सिंधुदुर्गात पहिले वाळू कला संग्रहालय

    02-Apr-2024
Total Views |

sand art 
 
मुंबई : सिंधुदुर्गातील वेंगुर्ला समुद्रकिनाऱ्याजवळ महाराष्ट्रातील पहिले वाळू शिल्प संग्रहालय उभे राहिले आहे. कोकणातील वार्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने याची निर्मिती झाली. पूर्वी फक्त ओडिशा आणि म्हैसूरमध्ये हे संग्रहालय अस्तित्वात होते. परंतु आता वेंगुर्ल्यातील पर्यटकांनाही वाळू शिल्पे पाहता येणार आहेत. या विजयश्री वाळू कला संग्रहालयात, शिव, गणपती, येशू, शिवाजी महाराज आणि इतर अजून मूर्तींसह अनेक कलाकृती प्रदर्शनात आहेत.
 
संग्रहालयातील कलाकार, रविराज चिपकर यांनी आपले मनोगत मांडता सांगितले, “कोकण पट्ट्यातील पर्यटन वाढत आहे, म्हणून मला काहीतरी वेगळे करून पर्यटकांसाठी काहीतरी वेगळे आकर्षक करायचे होते.
 
येथील लोक, रहिवासी आणि पाहुणे सर्वच श्रद्धाळू आहेत. म्हणून, मी विविध आदरणीय व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणार्या मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या या भागातील एक लाडके लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांची मूर्तीही मी साकारली आहे.”
यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात या संग्रहालयाचे उद्घाटन झाले आणि ते मे पर्यंत खुले राहणार आहे. पावसाळ्यात तात्पुरते बंद करण्याची गरज असल्याचे सांगत नोव्हेंबरमध्ये नवीन मूर्ती तयार करण्याची आणि संग्रहालय पुन्हा सुरू करण्याची चिपकर यांची योजना आहे.
 
वाळू संग्रहालयाला भेट देणारे प्रामुख्याने पुणे, मुंबई आणि परदेशातील, वाळूच्या मूर्तीं पाहून आश्चर्यचकित होतात. समुद्रकिना-यापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर राहणारे चिपकर हे वाळू कलेचा व्यवसाय करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक आहेत. चिपकरांचा वाळू कलाकार म्हणून प्रवास २०११ मध्ये सुरू झाला, जेव्हा ते वयाच्या २३ व्या वर्षी कोकणातील समुद्रकिनारी महोत्सवात सहभागी झाले होते. कलाकार सुदर्शन पटनायक यांच्या प्रेरणेने, त्यांनी व्यावसायिक वाळू कलात्मकतेमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांना विविध ठिकाणी आमंत्रणे मिळू लागली.