सशक्त भारत घडवण्यासाठी सुसंस्कृत समाज घडवण्याची गरज!

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

    02-Apr-2024
Total Views |

Mohanji Bhagwat
(Mohanji Bhagwat Amarkantak)

भोपाळ :
"सशक्त भारत घडवण्यासाठी शिस्तबद्ध, चारित्र्यसंपन्न आणि सुसंस्कृत समाज घडवण्याची गरज आहे. ज्यासाठी संत-मुनींना आश्रमातून बाहेर पडून पुढे यावे लागेल. तरच छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे कठोर शिस्त, सुसंस्कृत जीवन आणि चारित्र्यशक्तीच्या जोरावर विकसित आणि बलशाली भारताची उभारणी होईल.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. 

अमरकंटक येथे एका धार्मिक कार्यक्रमात त्यांनी उपस्थित साधू-संतांशी संवाद साधला. अनूपपुर येथील प्रवासादरम्यान सरसंघचालकांनी सुरुवातील नर्मदा उद्गम मंदिरातील ‘नर्मदा कुंड’ येथे नर्मदा नदीची पूजा केली व त्यानंतर एकरसानन्द आश्रम आणि मृत्युंजय आश्रम येथे अनेक संतांच्या भेटीगाठी घेतल्या.

हे वाचलंत का? : मंदिरातील भाविकांना बेशुध्द करण्यासाठी कट्टरपंथीयांनी फेकले मांसाचे तुकडे!

सरसंघचालकांनी सनातन संस्कृती, हिंदू धर्म, सशक्त भारताची निर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि इतर विषयांवर भाष्य केले. सर्व संतांना, द्रष्ट्यांना अभिवादन करून ते म्हणाले की, "शिवाजी महाराजांची मूल्ये, चारित्र्य यांचे त्यांच्या विरोधकांनीही कौतुक केले, म्हणून प्रत्येकजण त्यांच्यापासून प्रेरणा घेतो. संतांच्या प्रवचनांनी चारित्र्यनिर्मिती आणि लोकांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्याच्या माध्यमातून समाज सुधारणेस मदत केली. सांस्कृतिक मूल्ये अंगीकारण्यासाठी आणि आचरणात आणण्यासाठी हिंदू समाजात जागृती होणे महत्त्वाचे आहे. माणूस सुधारला की समाज आपोआप बदलतो."


Mohanji Bhagwat

पुढे ते म्हणाले, "समाजातील लोकांनी स्वत:ला संस्कारित करण्याची गरज आहे. व्यक्तीने स्वतःमध्ये सुधारणा केली तर समाज आपोआप विकसित होईल. देशात हिंदू प्रबोधनाचे चांगले वातावरण आहे, मात्र तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. इतरांना उपदेश करण्यापूर्वी स्वतःचे आचरण सुधारण्याची आवश्यकता आहे." सरसंघचालकांनी सनातन संस्कृती, हिंदू धर्म, सशक्त भारताची निर्मिती आणि पर्यावरण रक्षण या विषयावरही आपले विचार खुलेपणाने मांडले.

याप्रसंगी स्वामी हरिहरानंदजी महाराज यांनी सरसंघचालकांना 'पुजा स्थळ कायदा १९९१' रद्द करणे, अमरकंटक येथे ‘नर्मा लोक’ विकसित करणे आणि इतर मागण्यांसह तीन कलमी मागणी पत्र सादर केले. जगदीशानंद महाराजांनी आश्रमाच्या भाडेतत्त्वाच्या विस्ताराबाबत इतर संतांच्या वतीने सरसंघचालकांना पत्र सादर केले. यावेळी रा.स्व.संघाचे अ.भा.कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी, स्वामी रामभूषण दास जी महाराज, आचार्य स्वामी रामकृष्णनंद जी महाराज, स्वामी लवलीन महाराज, आदी मंडळी उपस्थित होती.