मुंबईत तिरंदाज पक्ष्याचे दुर्मीळ दर्शन

    02-Apr-2024
Total Views |


darter

मुंबई (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेमार्फत दि. ३१ मार्च रोजी आयोजित केलेल्या बर्ड ट्रेलमध्ये दुर्मिळ तिरंदाज पक्ष्याचे दर्शन झाले आहे. मुंबईतील पक्षी निरीक्षकांसाठी भांडूप पंपिंग स्टेशन आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य येथे ही ट्रेल निशुल्क आयोजित करण्यात आली असून या ट्रेल दरम्यान दुर्मिळ तिरंदाज पक्ष्याचे पक्षिनिरिक्षकांना दर्शन घडले आहे.

महाराष्ट्र पक्षिमित्रचे कार्याध्यक्ष डॉ. राजू कसंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बर्ड ट्रेल घेतली गेली असून ५५ पक्षी निरिक्षक या ट्रेलमध्ये सहभागी झाले होते. डॉ. राजू कसंबे यांच्याबरोबरच आदेश शिवकर, फ्रान्सिस डिसुझा, हृषीकेश घोगरे यांनीही यावेळी सहभागींना मार्गदर्शन केले. दरम्यान, एकूण ६० पेक्षा अधिक पक्षी प्रजातींची या ट्रेलमध्ये नोंद करण्यात आली. यामध्ये मुंबई परिसरात दुर्मिळ असलेला तिरंदाज पक्षी (ओरिएन्टल डार्टर), तसेच दोन्ही प्रजातींचे फ्लेमिंगो पक्षी (मोठा रोहित व छोटा रोहित), स्थलांतरित पक्ष्यांपैकी निळ्या शेपटीचे वेडे राघू, कल्लेदार सुरय (व्हिस्कर्ड टर्न), कुरव चोचीच सुरय (गल-बिल टर्न), ठिपके वाली तुतारी (वूड सँडपाईपर) आणि चिखली तुतारी (मार्श सँडपाईपर), सामान्य टिलवा (कॉमन रेडशांक) व भुवई बदक (गार्गनी) इत्यादी स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश होता. तिरंदाज आययुसीएनच्या यादीत निअर थ्रेटंड (धोक्याच्या जवळ असलेली) प्रजात म्हणून वर्गीकृत आहे. गेल्या अनेक वर्षात तिरंदाज या पक्ष्याच्या अगदी क्वचित नोंदी आढळल्यामुळे ही एक दुर्मिळ नोंदच आहे.