ममतांचा गुंडाराज सुरूच! भाजप नेत्याच्या घराबाहेर ठेवले बॉम्ब

    19-Apr-2024
Total Views |
Stones pelted during polling in West Bengal's Cooch Behar
 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. १९ एप्रिल २०२४ रोजी मतदानादरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या बातम्या माध्यमांवर प्रसिद्ध होत आहेत. कूचबिहारमधील चांदमारी भागात जोरदार दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान काही जण जखमीही झाले आहेत. तुफानगंजमध्येही हाणामारी झाली आहे. याशिवाय कूचबिहारमधील दिनहाटा भागात भाजप कार्यकर्त्याच्या घराबाहेर बॉम्ब सापडला आहे. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. कारण भाजप कार्यकर्त्याच्या घराबाहेर थोड्याच अंतरावर हा बॉम्ब ठेवण्यात आला होता.
दरम्यान कूचबिहारमधील सोशल मीडियावर व्हायरल होणारी छायाचित्र पाहता तिथे मतदानाच्या दिवशी तणावाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर मतदानाला कोण येणार, असा सवात स्थानिक लोक विचारत आहेत. व्हिडिओमध्ये दोन बाजूंनी दगडफेक होताना दिसत आहे. दरम्यान एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कूचबिहारच्या चांदमारी येथे भाजपचे बूथ अध्यक्ष लाब सरकार यांना मारहाण करण्यात आली आहे.ज्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी बंगालमधील निवडणुकीदरम्यान घडलेल्या घटना पाहता भाजप नेते सुरुवातीपासूनच म्हणत होते की, मतदानाच्या दिवशी राज्यात हिंसाचार होऊ शकतो आणि त्यासाठी प्रथम सुरक्षा व्यवस्था करावी. त्यामुळेच मतदान केंद्रावर अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते. तरीही आज बंगालमधील कूचबिहारमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान सुरू झाले आणि हिंसाचाराच्या बातम्या आल्या. ज्यामुळे भाजपने तृणमूलच्या गुंडगिरीवर आक्षेप घेतला आहे.