"ठाकरेंची शिवसेना केवळ त्यांच्या परिवारापर्यंत!"

    02-Apr-2024
Total Views |

Thackeray Family 
 
मुंबई : उद्धव ठाकरेंची शिवसेना केवळ त्यांच्या परिवारापर्यंत मर्यादित आहे, असा घणाघात भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा यांनी केला आहे. त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावरही निशाणा साधला.
 
दिनेश शर्मा म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये अजिबात ताळमेळ आणि समन्वय नाही. शिवसेना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवारापर्यंत मर्यादित आहे. शिवसेनेचा हिंदुत्ववादी चेहरा आज रामविरोधी चेहरा असलेल्या काँग्रेसचा मित्र बनला आहे. त्यांचा नकली हिंदुत्ववादी चेहरा आणि रामप्रेमी चेहरा आता रामद्रोही चेहऱ्यासोबत आपले अस्तित्व गमावून बसला आहे."
 
"उद्धव ठाकरेंनी परिवारवादी पक्षांसोबत तसेच रामाचा आणि आंबेडकरांचा विरोध करणाऱ्या लोकांसोबत सरकार बनवून जनतेला धोका दिला आहे. आज प्रकाश आंबेडकरांनीदेखील त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे 'देर आये दुरुस्त आये' असं म्हणावं लागेल. याच काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकांना संसदेत न पोहोचू देण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आज योग्य निर्णय घेतला आहे. समाजातील प्रत्येक वर्गाने आता काँग्रेसला ओळखले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांनीदेखील आपला परिवारवादी विचार बदलला नाही," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीने कोरोना काळात खिचडी घोटाळा केला. मेट्रो, बुलेट ट्रेनच्या विकासात अडचणी आणल्या. पण आज डबल इंजिन सरकारच्या काळात मेट्रो बनताना दिसत आहे. बुलेट ट्रेन, अटल सेतू आणि अनेक मोठमोठे काम आज सुरु आहेत. २०१९ मध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सरकार बनवून जो धोका दिला होता, त्याची शिक्षा या लोकसभा निवडणूकीत जनता त्यांना देणार आहे. ही निवडणूक वेगळ्या प्रकारची आहे. मला वाटते की, महाराष्ट्रात राजकीय पक्ष निवडणूक लढवत नाही तर जनतेने स्वत: आपल्या हातात निवडणूक घेतली आहे. संपूर्ण देशात मोदी लाट आहे, पण महाराष्ट्रात मी मोदी मॅजिक बघितली आहे," असेही ते म्हणाले.