'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' फिल्म मार्केटसाठी तीन मराठी चित्रपटांची शासनाकडून निवड

    02-Apr-2024
Total Views |
राज्य शासनाने 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' फिल्म मार्केटसाठी 'जिप्सी','भेरा'आणि 'वल्ली' या तीन मराठी चित्रपटांची केली निवड
 

cannes  
 
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने फ्रान्स येथील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Cannes Film Festival) फिल्म मार्केटकरीता तीन मराठी चित्रपटांची यंदा निवड झाली आहे. यात शशी खंदारे दिग्दर्शित 'जिप्सी', श्रीकांत भिडे दिग्दर्शित ‘भेरा’ आणि मनोज शिंदे दिग्दर्शित 'वल्ली' या चित्रपटांची निवड झाल्याची (Cannes Film Festival) माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिली.
 
फ्रान्समध्ये १४ ते २२ मे २०२४ या कालावधीत कान्स येथे हा चित्रपट महोत्सव होणार असून महामंडळामार्फत २०१६ पासून कान्स महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपट पाठवले जातात. मराठी चित्रपटांची ख्याती आणि प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावी आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनाही मराठी चित्रपटांची महती कळावी हा या मागील हेतू आहे. दरम्यान, यंदा कान्ससाठी एकूण २३ चित्रपटांचे प्रवेश प्राप्त झाले होते. आणि त्यातून या तीन चित्रपटांची निवड करण्यात आली.
 
कान्ससाठी पाठवण्यात येणाऱ्या चित्रपटांच्या निवडीसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने तज्ज्ञ परीक्षण समिती तयार केली असून यात श्रीकांत बोजेवार, रसिका आगाशे, अर्चना बोऱ्हाडे, क्षितिजा खंडागळे, संदीप पाटील यांचा समावेश होता. या समितीने तिन्ही चित्रपटांची निवड एकमताने केली. कान्ससाठी निवड झालेल्या चित्रपटांबद्दल सांगायचे झाल्यास 'जिप्सी' या चित्रपटाची कथा भटक्या विमुक्त जमातीच्या कुटुंबाची आहे. ‘भेरा’ या चित्रपटाची कथा करोना काळातील तळ कोकणातील एका दुर्गम भागातील गावातील घटना आहे तर 'वल्ली' या चित्रपटाचे कथानक महाराष्ट्रातील जोगता परंपरेविषयी माहिती देणारे आहे.