मुलं पुस्तकं वाचत नाहीत? काही सोप्या टिप्स

02 Apr 2024 13:07:22

books 
 
मुले पुस्तके वाचत नाहीत, त्यांना वाचनाची आवड नाही असा आपला गोड गैरसमज असतो. मुळात पुस्तकं वाचण्यामागचा हेतू आपण पहिले लक्षात घ्यायला हवा. आज बाल पुस्तक दिन आहे आणि त्यानिमित्ताने पुस्तकांशी दोस्ती करण्याच्या क्लुप्त्या, मुलांना कोणती पुस्तके दयावी याच्या टिप्स आणि महत्वाचे म्हणजे ती पुस्तके का वाचत नाहीत या तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मी आज सांगतेय.
 
साहित्य निर्माण झाले, लिपी उदयाला आली तीच मुळात हिशोब ठेवण्यासाठी. मग त्याचा वापर ज्ञान मिळवण्यासाठी होऊ लागला. ज्ञान मिळवण्याच्या अनेक माध्यमांपैकी सहज सोपं उपलब्ध होणारं साधन म्हणजे पुस्तक होतं. पण पुस्तक वाचणं हे अचानक ठरवून शक्य झालं असं होतं नाही. त्याची सवयच असावी लागते.
 
मुळात भारतीय परंपरेला वाचन संस्कृतीशी ओळख अलीकडची. आपली परंपरा मौखिक आणि श्रवण संस्कृतीची. झोपताना आई गोष्ट सांग आणि जेवताना आजी आजोबांच्या गोष्टी किंवा गाणी किंवा कविता असा हट्ट मुलं करतात. करतात ना? म्हणजे तुमचं बाळ सुधृढ आहे. नवीन माहिती मिळ्वण्यासंबंधी त्याच्या मनात उत्सुकता आहे, ते जिज्ञासू आहे. आता त्याच्या या कुतूहलाला केवळ आपल्याला ज्ञानाच्या मुख्य प्रवाहापर्यंत आणून सोडायचं आहे, दिशा द्यायची आहे. एकदा का या प्रवाहाशी त्याची दोस्ती झाली की तुमच्या मदतीची गरजच त्याला पडणार नाही.
 
मुलं म्हणजे चालता बोलता व्हिडीओ कॅमेरा असतात. आईबाबा, आजी आजोबा, काका काकू काय करतायेत याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. ते सगळं अगदी न चुकता रेकॉर्ड करून घेतात आणि आपल्या वागण्यात त्याचा प्रयोग करून पाहतात. त्याने उच्चरू नये असा एखादा शब्द ते बाहेच्या कुणाच्या तरी भांडणातून शिकून येतात आणि कधीतरी त्याचा प्रयोग करतात. इतकं सहज असतं त्यांचं भावविश्व. तर, तुमचं आवरून झालं आणि मोकळ्या वेळात हातात तुम्ही दिवसभराचे राहिलेले मेसेजेस वाचायला मोबाईल घेतला की तो त्यांनाही हवा असतो. आईला पोळी करताना पाहून त्यांना पोळपाट लाटण, भांडी हवी असतात, भातुकली देतो मग आपण त्यांना, आई बाबा आपल्याला नटवतात तसे नटवायला बाहुली हवी असते. मुलांना गाड्या हव्या वाटतात. अभ्यास करणारी मोठी ताई दादा असतील तर त्यांना रेघोट्या ओढायला वही पेन हवं असतं. आई बाबा मासिकं, पुस्तकं वाचत असले की त्यांनाही पुस्तकं हवं वाटतं. त्यांना आकर्षक वाटतील अशी छोट्या सोप्या गोष्टींची, रंगीत चित्रांची पुस्तकं आणून ठेवायची मग घरी. साधारण ती बोर झालीतस वाटलं, की गुपचूप आपलं पुस्तकं घेऊन आपण त्यांच्यासमोर वाचत बसावं. त्यांच्या प्रश्नांना उत्तर काही देऊ नये. की ती त्यांची पुस्तकं घेऊन चित्र पाहत बसतील. मग आपण गोष्ट सांगण्यावरून गोष्ट वाचून दाखवण्यावर यायचं. पुस्तकांशी त्यांची ओळख होऊ द्यायची. पुढे पुढे त्यांना थोडं वाचता येऊ लागेल, पण तेवढा वेग काही आला नसेल वाचनाचा. मग अर्धी अधिक गोष्ट वाचून सोडून द्यायची अर्ध्यात.
 
त्यांच्या नावाने मासिकं सुरु करावी. चांदोबा, ठकठक सारखी. किंवा मनोरमाचे टेल मी व्हाय, मोठ्यांसारखं आपल्याही नवे कुरियर घरी येतेय पाहिलं की खुश होतात मुलं. मी व्हायचे ना. मग त्यातल्या वस्तूविषयी आपलेपणा जिव्हाळा वाटू लागतो. तिची काळजी घेणं, तिला जपणं आणि तिचा शक्यतेवढा उपयोग करून घेणं सुरु होतं. सुरूवातीला गोष्टीची पुस्तकं, साने गुरुजींच्या छान छान गोष्टी आहेत लहान मुलांसाठी. त्यातून त्यांना संस्कारांसोबत भावनांचीही जाण येते. कित्येक प्रकाशकांनीही आताशा मुलांसाठी गोष्टीची पुस्तके प्रकाशित केली आहेत. छोट्यांचे रामायण महाभारत, अशी कितीतरी पुस्तकं सुरुवातीच्या काळात देता येतील. मुलं छानशी रुळली असं वाटलं की एकाच गोष्टीच एक पुस्तक द्यावं. दीर्घ वाचनाची बैठक त्यांची पक्की होऊ लागते. मग तोत्तोचान, डॅड्डी लॉन्गलेग्स, मोठ्यांसाठीही उपयुक्त असलेलं, ऍन फ्रॅंक ची डायरी अशी पुस्तके विकत घ्यावी. मुलांच्या शेल्फ मध्ये ठेवावी. हे सगळं त्या त्या लेखकांनी त्या त्या वयात लिहून ठेवलं असल्याने मुलं त्या पुस्तकांशी सहज जोडली जातात. काही मराठी पुस्तकेही आहेत. बोक्या सातबंडेची तर अक्खी सीरिजचं मुलांच्या आवडीची होते. मग चरित्र वाचायला द्यावीत, माणसे त्यांना कळू लागतात.
 
मी सुरुवातीला म्हंटल, तशी वाचन संस्कृती मूळ आपली नाही किंवा वाचन केवळ एक माध्यम आहे आणि ज्ञानार्जनाचे अनेक पर्याय मुलांसमोर सहज आणि विना नुकसान उपलब्ध आहेत तरीही वाचनाची सवयही त्यांना इतर माध्यमांसोबत असायलाच हवी. भाषेचे आणि शब्दांचे पेटारे आपल्यासमोर खुले होतात आणि विचार करायची सवय आपल्याला लागते. वाचताना वेग आपण ठरवू शकतो, वाचनाचे नियमन करू शकतो. चित्रपट पाहताना विचार करण्यासाठी आपण सतत पोझ घेऊन थांबत नाही ना, पर्यायी विचार करणेच सोडून देतो, वाचताना तसे होत नाही, एकाग्रता, सर्जनशीलता वाढते. त्यामुळे वाचायला तर हवेच. आपलं वाचन केवळ शिक्षणापुरतेमर्यादित राहू नये म्हणून आजचा बाल पुस्तक दिन साजरा करूया.
Powered By Sangraha 9.0