‘इको ड्राईव्ह यंगस्टर्स’

    02-Apr-2024
Total Views |
Eco Drive Youngstars
 
उन्हाळ्याची तीव्रता जशी वाढत जाते तशी तहान वाढत जाते. मनुष्याप्रमाणे प्राण्यांनाही त्याची तीव्र झळ बसते. या पार्श्वभूमीवर पर्यावरण समतोलाचा संदेश देत निसर्गाचा अविभाज्य भाग असलेल्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कल्याणमधील ‘इको ड्राईव्ह यंगस्टर्स’ ही संस्था काम करतेे. संस्थेच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश.

'इको ड्राईव्ह यंगस्टर्स’ हा पर्यावरणासाठी काम करणारा समुह. हा चमू मूळ कल्याणचा असला तरी, तो महाराष्ट्रातील पर्यावरण प्रेमींशी जोडलेला आहे. ही संस्था पर्यावरणासोबतच वृक्ष आणि पक्षी यांच्यासाठीदेखील काम करत आहे. या संस्थेचा पहिला उपक्रम कल्याण पश्चिमेतील सरस्वती मंदिरात साजरा झाला. संस्थेच्यावतीने शाळकरी मुलांना पक्ष्यांच्या आवाजाची ओळख करून देण्यात आली. उन्हाळ्यात बर्‍याचदा पक्ष्यांना पाणी मिळत नाही. त्याचा मोठा फटका त्यांना बसत असतो. त्यामुळे अनेकदा पक्षी मरतात. त्या पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी हा ग्रुप कार्य करत असतो. प्रत्येक उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी बाहेर पाणी ठेवा, असा संदेश समाजमाध्यमांवर फिरत असतो. पण प्रत्यक्षात तसे करणारे फार कमी असतात. मात्र, ‘इको ड्राईव्ह यंगस्टर्स’ या संस्थेने पक्ष्यांसाठी ‘घोटभर पाणी.. पक्ष्यांसाठी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत निरनिराळ्या बागांमध्ये जाऊन पाण्याचे पसरट घट भरून ठेवले जातात. शहरातील उद्याने, मैदाने, शाळा आदी ठिकाणी पक्ष्यांसाठी तात्पुरते पाणवठे तयार केले आहेत.

ठिकठिकाणी पाणी भरून मातीची भांडी ठेवली आहेत. तसेच त्याविषयी समाजात जनजागृती करण्याचे काम संस्था करीत असते. संस्थेच्या या उपक्रमामुळे पाण्याअभावी पक्ष्यांना जीव गमवावा लागत नाही, यासाठी कार्यकर्ते सक्रिय असतात. या उपक्रमांतर्गत पक्ष्यांसाठी दिवसरात्र पाण्याची सोय केली जाते. भांड्यातील पाणी संपल्यानंतर पुन्हा पाणी भरून ठेवले जाते, यासाठी दिवसातील ठराविक वेळी कार्यकर्ते पाणी घेऊन मैदान आणि उद्यानात जात असतात.दरवर्षी हिंदू नववर्ष दिवस म्हणजे गुढीपाडव्याला कल्याण शहरात निघणार्‍या स्वागतयात्रेत कृत्रिम घरटी उपलब्ध करून देण्याचे काम ही संस्थेने केले आहे. शहर परिसरात वाढणारे तापमान तसेच वृक्षांची मोठ्या प्रमाणावर होणारी तोड यामुळे पक्ष्यांच्या अस्तित्वावर मोठा परिणाम झाला आहे. पक्ष्यांची संख्या मोठ्या झपाट्याने कमी होत आहे. झाडांची कत्तल होत असल्याने शहरामध्ये तापमानतही वाढ झाली आहे. नागरिकांना तर यांचा त्रास होतोच पण पशू-पक्ष्यांना ही याचा सामना करावा लागतो. त्यामुळेच संस्थेने ‘ओंजळभर पाण्याचे दान’ हा उपक्रम हाती घेतला.संस्थेतर्फे दरवर्षी चिमण्यांच्या घरट्यांची स्पर्धा घेतली जाते. सगळ्या शाळांमध्ये जाऊन मुलांना याबाबत माहिती देण्यात येते.

‘टाकाऊपासून टिकाऊ’ या विचाराने प्रत्येकाने घरून चिमण्यांची घरटी बनवून आणायची आणि मग स्पर्धेनंतर ती घरटी आपापल्या घरी खिडक्यांमधून लावायची असतात. या स्पर्धेच्या माध्यमातून चिमण्यांना ही घरटी उपलब्ध होतात. या स्पर्धेत 150 हून अधिक स्पर्धक सहभागी होत असतात. त्यामुळे एका स्पर्धेमुळे 150 चिमण्यांची घरटी तयार होतात. घरट्यांची स्पर्धा घेतल्याने लहानपणापासूनचमुलांमध्ये याबाबत सजगता निर्माण होईल, या हेतूने स्पर्धेचे आयोजन केले जाते आणि प्रत्येकाने दिवसांतून थोडसं पाणी पक्ष्यांसाठी खिडकीत ठेवायला हवं. या मोहिमेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पक्षाचं महत्त्व पटवून दिल्यावर गोष्टी लोकांच्या लक्षात येतात. या संस्थेने 2009 पासून कामाला सुरुवात केली व त्यानंतर 2013 साली संस्थेची रीतसर नोंदणी करण्यात आली आहे. कल्याणमध्येच नाहीतर मुंबई, नाशिक, पुणे इथले लोक ही संस्थेचा एक भाग आहेत. अगदी लहान मुलांपासून रिटायर झालेल्या आजी आजोबापर्यंत बर्‍याच जणांचा या मोहिमेत सहभाग असतो. संस्थेच्या ‘चिमणी वाचवा’ या उपक्रमात महेश बनकर यांच्यासह रोहन तेली, निखिल जावळे, राहुल माने, प्रसाद धनावले,स्वप्निल कुंभार या मित्रांच्या मदतीने पक्षीप्रेमापोटी हा उपक्रम सुरू करण्यात आला, असे या स्वयंसेवी संस्थेचे अधिकारी महेश बनकर यांनी सांगितले.

दसर्‍याच्या दिवशी आपट्यांच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जाते. पण आपट्यांचे एक झाड वाढण्यासाठी चिंचेच्या झाडांपेक्षा ही अधिक कालावधी लागतो ही बाब लक्षात आल्यावर आपट्यांच्या वृक्षाचे रोपण करण्याचा संकल्प संस्थेच्यावतीने केला. त्याअंतर्गत संस्थेने कल्याण शहरातील 30 वेगवेगळ्या ठिकाणी आपट्यांच्या झाडांचे रोपण करण्यात आले. केवळ आपट्यांच्या झाडांचे रोपण न करता त्यांच्या संगोपनाची जबाबदारी ही संस्थेने घेतली. जानेवारी महिन्यात थंडी अधिक वाढू लागते. दिवाळीनंतर आपल्याकडील जुने कपडे कुठेतरी फेकून देतो. मात्र, ते फेकून न देता त्यांचा चांगला उपयोग करण्याचा निर्धार संस्थेने केला. त्यातूनच त्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बदलापूरनजीकच्या वागणीपाडा, वाघिणीचा पाडा येथील गरजू वनवासी लहान मुलांना व वृद्ध व्यक्तींना जुने कपडे देण्याचा उपक्रम राबवून त्यांच्या गाठलेल्या आयुष्याला ऊब देण्याचा प्रयत्न केला आहे. गरजू आणि हालाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करणार्‍या लोकांना थंडीच्या दिवसात संरक्षण मिळावे, या हेतूने हा उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत संस्थेचे सभासद कपडे देणार्‍या व्यक्तीच्या घरोघरी जाऊन कपडे जमा करतात. जमा झालेल्या कपड्यांची वर्गवारी करून ते गरजू वनवासी पाड्यावर जाऊन वाटप केले जाते.

‘लॉकडाऊन’च्या काळात अनेक सेवाभावी सामाजिक संस्था गरजू नागरिकांना मदतीसाठी पुढे आल्या होत्या. सामान्य नागरिकांप्रमाणेच तृतीयपंथी यांना देखील ‘लॉकडाऊन’ची झळ पोहोचली. ‘लॉकडाऊन’मुळे त्यांच्या उपजीविकेचे साधन बंद झाल्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेले हे तृतीयपंथीय अडचणीत सापडले होते. याबाबतची माहिती ‘इको ड्राईव्ह यंगस्टर्स फाऊंडेशन’च्या महेश बनकर यांना मिळाली. त्याबरोबर त्यांनी लगेचच संस्थेच्या माध्यमातून विठ्ठलवाडी येथील सुमारे 20 तृतीयपंथीयांना 15 दिवस पुरेल इतके धान्य देण्यात आले. त्यात पाच किलो तांदूळ, एक किलो तेल, एक किलो साखर, अर्धा किलो तुरडाळ, अर्धा किलो मूगडाळ, 100 ग्रॅम चहा पावडर, 100 ग्रॅम हळद पावडर, 100 ग्रॅम मिरची पावडर, एक किलो मीठ, एक किलो कांदे, एक किलो बटाटे, एक किलो पीठ आदींचा समावेश होता. तसेच संस्थेच्या माध्यमातून अन्नदानाचे काम ही करण्यात आले. त्यामुळे सुमारे पाच हजारांहून अधिक कुटुंबीयांना आधार मिळाला होता. संस्थेचे पदाधिकारी म्हणतात ”पर्यावरण संवर्धनासाठी ‘इको ड्राईव्ह यंगस्टर्स’च्या माध्यमातून जे काम केले जात आहे, ते काम केवळ या संस्थेत आहे असे नाही. त्यासाठी समाजातील सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. पर्यावरण वाचले तर आपण वाचू आणि पशूपक्षी, वृक्षलता जगल्या तर आम्ही जगू. त्यामुळे ‘इको ड्राईव्ह यंगस्टर्स’च्या कामात सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्यापासून आणि आजपासूनच सुरुवात करण्याची गरज आहे.”