"उबाठा गटाच्या घराला..."; शिरसाटांचा राऊतांना टोला

    02-Apr-2024
Total Views |

Shirsat & Raut 
 
मुंबई : उबाठा गटाच्या घराला दरवाजेच राहिलेले नाहीत. जे होते ते तोडून सगळे बाहेर पडलेले आहेत, असा टोला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी लगावला आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
संजय शिरसाट म्हणाले की, "त्यांच्या घराला दरवाजेच राहिले नाहीत तर ते उघडणार कसे? उबाठा गटाच्या घराला दरवाजे राहिलेले नाहीत. जे होते ते दरवाजे तोडून सगळे बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडे कुणी जाण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून अशा प्रकारच्या वल्गना करणं याचा अर्थ तुम्हाला कुणीही विचारत नाही, असा होतो."
 
हे वाचलंत का? -  "ठाकरेंची शिवसेना केवळ त्यांच्या परिवारापर्यंत!"
 
"गद्दार कोण आहे हे ठरवणारे संजय राऊत कोण? ते स्वत:च गद्दार आहेत. त्यांनी उबाठा गट आणि शरद पवारांचा गट संपवला आहे. त्यांनी घेतलेली सुपारी पुर्णपणे निभावली आहे. त्यामुळे तेच खऱ्या अर्थाने गद्दार आहेत. आम्हाला कुणी गद्दारी आणि स्वाभिमानाच्या गोष्टी शिकवू नये. आम्हाला तिकडे जायचं नाही. तुमच्याकडे जे आहेत त्यांना आधी सांभाळा," असा सल्ला शिरसाटांनी राऊतांना दिला आहे.
 
ते पुढे म्हणाले की, "आमच्या महायूतीच्या बोलणीच्या अनेक महिने अगोदरपासूनच आघाडीमध्ये बोलणी सुरु झाली होती. परंतू, जिथून सुरुवात झाली होती आजही तिथेच आघाडी थांबली आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून दूर गेलेली आहे. आता ती जवळ येणं शक्य नाही हे स्पष्ट झालं आहे. काँग्रेसने शरद पवार गटाच्या चिन्हावर लढावं की, शरद पवार गटाच्या लोकांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं यावरूनच त्यांची आता वेगळ्या प्रकारची लढाई सुरु झाली आहे."
 
"उबाठा गटाने काही ठिकाणी आपल्या उमेदवाराची घोषणा केल्याने त्यांच्यात वाद सुरु आहेत. त्यामुळे आघाडी टिकेल की, नाही असा संभ्रम लोकांमध्ये आहे. याउलट यूती किती लवकर होईल आणि आम्हाला प्रचाराला लागता येईल, असा आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या सर्व गोष्टींचा शेवट होईल. नारायण राणे प्रचाराची सुरुवात करतात की, नाही याबद्दल मला माहिती नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या सर्व बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे त्यांनी कोणत्याही नावाची घोषणा केली तरी यूती म्हणून आम्ही सर्वजण त्यांचं काम करु," असेही ते म्हणाले आहेत.