कर्वे-कान्हेरे-देशपांडे या मराठी क्रांतिकारकांचा इतिहास अज्ञात का?

    19-Apr-2024   
Total Views |
 
kanhere deshpande karve
 
आपल्याला भगतसिंग-सुखदेव-राजगुरू ही त्रयी माहिती आहे. एका इंग्रज अधिकाऱ्याला मारून फाशीवर जाणारे वीर म्हणून शाहिद दिन साजरा करतो आपण. पण त्याआधी २१ वर्षांपूर्वी अजून ३ क्रांतिकारक अशाच एकक्रांतिकारी घटनेत म्हणजे एका इंग्रज अधिकाऱ्याचा खून केल्या प्रकरणी फाशी दिले गेले. हे आपण का लक्षात ठेवत नाही? कृष्णाजी कर्वे-अनंत कान्हेरे-विनायक देशपांडे हे ते तीन तरुण. मूळ नाशिकचे. आजच्या दिवशी म्हणजे १९ एप्रिल रोजी त्यांना फाशी झाली होती. मी सविस्तर घटना सांगते. आणि यानिमित्ताने काही प्रश्नही उपस्थित करते. पाहूया आपल्याला उत्तरे सापडतायेत का?
 
ते वर्ष होतं १९१०. हे तिघे नाशिकचे क्रांतिकारक. सावरकरांचे अनुयायी. सहन करणे नको, सशस्त्र क्रांतीच कामाची या विचाराने पेटून शास्त्र हातात घेण्यासाठी उत्सुक असलेले तरुण. कान्हेरे, ज्यांनी केवळ १८ व्य वर्षी प्राणाहुती दिली. इतरांचा माग लागू नये म्हणून खुनानंतर लगेच ते आत्मघात करून घेणार होते परंतु आपण केलेलं कार्य पाहायला मिळावे डोळेभरून या हेतूने ते गोळ्या घातल्या तिथेच शांतपणे पाहत उभे राहिले. यथावकलश त्यांना पकडून नेले व साथीदारांची नावे पोलिसांना समजू शकली. त्यानंतर कृष्णाजी कर्वे-अनंत कान्हेरे-विनायक देशपांडे या तिघांनाही ठाणे येथील कारागृहात फाशी देण्यात आले. नाशिकचा जिल्हाधिकारी आर्थर मेसन टिपेट्स जॅक्सन याला गोळ्या घालण्याचा कट होता. त्याची मुंबईस बदली झाली तर हे काम करण्यास उशीर होईल म्हणून घाईत नाशकातच त्याच्यावर घाला घातला. नाशिकला विजयानंद नाट्यगृहात शारदा नावाचे नाटक पाहायला जॅक्सन आला होता. कान्हेरे यांचे नाव आपण वाचले असते इतिहासाच्या पुस्तकात पण त्यांच्याबद्दलची इतकी मोठी घटना आपल्याला माहिती नसते. खुदिराम बोस व मदनलाल धिंग्रा यांच्यानंतर कान्हेरे-कर्वे-देशपांडे या क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान केले.
 
असेही म्हंटले जाते की जॅक्सन चा खून झाल्यामुळेही तिघे सावरकरांचे अनुयायी आहेत म्हणून सावरकरांना स्वातंत्र्यवीर हे बिरुद लावले जाते. तर काहींचे म्हणणे सावरकरांना एका सभेदरम्यान सवातंत्र्यवीर हे बिरुद लोकांनी दिले. अर्थात हा आपला आजचा विषय नाही, कान्हेरे यांच्याविषयी मला माहिती असलेल्या गोष्टी सांगते.
 
ते आपल्या काकांकडे शिक्षणासाठी औरंगाबादला गेले. त्यांचे भाऊ गणपतराव बार्शी येथे राहत होते. त्यांच्याकडे काही काळ राहिले आणि मग पुन्हा औरंगाबादला परत गेले. तेव्हा ते गंगाराम रुपचंद श्रॉफ यांच्या घरात भाड्याने राहत असत. गंगाराम यांचा येवल्यात टोणपे नावाचा एक मित्र होता. त्या काळात अनेक गुप्त क्रांतिकारी संस्था कार्यरत होत्या. नाशिकमधील एका गुप्त संस्थेचा टोणपे हे सदस्य होते. गणू वैद्य आणि गंगाराम एकदा नाशिकमधील गुप्त क्रांतिकारी संस्थेसाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी केले होते. या वैद्यांशी कान्हेरे यांची ओळख झाली. नंतर कान्हेरे यांनी त्या दिवसातील मैत्रीबद्दल ‘मित्र प्रेम’ नावाची कादंबरी लिहिली. कान्हेरे क्रांतिकारी गटांच्या कार्याकडे आकर्षित झाले. सावरकर बंधूनी नाशिक येथे अभिनव भारत संस्थेची स्थापना केली होती. कृष्णाजी गोपाळ कर्वे यांनी बाबाराव सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली अशाच एका गुप्त गटाची स्थापना केली होती. या संस्थेचे दुसरे सदस्य विनायक नारायण देशपांडे होते. सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा समवयस्क साथीदारांची जोड मिळाली. जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. २१ डिसेंबर १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये 'शारदा' या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला.
 
ठाण्याच्या तुरुंगात आजही अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे. नाशिकमध्ये 'अनंत कान्हेरे' नावाचे क्रिकेटचे मैदान आहे. आणि ते आपल्या इतिहासाच्या पुस्तकातही कायमचे विराजमान झाले. परंतु आजच्या दिवसाला शाहिद दिन असेही म्हणत अहित की त्यांचे कौतुक राष्ट्रीय पातळीवरही होताना दिसत नाही. असे नेमके काय असावे की त्यांच्याकडे इतिहासाने दुर्लक्ष केले? काय असावे?

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.