चवदार तळे: एक प्रेरणा

    02-Apr-2024
Total Views |
Chavdar Tale Vikamanch

‘20 मार्च 1927 रोजी चवदार तळ्याची ती ऐतिहासीक घटना घडली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला आणि कोटयवधी जनतेच्या मानवी हक्काचा मार्ग प्रशस्त झाला. या दिनाच्या स्मृतीनिमित्त ‘चवदार तळे विचार मंचा’तर्फे गेली चार वर्षे 20 मार्च रोजी चवदार तळे, महाड येथे आम्ही भेट देतोे. यंदाच्या भेटीचे हे अनुभवचित्रण...

मार्च 2024 रोजी महाड येथील चवदार तळ्याला भेट दिली. समरसता गतीविधीचे कोकण प्रांत संयोजक नागेश धोंडगे, प्रांत टोळीतले सदस्य सूर्यकांत गायकवाड, विजय मोरे, सुचित्रा इंगळे, गणेश पुराणिक आणि मी असे आम्ही सर्व 19 मार्चला मुंबईहून महाडला रात्रीच पोहोचलो. काही वर्षांपासून 20 मार्च रोजी चवदार तळ्याला भेट देणार्‍यांंची संख्या वाढत आहे. ही सगळी भिमशक्ती आहे आणि खरी राष्ट्रशक्ती आहे. त्यांच्या भावना, श्रद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी वाहिलेल्या आहेत. बाबासाहेबांशिवाय समाजाला काही नको. बाबासाहेबांच्या नावाने जगणारे आणि मरायलाही तयार असणारे समाजबांधव आहेत. या समाजबांधवांना चवदार तळ्याच्या परिसरात आल्यावर त्रास होऊ नये याची काळजी प्रशासन घेतच असते. त्यामध्ये आम्हीसुद्धा खारीचा वाटा उचलतो. ‘चवदार तळे विचार मंचा‘ने कार्यक्रमाला येणार्‍या अनुयायांसाठी उत्कृष्ट भोजनाची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. मंचातर्फे एक पुस्तक स्टॉल लावला होता. त्यात दलित साहित्यावर आधारित अनेक पुस्तके विक्री करिता उपलब्ध केली होती.

या पुस्तक स्टॉलला अनेक मान्यवरांनी भेट दिली. तसेच कार्यक्रमासाठी आलेल्या अनुयायींनी या स्टॉलला भेट देऊन पुस्तके खरेदी केली. आमच्या पुस्तक स्टॉलमध्ये समाजाला सकारात्मक दृष्टिकोन देणारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रपे्रमी व्यक्तिमत्वाने अर्थप्रवाही असलेली पुस्तके होती. ’संविधान खतरे मे हैं’ म्हणत काही जण संविधानाचा विपरीत अर्थ लावत असतात. समाजात गैरसमज वाढवत असतात. आमच्या स्टॉलवर संविधानाचा सरळ सोपा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय’ हा विचार सांगणारी पुस्तक होती.तसे पाहायला गेले तर ’चवदार तळे विचार मंचा’तर्फे गेली चार वर्षे चवदार तळे येथे 20 मार्च रोजी होणार्‍या कार्यक्रमात सहभागी होत आहोत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे येथे अस्पृश्यता निवारणासाठी केलेल्या संघर्षाला यंदा 97 वर्ष पूर्ण झाली. दरवर्षी पूजनीय बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे हजारो अनुयायी संपूर्ण महाराष्ट्रातून येत असतात.

चवदार तळे येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन तसेच तळ्यातील पाण्याला स्पर्श करून बाबासाहेबांवरील निस्सीम आदर व्यक्त करतात. चवदार तळ्याचीही क्रांतिकारी घटना 1927 साली घडली. त्यावेळी या घटनेचे पडसाद समाजात उमटलेले होते. बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा संघर्ष केला म्हणून त्यांना विरोध करणारेही लोक होतेच. मात्र महाड नगरपरिषदेतील काही सुधारणावादी मंडळींनी या घटनेचा निषेध व्यक्त केला होता. नुसता निषेध व्यक्त केला नाही, तर बाबासाहेबाना नगरपरिषदेने बोलावून त्यांना व त्यांच्या अनुयायांना चवदार तळ्यात प्रवेश देऊन योग्य तो सन्मान करावा, असा ठराव देखील मंजूर केला. महाड नगर परिषदेने बाबासाहेबांना बैठकीत ठरलेल्या प्रमाणे बोलावून त्यांचा सत्कार सन्मान केला. खरे तर अस्पृश्यता निवारणाच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेबांनी समाज परिवर्तन घडवून आणले होते. त्या घटनेचे महत्त्व आजही कायम आहे.

 
अरुण गायकवाड