‘ग्रीनवॉशिंग’ : एक धोक्याची घंटा

    22-Apr-2024   
Total Views |
green
 
आत्ताच्या घडीला प्रचंड प्रमाणात होणार्‍या वातावरण आणि हवामान बदलाच्या घटनांकडे पाहिले, तर पृथ्वीला आपण किती मोठ्या प्रमाणावर धक्का पोहोचविला आहे, याची जाणीव आपल्याला होईल. दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण जनजागृती आणि कृतिशीलतेतून कमी होत असले तरी त्याचे प्रमाण फारच कमी आहे. ध्वनी, माती, पाणी अशा सर्वच ठिकाणांना प्रदूषणाचा विळखा बसलाय. त्याचे अनेक अनिष्ट परिणाम ही मानवाने भोगून झाले, तरीही पर्यावरणाबाबतची अनास्था कायम आहेच. ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘पर्यावरणाचे रक्षण करा’, ‘प्रदूषण कमी करा’ ही सगळी घोषवाक्य कागदोपत्री आणि म्हणण्यासाठीच राहिली, असेच चित्र दिसते. यामुळे प्रदूषण वाढतेच, पण त्याबरोबरच सजीवसृष्टीला ही मोठा धक्का पोहोचून अधिवास धोक्यात येतो, हे आपण जाणतोच. संकटग्रस्त किंवा धोक्यात असणार्‍या अनेक प्रजातींनाही यामुळे धोका निर्माण होत असून, त्यातील काही प्रजाती अगदी नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत. या सर्व परिस्थितीचे गांभीर्य एकीकडे आणि त्याविषयी होणारे काम दुसरीकडे. ही परिस्थिती सावरायची असेल, तर जनजागृती महत्त्वाची. पण, माध्यमांद्वारे दिशाभूल होत असेल, नव्हे ती जाणीवपूर्वक केली जात असेल तर?
 
हो! ‘सस्टेनेबल’, ‘इको-फ्रेंडली’, ‘एथिकल’, ‘पर्यावरणपूरक’, ‘केमिकल विरहित’ असे शब्द वापरून ग्राहकांची म्हणजेच तुमची फसवणूक केली जात असेल तर? जागतिक स्तरावर याला एक प्रचलित शब्द आहे तो म्हणजे ‘ग्रीनवॉशिंग!’ हा शब्द पर्यावरणवादी जे. वेस्टरवेल्ड यांनी प्रत्यक्षात १९८६ मध्ये एका निबंधात वापरला होता. फिजीमधील एका हॉटेलमध्ये ग्राहकांना पृथ्वीला वाचविण्यासाठी त्यांच्या टॉवेलचा पुनर्वापर करण्याबाबत सांगितले गेले होते. या हॉटेलला भेट दिल्यानंतर वेस्टरवेल्डच्या लक्षात आले की, ही एक प्रकारची हुलकावणी किंवा फसवणूकच असून, यामुळे ग्रहाचे संरक्षण होणार नाही. उलट हॉटेलच्या नफ्यामध्येच वाढ होणार आहे, कारण यामध्ये हॉटेलच्या लाँड्रीच्या खर्चात निम्म्याने कपात होणार आहे. त्यावेळीच वेस्टरवेल्डने याला ‘ग्रीनवॉशिंग’ असे नाव दिले.
 
‘ग्रीनवॉशिंग’ म्हणजे उत्पादनाच्या पर्यावरणीय फायद्यांबद्दल खोटी किंवा दिशाभूल करणारी विधाने करणे. वाढत्या प्रदूषणामुळे गेल्या काही वर्षांमध्ये प्रत्येक देश तसेच राज्य सरकारे पर्यावरणाच्याबाबतीत जागरुक झाली असून, त्याविषयीचे अनेक कायदे आले आहेत. प्रदूषणामध्ये मोठा वाटा असणार्‍या कारखान्यांना त्यांच्या प्रदूषण निर्मितीवर बंधने आणून पर्यावरणाची काळजी घेण्याबाबतच्या सूचना या कायद्यांमार्फत दिल्या जातात, तर दुसरीकडे प्रसिद्धीसाठीही एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे, असा प्रचार केला जातो. याला पूर्णपणे खोटा प्रचार असे म्हणता येणार नाही. कारण, यामध्ये कंपनी आपल्या अहवालात पुढील काही वर्षांचा शक्य असलेला पर्यावरणपूरक किंवा प्लास्टिकचा वापर अमूक टक्क्यांनी कमी करण्याचा दावा करते. प्रत्यक्षात मात्र तसे होते की नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. पर्यावरणपूरक उत्पादने खरेदी केल्यामुळे आपण पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पाऊल उचलत आहोत, अशी धारणा ग्राहकांची होते, त्यामुळे या उत्पादनांची खरेदी क्षमता आपसूकच वाढते. खरेदी वाढली, पर्यावरणाबाबतच्या खोट्या आणि फसव्या वल्गनांनीच कंपनीचे खिसे ही भरले. पण, पर्यावरण संरक्षणाचा विषय आहे तिथेच नामानिराळा राहिला. एखाद्या कंपनीने ग्राहकांची फसवणूक केली आहे, असे ही त्यातून सिद्ध होत नाही. कारण, तो त्या कंपनीचा केवळ शक्यता असलेला दावा असतो.
 
त्यामुळेच, अशा प्रकारच्या घटनांमध्ये ना कंपनीला जबाबदार धरता येते ना त्यावर कुठलीही कारवाई करता येते. अमूक काळानंतर अमूक टक्क्यांनी प्रदूषण कमी केले जाईल, या वाक्यातील तो ठरावीक कालावधी संपल्यानंतर तो कालावधी आणखी पुढे पुढेच ढकलला जातो. या सगळ्या प्रकारातून होते ते इतकेच की, ग्राहक आणि अर्थातच पर्यावरणाचे नुकसान होते. बर्‍याच आंतरराष्ट्रीय, मल्टिनॅशनल कंपनी अशा प्रकारचा ‘ग्रीनवॉशिंग’च्या जाहिरातबाजीचा आधार घेत आपला नफा वाढवत असून, याबाबत जागरुक होणे गरजेेचे आहे. यावर आंतरराष्ट्रीय जर्नल्स आणि वृत्तपत्र तसेच वाहिन्यांमधून प्रसिद्ध झाले आहे, पण त्याला आळा बसलेला नाही. अशाप्रकारच्या फसव्या प्रचाराला बळी न पडता, सजगतेने शाश्वत गोष्टींचीच निवड करत स्मार्ट ग्राहक बनणेच गरजेचे आहे हेच खरे!

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.