फिलिपाइन्सचे रक्षण करणार भारताचे ‘ब्रह्मोस’

    19-Apr-2024
Total Views |
brahmos 
 
नवी दिल्ली : भारताने शुक्रवारी शक्तिशाली ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली तुकडी फिलिपाइन्सला दिली. ( brahmos to philippines ) देशाच्या संरक्षण निर्यातीतील एक मोठे पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे.
 
ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पहिली खेप घेऊन भारतीय हवाई दलाचे सी – १७ ग्लोबमास्टर कार्गो विमान शुक्रवारी फिलिपाइन्समध्ये पोहोचले. भारतीय पथकामध्ये हवाई दल, नौदल आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे पथक सामील होती. ही क्षेपणास्त्रे फिलिपाइन्स मरीन कॉर्प्सकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी भारतीय संघातील अधिकाऱ्यांनी फिलिपाईन्स मरीन कॉर्प्सच्या सैनिकांना मिठाई देऊन क्षेपणास्त्र मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
 

brahmos
 
दक्षिण चीन समुद्रात वारंवार होणाऱ्या चकमकींमुळे फिलीपिन्स आणि चीन यांच्यात तणाव वाढला असताना क्षेपणास्त्र प्रणाली फिलिपाइन्सला मिळाली आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीच्या तीन बॅटरी फिलीपिन्सकडून त्यांच्या किनारपट्टीच्या भागात तैनात केल्या जातील, जेणेकरुन या क्षेत्रातील कोणत्याही धोक्यापासून संरक्षण होईल.
 
ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डिआरडीओ) आणि रशियन फेडरेशनच्या एनपीओ मशीनोस्ट्रोएनिया यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेला हा जगातील सर्वात यशस्वी क्षेपणास्त्र कार्यक्रम मानला जातो. जागतिक स्तरावर अग्रगण्य आणि सर्वात वेगवान अचूक-मार्गदर्शित शस्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या ब्रह्मोसने भारताची प्रतिकार क्षमता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारतीय लष्कराने २००७ पासून अनेक ब्रह्मोस रेजिमेंट्स आपल्या शस्त्रागारात सामील केल्या आहेत.