संरक्षण निर्यातीचा सर्वोच्च विक्रम

    02-Apr-2024
Total Views |
Indian defense exports
 
भारताच्या संरक्षण निर्यातीने २१,०८३ कोटी रुपयांची सर्वोच्च निर्यात नोंदवली. कोणे एकेकाळी शस्त्रास्त्रांच्या बाबतीत सर्वोच्च आयातदार देश म्हणून भारताची ओळख होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून संरक्षण उत्पादनांची निर्यात करणारा देश म्हणून भारत ओळखला जातो. केंद्र सरकारच्या धोरणात्मक उपाययोजनांना आता गोमटी फळे मिळू लागली असून, त्याचा फायदा निर्यातवाढीत प्रतिबिंबित झालेला दिसतो.

भारताच्या इतिहासात प्रथमच नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात संरक्षण निर्यातीने विक्रमी २१,०८३ कोटी रुपयांची अर्थात २.६३ अब्ज अमेरिकी डॉलर इतका उच्चांक गाठला. गेल्या आर्थिक वर्षातील १५ हजार, ९२० कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीच्या तुलनेत ती ३२.५ टक्क्यांनी जास्त आहे. २०१३-१४च्या तुलनेत गेल्या दहा वर्षांत संरक्षण निर्यात ३१ पटीने वाढली. देशातील संरक्षण उद्योग, यातील खासगी कंपन्या तसेच सार्वजनिक उपक्रमांनी सर्वोच्च संरक्षण निर्यात साध्य करण्यासाठी केलेले प्रयत्न यासाठी कारणीभूत आहेत. खासगी क्षेत्र आणि सार्वजनिक उपक्रमांचे योगदान हे ६० आणि ४० टक्के इतके आहे. त्याचबरोबर संरक्षण निर्यातदारांना जारी करण्यात आलेल्या निर्यात परवान्यांच्या संख्येतही वाढ झाली. गेल्या आर्थिक वर्षातील १ हजार, ४१४ निर्यात परवान्यांच्या तुलनेत गेल्यावर्षी ही संख्या १ हजार, ५०७ वर पोहोचली आहे. हे यश भारताच्या देशांतर्गत संरक्षण उद्योगाच्या वाढत्या क्षमता अधोरेखित करणारा ठरले आहे.

संरक्षण निर्यातीला चालना देणारे अनेक घटक आहेत. संरक्षण उपकरणांमध्ये स्वयंपूर्णतेसाठी सरकारच्या प्रयत्नामुळे स्वदेशी क्षमतांच्या विकासाला चालना मिळाली. हे भारताला स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच निर्यातक्षम उत्पादनांना चालना देणारे ठरले. केंद्र सरकारने आणलेले ‘मेक इन इंडिया’ धोरण निर्यात क्षेत्राला ‘आत्मनिर्भर’ करण्याबरोबरच देशाची निर्यात वाढवणारे ठरले. संशोधन आणि विकासामधील गुंतवणुकीमुळे भारतीय संरक्षण तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली. भारतीय बनावटीची उपकरणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक बनतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मातब्बर कंपन्यांच्या तुलनेत भारतातील उत्पादने तुलनेने कमी दरातही उपलब्ध होतात. हा किमतीमधील फरक सजग खरेदीदारांसाठी एक महत्त्वपूर्ण विक्री बिंदू ठरत आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये सहभाग आणि सुव्यवस्थित प्रक्रियांसह विविध उपक्रमांद्वारे संरक्षण निर्यातीला सरकारच्या सक्रिय प्रोत्साहनाचे बळ मिळत आहे.

ही कामगिरी भारतासाठी आशादायक संधी उपलब्ध करून देणारी ठरली. भरभराट होत असलेले संरक्षण निर्यात क्षेत्र भारताच्या आर्थिक वाढीस हातभार लावत लक्षणीय विदेशी चलन उत्पन्न मिळवून देऊ शकते. वाढीव निर्यातीमुळे उत्पादन, डिझाईन आणि संबंधित सेवा क्षेत्रांमध्ये उच्च-कुशल नोकर्‍यांची निर्मिती होऊ शकते. संरक्षण उपकरणे निर्यात केल्याने भारताची इतर देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी वाढू शकते आणि लष्करी सहकार्यात वाढ होऊ शकते. एक मजबूत निर्यात उद्योग स्वतःच्या संरक्षण गरजांसाठी विदेशी पुरवठादारांवर भारताचे अवलंबित्व कमी करणारा ठरतो.जागतिक संरक्षण बाजार अत्यंत स्पर्धात्मक आहे. जगभरातील दिग्गज कंपन्यांचे या बाजारपेठेवर वर्चस्व. भारतीय उत्पादनांसाठी विश्वास आणि ब्रॅण्ड ओळख निर्माण करण्यासाठी वेळ आणि मेहनत साहजिकच लागणार आहे. भारताने हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, त्यांची निर्यात केलेली उपकरणे कडक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांची पूर्तता करतात आणि कायमस्वरूपी ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी देतील.

प्रमुख संरक्षण आयातदार असलेल्या भारताने जागतिक संरक्षण निर्यात बाजारपेठेतील एक महत्त्वाचा देश म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रम संरक्षण उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादनाला प्राधान्य देतो. यामुळे क्षेपणास्त्रे, रडार, युद्धनौका, हलकी लढाऊ विमाने यांसारख्या क्षेत्रात स्वदेशी क्षमतांचा विकास झाला असून, भारत उच्च दर्जाच्या संरक्षण उत्पादनांची निर्यात करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत पारंपरिक पुरवठादारांवर अवलंबून राहिल्याने, खरेदी स्त्रोतांमध्ये विविधता आणण्याची धोरणात्मक गरज निर्माण झाली आहे. निर्यातदार देश म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित करत, भारत विदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करत, स्वावलंबन मजबूत करत आहे. संशोधन आणि विकास क्षेत्रामधील भारत करत असलेल्या उच्च गुंतवणुकीमुळे तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली आहे. त्यामुळेही निर्यातीच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शनांमध्ये सहभाग घेत असून, निर्यात प्रक्रिया सुलभ करत आहे. त्याचवेळी देशांतर्गत संरक्षण उत्पादकांना आर्थिक प्रोत्साहन देणे यासारखे उपक्रम राबवत संरक्षण निर्यातीला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे.

भरभराट होत असलेला संरक्षण निर्यात उद्योग भारताला अनेक फायदे देऊ शकतो. यात संरक्षण निर्यात भारताच्या आर्थिक वाढीला हातभार लावत लक्षणीय विदेशी चलन उत्पन्न देत आहे. वाढणारे संरक्षण निर्यात क्षेत्र उत्पादन, डिझाईन आणि संबंधित सेवा क्षेत्रात उच्च-कुशल नोकर्‍या निर्माण करणारे ठरले. जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्याची गरज भारताला नावीन्यपूर्णतेत आघाडीवर ठेवून संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आणखी संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देत आहे. संरक्षण उत्पादनांची निर्यात वाढवण्यासाठी निर्यात प्रक्रिया सुलभ करणे तसेच जटिल आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.जागतिक आव्हानांसह पुढील पिढीतील संरक्षण उत्पादने विकसित करण्यासाठी, संशोधन आणि विकासात सातत्याने गुंतवणूक करणे आवश्यक ठरते. संयुक्त उपक्रम आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करारांद्वारे दिग्गज कंपन्यांसोबतची भागीदारी भारताच्या क्षमतांत वाढ करणारी ठरत आहे. तसेच संरक्षण बाजारपेठेत ती वाढ करणारी ठरली आहे. भारतीय संरक्षण उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी एक मजबूत विपणन धोरण विकसित करणे तसेच विश्वासार्ह ग्राहक सेवा प्रदान करणे, हे आंतरराष्ट्रीय खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

संरक्षण निर्यातीत भारताच्या वाढीमध्ये आर्थिक आणि धोरणात्मक विकासाची अपार क्षमता आहे. आव्हानांना तोंड देऊन, गुणवत्ता आणि नवकल्पना यावर लक्ष केंद्रित करून तसेच सु-परिभाषित रणनीती अमलात आणून, भारत जागतिक संरक्षण बाजारपेठेत स्वतःचे असे स्थान निर्माण करू शकतो. हे क्षेत्र केवळ रोजगार निर्माण करणारे नाही, तर अर्थव्यवस्थेला चालना देत, जागतिक सुरक्षेतील एक प्रमुख खेळाडू म्हणून भारताचे स्थान उंचावणारे आहे. भारताच्या संरक्षण निर्यातीचे भविष्य शाश्वत धोरणांचे रुपांतर प्रत्यक्षात आणण्याच्या भारताच्या क्षमतांवर अवलंबून आहे. भारताची विक्रमी संरक्षण निर्यात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. गुणवत्ता आणि नवकल्पना यावर लक्ष केंद्रित करत, भारत जागतिक संरक्षण बाजारपेठेतील एक विश्वासार्ह खेळाडू म्हणून आपले स्थान मजबूत करू शकतो.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयाने भारताच्या संरक्षण उत्पादन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी अनेक पुढाकार हाती घेतल्यानेच संरक्षण निर्यातीत विक्रमी वाढ नोंदवली गेली. ही वाढ भारतीय संरक्षण उत्पादने तसेच तंत्रज्ञानाची जागतिक पातळीवरील स्वीकार्हता दर्शवणारी ठरली आहे. भारताच्या संरक्षण निर्यातीत स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ हे विमान मोलाची भूमिका बजावणार आहे. २८ तारखेला या विमानाची यशस्वी चाचणी बंगळुरु येथे घेण्यात आली. भारतीय हवाई दलात हे विमान लवकरच सामील होईल. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याच्या खरेदीत स्वारस्य दाखवले जात आहे. ‘तेजस’च्या आगमनानंतर भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात ही कितीतरी पटीने वाढणार आहे. भारत हा लवकरच शस्त्रांस्त्राच्या आयातीसाठी नव्हे, तर निर्यातीसाठी म्हणून ओळखला जाणारा देश ठरेल.