उलट गणती सुरु...

    21-Apr-2024
Total Views |
 olympic
 
खेळ मानवी जीवनात आनंद निर्माण करतात, त्यामुळे खेळायला सगळ्यांनाच आवडतं. पण शक्य होत नाही हे वास्तव. भारतात क्रिकेटची जेवढी चर्चा होते तितके महत्व इतर खेळांना मिळत नाही हे म्हणायचे दिवस गेले. आता प्रत्येक भारतीय ऑलिंम्पिकचे यश साजरे करतो. अशाच २०२४ च्या पॅरीस ऑलिंम्पिक  Paris Olympics 2024 विषयी या लेखात जाणून घेऊया.
 
ऑलिंम्पिकचे समयपाल.
दि. २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान होणार्‍या पॅरिस ऑलिंम्पिक २०२४ चा उद्घाटन समारंभ जेथे होणार आहे त्या फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील सीन नदीकिनारी असलेल्या जगप्रसिद्ध आयफेल टॉवरच्या परिसरात दि. २६ जुलै, २०२३च्या बुधवारी एक उलट गणती चालू होणारे घड्याळ सुरू करण्याचा कार्यक्रम झाला होता. ते विलक्षण घड्याळ गेल्यावर्षीपासून दर्शवणारी उलट गणती, पॅरिस व मुंबईत ३ तास ३० मिनिटे असा फरक असल्याने भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवार, दि. १७ एप्रिलच्या रात्री १०.३० वाजता १००:००:००:०० (दिवस:तास:मिनिटं:सेकंद) असे आकडे दाखवून गेली. याचा मथितार्थ असा की आता बुधवार, दि. १७ एप्रिलपासूनबरोबर १०० दिवसांनी ऑलिंम्पिकचा श्रीगणेशा होणार आहे. या ऑलिंम्पिकची ही ३३वी आवृत्ती असेल.
 
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे १९३२ साली उन्हाळी ऑलिंम्पिक स्पर्धेची दहावी आवृत्ती भरवण्यात आली होती. त्यात सहभागी खेळाडूंनी केलेली कामगिरी अचूक नोंदविण्यासाठी, तसेच सारे जग ज्यावर विसंबून राहील आणि तंतोतंत वेळ दर्शवेल, असे घड्याळाचे अधुनिक स्वरूप ऑलिंम्पिकमध्ये वापरण्याचे ठरविण्यात आले होते. त्यासाठी १९३२ साली प्रथम मूळची स्वित्झर्लंडची प्रमुख घड्याळ उत्पादक असलेल्या ‘ओमेगा’ नावाच्या कंपनीची निवड करण्यात आली. तेव्हापासून ’ओमेगा’च्या वैशिष्ट्यपूर्ण घड्याळांचा वापर ऑलिंम्पिकसहीत अन्य नामांकित जागतिक स्पर्धांमध्ये करण्यात येऊ लागला. बहुविध खेळांसाठी अत्याधुनिक उपकरणांचा सातत्यपूर्ण विकास करत असल्याने जागतिक क्रीडाजगत आज ’ओमेगा’वर अवलंबून आहे.
 
स्पर्धेत अनेक शर्यती अशा रीतीने पूर्ण होताना आढळतात की, ज्यामध्ये केवळ छायाचित्रणातूनच कोण पहिला आला हे कळते. स्पर्धकांमध्ये जेव्हा अत्यल्प अंतर असते तेव्हा त्या फोटोफिनिशचा उपयोग होतो. अलीकडील नवकल्पनांमध्ये ‘स्कॅन-ओ-व्हिजन मायरिया’ या इंग्रजीत ओळखल्या जाणार्‍या फोटोफिनिश छायाचित्रणाचा समावेश असतो, जो शर्यतींच्या अंतिम रेषेवर प्रति सेकंद दहा हजार प्रतिमा नोंद करू शकतो आणि नवीन मोशन सेन्सर आणि पोझिशनिंग सिस्टम, जे स्पर्धेदरम्यान थेट गती, थेट स्थिती आणि इतर आकर्षक घटनांची संपूर्ण माहिती प्रदान करतात. अशा प्रसंगी ’ओमेगा समयपाल’ उपयोगी पडतो. पॅरिस ऑलिंम्पिक २०२४मध्ये ’ओमेगा’ची अशी घड्याळे अंदाजे ३२ खेळांमधील सर्व ३२९ प्रसंगांमध्ये वापरली जाणार आहेत. असे हे समयपाल पॅरिस ऑलिंम्पिक सुरू होण्याची वाट बघत असताना आपल्याकडचे भारतीय ऑलिंम्पिक विश्वदेखील आपापल्या रचनांची उलट गणती मोजत आहेत आणि आपले संघ पक्के करत आहेत. कोणाकोणाला पॅरिसच्या तिकिटांबरोबर कोणाला काय जबाबदारी द्यायची हे ठरवले जात आहे. कारण, पाहतापाहता पॅरिसला जायची वेळ कधी येऊन ठेपेल हे कळणारदेखील नाही. म्हणून हे काउंटडाऊन सगळ्यांनाच महत्त्वाचे ठरते.
 
शहरांची ओळख राहते चिरंतन...
ऑलिंम्पिक स्पर्धेचा यजमान ठरवताना आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक महासंघ (आयओसी) देशाच्या नावापेक्षा शहराच्या नावाचा प्रथम विचार करते. म्हणूनच तर त्या-त्या वर्षाची ऑलिंम्पिक स्पर्धा त्या-त्या शहरांच्या नावाने ओळखली जाते. जसे की, हे पॅरिस ऑलिंम्पिक २०२४, अथेंस ऑलिंम्पिक १८९६, बीजिंग ऑलिंम्पिक २००८, लंडन ऑलिंम्पिक २०१२ वगैरे. असेच हे फ्रान्समधील पॅरिस ऑलिंम्पिक २०२४ मध्ये होत आहे व त्यात आपल्याही खेळाडूंचे पथसंचलन आपण बघणार आहोत. त्याचेही पूर्वनियोजन चालू आहेच.
 
ऑलिंम्पिकपटूंचे पथसंचलन...
इ.स. १९०८मध्ये आयोजित केलेल्या लंडन ऑलिंम्पिक स्पर्धेत प्रथमच उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी स्पर्धेतसहभागी झालेल्या संघांचे संचलन ऑलिंम्पिक इतिहासात प्रथमच करण्यात आले होते. दि. २६ जुलैला पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये सगळ्या देशांचे क्रीडापटू राष्ट्रानुसार ऑलिंम्पिक क्रीडागारात दिमाखदार संचलन करतील. सारी दुनिया दूरचित्रवाणीवर, तर काही प्रत्यक्षात, तो सोहळा बघतील. पॅरिस २०२४ ऑलिंम्पिकचा उद्घाटन सोहळा वैशिष्ट्यपूर्ण असेल. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार क्रीडागाराबाहेर सीन नदीकिनारी तो होण्याचे ठरत आहे. यामध्ये बोटीवरून सहा कि.मी. अंतराचे खेळाडूंचे संचलन असेल. हा सोहळा पाहण्यासाठी आयोजकांना नदीकिनारी मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित आहे. पण, जर सुरक्षेच्या कारणास्तव तसे घडू शकणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली, तर हा सोहळा स्टँड डी फ्रान्स येथे पारंपरिक पद्धतीनुसार तो हलविला जाऊ शकतो. मग क्रीडागारामध्ये होणार्‍या त्या संचलनातही ऑलिंम्पिक उत्पत्तीचा सन्मान करण्यासाठी ग्रीस हे परंपरेनुसार पहिले राष्ट्र असेल. यजमान देशाच्या निवडलेल्या वर्णक्रमानुसार क्रीडागारामध्ये सारी राष्ट्रे प्रवेश करतील. प्रथेनुसार त्यात यजमानांचे म्हणजे फ्रान्सचे क्रीडापथक ओळीत शेवट असेल.
 
दखल युद्धग्रस्तांची...
पॅरिस २०२४ ऑलिंम्पिकच्या या संचलनात ऑलिंम्पिक ध्वजाखाली रशियन खेळाडूंचा सहभाग असणार आहे. तसेच, गाझामध्ये पॅलेस्टिनींची हत्या होत असताना आणि मोठ्या संख्येने विस्थापितांची संख्या वाढत असूनही, इस्रायली खेळाडूंना त्यांच्या राष्ट्रीय ध्वजाखाली खेळण्याची मान्यता देण्याचाही निर्णय झालेला आहे. या घडीला युक्रेनमधील रशियाचे युद्ध तिसर्‍या वर्षांत आहे. मध्य पूर्वेकडीलहीसंघर्ष विकोपाला गेले आहेत. सुदानमधील परिस्थिती सर्वांत भीषण आहे. शांतता आणि एकीचे प्रतीक असलेल्या ऑलिंम्पिक स्पर्धांचा इतिहास बघता पॅरिस ऑलिंम्पिकच्या निमित्ताने सर्व भागीदारांबरोबर घेऊन युद्धविरामाच्या दिशेने काम करण्याची एक नामी संधी यजमानांना अनायासेच मिळणार आहे. भारत त्यासाठी यजमानांचे क्वचितच स्वागत करेल, अशा भारतीय ऑलिंम्पिकपटूंचे पथक त्या संचलनात आपण बघणार आहोत आणि आपण सारे त्यांना शुभेच्छा देणार आहोत.
 
ऑलिंम्पिक आणि ध्वजवाहक...
प्रत्येक देशाच्या प्रमुख ऑलिंम्पिकपटूच्या हाती त्या-त्या राष्ट्राचा ध्वजधारक म्हणून जबाबदारी सोपवलेली आढळेल. त्यानुसार भारताचा ध्वजधारक होण्याचा बहुमान यावेळेस मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेता दिग्गज टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल उर्फ शरथ कमल याला भारतीय ऑलिंम्पिक संघटनेने सन्मानपूर्वक देऊ केला आहे. दि. २१ मार्चला सुप्रसिद्ध पी. टी. उषाच्या प्रमुखपदाखाली कार्य करत असलेल्या भारतीय ऑलिंम्पिक संघटनेने, या नामवंत क्रीडापटूची निवड करून त्याचा बहुमान केला आहे. जेव्हा अशा महत्त्वाच्या पदांवर नेमणूक होते तेव्हा ती करताना खेळाडूंचा अनुभव, कौशल्य आणि नेतृत्वगुण यांचा विचार करण्यात येत असतो. प्रारंभी शरथ कमलचा बहुमान आपण केला, त्याचवेळी भारताची ऑलिंम्पिक पदक विजेती मुष्टियुद्धपटू मेरी कॉम हिच्यावर भारतीय संघव्यवस्थापक प्रमुखपदाची आणि हिवाळी ऑलिंम्पिकमध्ये भारताचे नाव गाजवणार्‍या शिवा केशवन याला उपप्रमुखपदाची जबाबदारी मंगळवारी सोपविण्यात आली होती. तथापि, शुक्रवारीच शेफ-डी-मिशन अर्थात अभियान प्रमुख, संघव्यवस्थापक प्रमुखपदाची जबाबदारी मेरी कॉम हीने तिच्या खासगी कारणांमुळे ती न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मेरी कॉमने एका ई-मेलद्वारे भारतीय ऑलिंम्पिक संघाची अध्यक्षा पी.टी उषा, केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात साई यांना तिने तसे कळवूनही टाकले. पी. टी. उषाला मेरी कॉमच्या नकाराने वाईट तर वाटलेच, पण नाईलाजास्तव मेरी कॉमच्या निर्णयाची खंत वाटली. मेरी कॉमची जागा घेऊ शकेल, अशी व्यक्ती शोधून त्याची घोषणा आता लवकरात लवकर करावी लागेल. तोपर्यंत सगळ्यांना तेवढी वाट पाहवी लागणार आहे.
 
नीरज चौप्रा का नसेल ध्वजधारक...
तसे म्हटले तर सध्या नीरज चौप्रालाच समस्त क्रीडाजगताने भारताचा ध्वजधारक होण्याचा बहुमान एकमताने दिला असता. परंतु तसे करणे चुकीचे ठरू शकते. नीरज चौप्राच्या भालाफेक स्पर्धांच्या पात्रता फेर्‍या दि. ६ ऑगस्टपासून सुरू होत आहेत आणि ऑलिंम्पिक उद्घाटनाचा सोहळा दि. २६ जुलैला नियोजित आहे. अशावेळेत नीरज चौप्राला ध्वजधारक बनवले, तर त्याला दि. २५ जुलैला पॅरिसमध्ये मुक्कामी असणे आवश्यक ठरते आणि उद्घाटन समारंभानंतर लगेचच त्याला त्याच्या सराव आणि प्रशिक्षणादी ठिकाणी हजर राहावे लागेल. ऑलिंम्पिक नियमावलीनुसार असे कळते की, कोणताही खेळाडू आपल्या निर्धारित कार्यक्रमाच्या सात दिवस आधी क्रीडानगरीत प्रवेश करू शकत नाही. अधिकृत सूत्रांकडून असे समजते की, नीरज चौप्राला एक तर उद्घाटन समारंभानंतर आपल्या प्रशिक्षण स्थळी परतावे लागेल, अथवा पॅरिसमधील एखाद्या हॉटेलात बाहेर मुक्कामी राहावे लागेल. जेणेकरून तो सात दिवसांच्या आधी क्रीडानगरीत प्रवेश करू शकेल. हे सगळे वेळांच गणित बघता सारा देश नीरज चौप्राकडे डोळे लावून बसलेला असताना नीरज चौप्राच्या बाबतीत अशी जोखीम घेणे योग्य ठरणार नाही.
 
नॉनडिस्क्रीप्ट स्पोर्ट्सपर्सन!...
या वेळेच्या भारताचा ध्वजधारक होणारा ’टेटे’पटू दि. १२ जुलै, १९८२ रोजी जन्मलेला शरथ कमल हा मूळचा चेन्नई, तामिळनाडूचा. तथापि, तामिळनाडूच्याच एथलेटिक्स संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी अचंता शरथ कमल उर्फ शरथ कमल याला क्रीडा क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या ऑलिंम्पिकमध्ये भारताचा ध्वजधारक होण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सारे क्रीडा विश्व शरथ कमलचे अभिनंदन करत असताना दुसरीकडे तामिळनाडू एथलेटिक्स संघटनेचे काही पदाधिकारी शरथ कमलचा उल्लेख ’नॉनडिस्क्रीप्ट स्पोर्ट्सपर्सन’ असा करत आहेत. इंग्रजीमधील ’नॉनडिस्क्रीप्ट स्पोर्ट्सपर्सन’चा थोडक्यात अर्थ बघता हिंदीत ‘अनाम खिलाड़ी’ असा ते अर्थ काढत आहेत, तर सर्वसाधारणतः त्याचा अर्थ निघतो ध्वजधारकाची विचित्र व अगम्य, अनाकलनीय अशी निवड आणि ऑलिंम्पिकला आजून बराच अवधी असताना यांनी अशा त्या निवडीची केलेली घाई तामिळनाडू एथलेटिक्स संघटनेच्या काही पदाधिकारी मंडळींना मान्य नाही. तामिळनाडूसारखी अशी काही लोक भारतीय क्रीडा विश्वातसारखी कधीनाकधी आढळत असतातच.
 
भारतीय ध्वजवाहक...
आपल्या देशासाठी ऑलिंम्पिक ध्वजवाहक होणे हा कोणत्याही खेळाडूसाठी एक सर्वोच्च सन्मान असतो. भारताकडे सध्या अनेक क्रीडाप्रकारांत अनेक गुणवान खेळाडू आढळतील. बेल्जियममधील अँटवर्प येथे १९२०च्या ऑलिंम्पिकमध्ये उद्घाटन समारंभात राष्ट्रध्वज हाती घेणारा पहिला भारतीय ४०० मीटरचा धावपटू पूर्मा सी. बॅनर्जी हा होता. त्यानंतर ऑलिंम्पिक उद्घाटन समारंभात आजपर्यंत ज्या खेळाडूंनी भारतीय ध्वज हाती घेतला आहे, त्यापैकी सर्वाधिक तर ऑलिंम्पिक पदक विजेतेच आहेत आणि त्यातही सांघिक खेळ असलेल्या ऑलिंम्पिक विजेत्या हॉकीच्या संघकप्तानांनी. तीन वेळा ऑलिंम्पिक सुवर्णपदक विजेते थोरले बलबीर सिंग हे दोनदा १९५२ आणि १९५६ मध्ये ऑलिंम्पिकमध्ये भारताचे ध्वजवाहक असलेले एकमेव होते. धावक शायनी-अब्राहम विल्सन ही बार्सिलोना १९९२ मध्ये स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय महिला ऑलिंम्पिक ध्वजवाहक होती.
 
स्त्री-पुरुष समानता...
२०१२च्या रीओ ऑलिंम्पिकचा भारतीय ध्वजवाहक असलेल्या अभिनव बिंद्रापर्यंत असलेली एकल ध्वजधारकाची प्रथानंतर बदलण्यात आली. टोकियो २०२० ऑलिंम्पिकपासून महिलांनाही पुरुषांबरोबर स्थान असावे म्हणून, एक पुरुष व एक स्त्री असे दोन ध्वजवाहक असावे असे अंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक संघटनेकडून ठरविण्यात आले. त्यानुसार भारताने मेरी कॉम आणि मनप्रीत सिंग यांची निवड केली होती.
 
ऑलिंम्पिकमध्ये भारतासाठी ध्वजवाहकांची संपूर्ण यादी आता आपण पाहू.
१९२० - पूर्मा सी. बॅनर्जी (थलेटिक्स)
१९३२ - लाल शाह भोकरी (हॉकी)
१९३६ - ध्यानचंद (हॉकी)
१९४८ - तालिमेरेन एओ (फुटबॉल)
१९५२ - थोरले बलबीर सिंग (सीनियर) (हॉकी)
१९५६ - थोरले बलबीर सिंग (सीनियर) (हॉकी)
१९६४ - गुरबचन सिंग रंधावा (थलेटिक्स)
१९७२ - डेसमंड-नेव्हिल डिव्हाईन जोन्स (मुष्टियुद्ध)
१९८४- जफर इक्बाल (हॉकी)
१९८८- कर्तार सिंग धिल्लन (कुस्ती)
१९९२ - शायनी-अब्राहम विल्सन (थलेटिक्स)
१९९६ - परगत सिंग (हॉकी)
२००० - लिएंडर पेस (टेनिस)
२००४ - अंजू बॉबी जॉर्ज (थलेटिक्स)
२००८ - राज्यवर्धन सिंग राठोड (नेमबाजी)
२०१२ - सुशील कुमार (कुस्ती)
२०१६ - अभिनव बिंद्रा (नेमबाजी)
२०२० - मेरी कॉम (मुष्टियुद्ध) आणि मनप्रीत सिंग (हॉकी)
 
पॅरिस ऑलिंम्पिक २०२४मध्ये काही विलक्षण निकालांचा इतिहास घडवण्यासाठी भारतीय क्रीडापटू सराव करत उलट गणती मोजत आहेत. अशा पॅरिस ऑलिंम्पिक २०२४चे दूरदर्शन घेण्याची आपलीही उलट गणती चालू असेलच. तेव्हा कधी एकदा ती संपते याची उत्कंठतेने वाट आपणही बघत आहोतच की!
-श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत )
९४२२०३१७०४