाळ केली आहे. त्यामुळे आता ‘इंडी’ आघाडीचे कार्यकर्ते तरी कसे मागे राहतील म्हणा. डीएमकेच्या स्टॅलिनपुत्राने तर थेट सनातन संपविण्याची भाषा केली होती. त्याला आता तामिळनाडूमध्ये के. अण्णामलाई यांना मिळणार्‍या जबरदस्त प्रतिसादामुळे सडेतोड उत्तरही मिळाले आहे आणि सनातनचीताकदही समजली आहे. ‘इंडी’ आघाडीच्या अनेक नेत्यांनी, मग ते अगदी मणिशंकर अय्यरपासून ते डीएमकेच्या नेत्यांपर्यंत, सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिव्यांची लाखोली वाहिली आणि आता हीच पद्धत बिहारमध्ये सुरू झाली आहे. फक्त यावेळी मोदींऐवजी चिराग पासवान आहेत.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.