समाज जोडण्यासाठी...

    22-Apr-2024   
Total Views |
ddh
 
विजय मोरे एक मनस्वी कलाकार, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
सत्तरचे दशक होते. इयत्ता दुसरीला असताना विजय यांनी आईसोबत शेतात मजूर म्हणून जाण्याचा प्रयत्न केला. पण, लहान मुलाला काम जमणार नाही, म्हणत त्यांना शेतमालकाने कामाला ठेवले नाही. त्यावेळी त्यांच्या आईला, गुणाबाईला मजुरीचे दिवसाला दोन रूपये मिळायचे. बाबा गावात शुभकार्य, सण-समारंभ असले, की वाजंत्री गटासोबत ढोलकी वाजवायचे. पण, ते कामही नियमित नव्हतेच. मोरे कुटुंबाचा मोठा लेक वसतिगृहात शिकायचा. घरी आईबाबांसोबत छोटा भाऊ विजय असायचा. घरात १८ विश्वदारिद्य्र. भरपेट जेवणार कुठून? त्यामुळे दादा वसतिगृहात मिळणार्‍या अन्नातील भाकरी दररोज बाजूला काढायचा. दर शनिवारी त्या भाकर्‍या घेऊन तो घरी यायचा. आई त्या भाकरीचे तुकडे करून ते तुकडे वाळवायच्या. त्या काळात या वाळलेल्या भाकर तुकड्यानेच आई, बाबा आणि विजय यांना अन्न म्हणून आधार दिला होता. भूक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण यांची झळ सोसलेल्या त्याच विजय मोरे यांनी आता उत्कृष्ट गायक, कवी आणि तितकेच संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजात स्थान मिळविलेले आहे. ते ‘भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनी’चे महाराष्ट्र संघटक आहेत.
 
गोवंडीतील ‘समन्वय समिती सामाजिक संस्थे’चे सरचिटणीस, ‘वंचित समाज विकास प्रतिष्ठान’चे कोषाध्यक्ष, ‘आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान’चे सक्रिय कार्यकर्ता आहेत.अनेक वर्षे ते ‘समता परिषदे’चे चिटणीस होते, तसेच जनसहकारी पतपेढीचे मानद सचिव होते. त्यांना कलाकार म्हणून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याशिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणारा, समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांना शासनाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कारही मिळाला आहे. विजय मोरे यांच्या विचारकार्यांचा मागोवा घेऊ.
 
बाबुराव मोरे आणि गुणाबाई मोरे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील नुने गावचे. गावातल्या सगळ्यांनी एकमेकाला धरून राहिले, तर गाव टिकेल, असे मोरे कुटुंबाचे विचार. हेच संस्कार मोरे दाम्पत्याने त्यांच्या मुलांवर केलेले. बाबुराव ढोलकी वाजवायचे. ते पाहून विजय यांनाही ताल-लयाची ओळख झाली. पण, बाबुराव यांना वाटे की, ‘विजय याने बाबासाहेबांसारखे शिकावे. ढोलकी आणि वाद्य वाजवून का पोट भरते?’ त्यांनी विजयला “ढोलकीला हात नको लावू” अशी तंबी दिली. पण, विजय यांना वेडच लागले होते. मुलगा ऐकत नाही, पाहून बाबुराव यांनी ढोलकी विकून टाकली. विजय यांना वाटले की “अण्णांना वाटते की, ‘मी शिकणार नाही. म्हणून, त्यांनी त्यांची आवडती ढोलकी विकली. आपण शिकायलाच हवे.” ८०चे दशक असावे. गावात वीज नव्हती. तेव्हा विजय दिवसा शाळेत जात, नंतर मजुरीला जात. रात्री घरी आले की, कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करत. अशाप्रकारे त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. याच काळात त्यांच्या पित्याचेही निधन झाले.
 
असो. पुढे वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर ते नोकरीसाठी गोवंडीहून मुंबईला बहिणीकडे आले. ‘एम्प्लॉयमेंट एक्सचेंज’च्या माध्यमातून त्यांना कंत्राटी स्वरूपाच्या नोकर्‍या मिळत होत्या. त्यातून त्यांनी टायपिंगचे शिक्षण घेतले. सामाजिक कार्य करता यावे, म्हणून ‘पॅरा सोशल वर्कर’चा कोर्स केला. त्यातून ते एका स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करू लागले. हे काम करताना व्यसनमुक्ती, बाल कामगार यांच्यासाठी काम करताना त्यांना अनेक अनुभव आले. सामाजिक आणि आर्थिक मागास समाजात अंतर्गतही अनेक वाद आहेत.ते मिटविणे गरजेचे आहे, असे त्यांना आढळून आले. यातूनच मग त्यांनी ‘समन्वय समिती सामाजिक संस्था’ सहकार्‍यांच्या मदतीने सुरू केली. पुढे एका शाळेत ते कारकून म्हणून कायमस्वरूपी कामाला लागले. आयुष्यात आर्थिक स्थैर्य आले. अंजना यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
 
संघटित राहिलो तर विकास होईल, याबाबत त्यांनी समाजात जागृती निर्माण केली. वस्त्या-वस्त्यांमध्ये जाऊन शिक्षण, स्वयंरोजगाराबाबत सरकारच्या योजनांविषयी ते माहिती देऊ लागले. द्वेष किंवा असूया बाळगण्यापेक्षा एकमेकांना मदत करून सगळ्यांना सुख, समाधान, स्थैर्य मिळेल, असे वागू हा विचार घेऊन ते गावोगावी भ्रमंती करत. अर्थात, या कामासाठी त्यांना कोणी सांगितले नव्हते. पण, त्यांची ती मनापासूनची तळमळ होती. इथे एक नमूद करायला हवे की, विजय नि:स्वार्थी समाजकार्य करू शकले, कारण त्यांच्या पत्नीने त्यांना मोलाची साथ दिली. याच काळात भाऊ कांबळे, शरद कांबळे यांच्या माध्यमातून विजय यांचा समता परिषदेशी संपर्क झाला. याच माध्यमातून त्यांची भेट दामूअण्णा दाते आणि दत्तोपंत ठेंगडी यांच्याशी झाली. त्यांचे व्यक्तिमत्त्व पाहून, समरस सामाजिक विचार ऐकून विजय यांना वाटले की, आपण यांच्यासारखे थोडेतरी काम करायला हवे. हाच विचार घेऊन ते विविध सामाजिक संस्थांशी जोडले गेले. समरसतेचा संकल्प करून ते विचार मांडू लागले. हे सगळे करत असताना त्यांच्यातला कलाकार जीवंत होता. ते म्हणतात, “समाजात एकी आणि समरसभाव वाढावा यासाठी यापुढेही मला काम करायचे आहे.” आपण पाहतो की, काही समाजद्रोही लोक जातीपातीचे राजकारण करून समाजात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करतात. त्या परिक्षेपात विजय मोरेंसारखे लोक समाजाला जोडण्याचे काम करत आहेत.
९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.