उद्धव ठाकरेंनी तिकिटाच्या बदल्यात पैसे घेतल्याची माझ्याकडे यादी!

नारायण राणे यांचा दावा; कोणताही व्यवसाय न करता कोट्यवधींची मालमत्ता कशी जमवली?

    02-Apr-2024
Total Views |
Narayan Rane Press Conference


मुंबई :   "उद्धव ठाकरे यांनी पैसे घेऊन तिकीट वाटल्याची यादी माझ्याकडे आहे. महापालिकेत एखाद्या समितीचा अध्यक्ष करण्यासाठी पैसे घेतले जायचे. खासदार, आमदारकीच्या तिकिटासाठी पैसे घेतले जायचे. एकदिवस पत्रकार परिषद घेऊन त्या लोकांना पुढे आणतो. पैसे घेऊन पद आणि तिकीट देण्याचे काम उद्धव ठाकरेंचे आहे. मी स्वत: बाळासाहेबांना याविषयी तक्रार केली होती. आम्ही डोळ्यांनी पैसे मोजताना पाहिले आहे. काम, धंदा ना व्यवसाय तरी मर्सिडिजमधून फिरतात. हे पैसे कुठून आणले? दुसरी मातोश्री कुठून उभी राहिली?", असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवार, दि. २ एप्रिल रोजी केला.

उद्धव ठाकरे यांनी रामलिला मैदानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर केलेल्या टीकेचा राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. ते म्हणाले, भाजप तडीपार करण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनता तडीपार करेल. डोळ्यासमोर ४० आमदार गेले तरी तू काही करू शकला नाही. त्यामुळे तडीपार होण्याची वेळ तुझ्यावर आली. उद्धव ठाकरे काय आहे, हे मला माहिती आहे. मी बोललो तर मातोश्रीबाहेर पडणे मुश्किल होईल. मोदींचे कौतुक करता येत नसेल, तर करू नका, पण औरंगजेबाची तुलना करीत असाल तर आम्हाला काही लीला दाखवायला लागतील, असा इशारा राणे यांनी दिला.
 

मुख्यमंत्री असताना केवळ २ दिवस मंत्रालयात गेलेला माणूस आता रामलीला मैदानात जातो, इंडी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतो, हे हास्यास्पद आहे. खासदार ५, आमदार १६ अशी व्यक्ती त्या मैदानात जावून देशाच्या पंतप्रधानावर बोलते, यांची राजकीय उंची आणि बौद्धिकता काय? भाजपाचे ३०३ खासदार आहेत. भाजपाला तडीपार करण्याची भाषा ते करीत आहेत. पण आम्ही कोरोनाकाळात औषधाचे पैसे खाणाऱ्याला तडीपार करू. उद्धव ठाकरेंनी मानसिक स्थिती बिघडली आहे. पंतप्रधानांवर बोलण्याची पात्रता नाही. मी वैयक्तिक टीका करत नाही. खालच्या पातळीवर विषय नेत नाही. परंतु हे लोक मोदींविषयी एकेरी भाषेत बोलतात. जास्त बोलाल, तर ते सहन करणार नाही, असे राणे म्हणाले.


शिवसेना संपायला राऊत जबाबदार

- लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे ५ पेक्षा जास्त खासदार निवडून येणार नाहीत. लोकसभेनंतर संजय राऊतही दिसणार नाही. हा शरद पवारांचा प्रामाणिक माणूस आहे. शिवसेना संपण्याला संजय राऊत कारणीभूत आहे. मोदींबाबत राऊतांनी बोलू नये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोदींचे कौतुक करतात, अनेक देशांच्या अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक आणि प्रशंसा केली. अर्थव्यवस्थेत भारत पुढे आला आहे. देशाचा जीडीपी वाढला. २०३० पर्यंत जगात तिसरी अर्थव्यवस्था भारताची होईल. गेल्या ९ वर्षांत ५४ योजना गरिबांसाठी जाहीर केल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रासाठी काय केले? कुठला विकास आराखडा बनवला, कुठे काही नवी योजना बनवली? उद्धव ठाकरेंसारखा बालिश माणूस पाहिला नाही. तुमचे राजकारण आता संपले आहे. आता मराठी माणूस तडीपार होणार नाही, तर मातोश्रीचा उद्धव ठाकरे तडीपार होण्याची वेळ आली आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.
 

सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ भाजपचाच

सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ हा भाजपचाच आहे. तेथे उमेदवार कोण असेल, ते पक्ष ठरवेल. कोणीही लुडबूड करू नये. मी तिकीट मागितले नाही. मला न मागता भरपूर मिळाले आहे. भाजपाने जर माझे नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार. प्रत्येक पक्षाला बैठक बोलवण्याचा अधिकार आहे. शिवसेनेचे किती कार्यकर्ते आहेत? भाजपाची जिल्हा परिषद, नगरपालिकेत मोठी ताकद असताना आम्ही तो मतदारसंघ अजिबात सोडणार नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला.