उद्धव ठाकरे मुस्लीम मतांची स्पेस शोधतायंत?

    02-Apr-2024
Total Views |
uddhav thackeray politics

१९८७ सालं, विलेपार्ल्यात पोटनिवडणुक जाहिर झाली होती. त्यावेळी शिवसेनेकडून रमेश प्रभू यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हा त्यांच्या प्रचार सभेसाठी आलेले बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी निवडणूक लढत आहोत. आम्हाला मुस्लिम मतांची पर्वा नाही. हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार' हे १९८७ ला प्रभू यांच्या प्रचार सभेतील हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द होते. त्यावेळी शिक्षा म्हणून आयोगाने १९९५ ते २००१ पर्यत बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. पण आता त्यातूनच 'शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्व सांगतांना इतर धर्मांचा द्वेष करा असं सांगितलं नाही' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नव्या हिंदुत्वाची संकल्पना मांडलीय. तसेच मुस्लिम समुदाय आमच्या सोबत येत आहे असं ही ते म्हणत आहेत. अशावेळी मुस्लिम मतदार आमच्या पाठिंशी आहे, आणि मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंना खरा शिवसेनेचा नेता मानते, असे विधान उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केली. त्यामुळे मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी उबाठा गटाने कसे प्रयत्न केले? ते प्रयत्न यशस्वी झाले का? मुस्लिम मतदारांना आपल्यासोबत जोडून घेण्यास उबाठा गट आग्रही का आहे?
 
शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिली दोन दशकं ती मराठी आणि स्थानिकांच्या आर्थिक प्रश्नांवर कार्यरत होती. त्यानंतर १९८५ ला रामजन्मभूमी आंदोलन सुरु झाल्यानंतर बाळासाहेबांनी हिंदूत्वाची भुमिका मांडली. मात्र, आता याचं बाळासाहेबांच्या हिंदूत्वाच्या विचारांशी फारकत घेत, उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाची नवी संकल्पना मांडली, ज्यात मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न त्यांनी केले. मुळात भाजप-शिवसेना युतीवेळी ठाकरेंनी हिंदूत्वाच्या विचारांना तिलांजली दिली नव्हती. पंरतु महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह वेगळी चूल मांडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केलेत, अशी टीका त्यांचे राजकीय विरोधक करतात. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की, हिंदूत्वाचे राजकारण करणारे उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे अचानक मुस्लिम मतदरांना आकर्षित का करत आहेत? मुळात शिवसेनेतील बंडानंतर मुळ शिवसैनिक शिंदेच्या बाजूने गेला. यांची प्रचिती ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून आलीच. अशावेळी उबाठा गटाने सर्वप्रथम दुरवलेल्या शिवसैनिकाला आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न केले. त्यात सुरुवातील संभाजी ब्रिगेडला सोबत घेण्याचा निर्णय मातोश्रीवर झाला. ज्यानंतर संभाजी ब्रिगेड आणि उबाठा गट संयुक्त मेळावे घेणार असं ठरलं होतं. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याचा प्रयत्न ही उद्धव ठाकरेंनी केला. त्यात आता आघाडीशी फारकत घेत, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना ठाकरेंच्या राजकीय विश्वासाहार्तेवर प्रश्न ही उपस्थित केला. या दोन्ही प्रयोगात अपयश आल्याने वंचित आणि अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी पुन्हा ठाकरेंनी वेगळे प्रयत्न सुरु केले, असा आरोप त्यांच्यावर केला जातोय.
 
यात मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी उबाठा गटाने सगळ्यात पहिला प्रयत्न केला तो, २०२१ च्या शिवशाही कॅलेंडरच्या रुपाने. उबाठा गटाने शिवशाही कॅलेडर हे उर्दु भाषेत छापले. ज्यातील अर्ध्याहून अधिक मजकूर उर्दु भाषेत छापण्यात आलेला होता. या कॅलेंडरवर इंग्रजी महिन्यांच्या शेजारी इस्लामिक महिना आणि इतर बाबी नमूद करण्यात आल्या होत्या. तसेच हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला होता. तेव्हा भाजप नेते अतुल भातखळंकरांनी ‘शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही….’, असा खोचक टोला देखील लगावला होता. तसेच २०२२ ला माझगावमध्ये उर्दु भाषा भवन उभारण्यासाठी १२.८८ कोटी रुपये बीएमसी खर्च करणार अशा आशयाच्या बातम्या माध्यमांवर प्रसिद्ध झाल्या होत्या. मुळात हा भाग भायखळा विधानसभा मतदारसंघात येतो. आणि मुस्लिम बहुल क्षेत्र असल्याने उर्दु भवन सुरु करण्याची तयारी उबाठा गटाने केली होती, पण मुंबईत मराठी भाषा भवन कधी बनणार, असा सवाल भाजप नेते भालचंद्र शिरसाट यांनी उबाठा गटाला विचारला होता. याव्यतिरिक्त सरकार स्थापनेनंतर ठाकरेंनी अनेक दर्ग्यांना भेटी देऊन मुस्लिम मतदार आपल्या बाजूने असल्याचे सांगत, हिंदूत्वाची नवी संकल्पना मांडली होती. तसेच राममंदिर विरोधी विधान देखील उबाठा गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिराचं उद्घाटन करायचं हे ढोंग आमच्याकडे नाही, असं वादग्रस्त विधान उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊतांनी केले होते.

 तर दुसरीकडे उबाठा गटाला राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळाले असून ही वेगळी भुमिका मांडण्याच्या नादात सोहळ्याला जाणं ही ठाकरे गटाच्या नेत्यांनी टाळलं. पण हे मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचे ठाकरे गटाचे प्रयत्न किती यशस्वी झाले हा ही मोठा प्रश्न आहे. मुळाच ठाकरे गटाने किती दावा केला की, मुस्लिम मतदार आमच्या बाजूने आहेत. तरी मुस्लिम मताचे दावेदार अनेक पक्ष आहेत. यात सर्वात पहिलं काँग्रेसचं नाव येतं. कारण मुस्लिम समुदाय हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार आहे. तसेच १९९९ ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पवारांनी ही मुस्लिम मतदारांना आपल्या बाजूने वळवले. तसेच एमआयएम आणि वंचितसारखे पक्ष तर मुस्लिम मतदार आपल्याकडे असल्याचा दावा करतातच. त्यामुळे ठाकरेंनी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी किती ही प्रयत्न केले तरी दावेदारांच्या यादीत शेवटचा क्रमांक ठाकरे गटाचा असेल, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करतात. तरी तुम्हाला काय वाटतं मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यात ठाकरे गटाला यश आलयं का?