पाकला घरघर, दानासाठी बर्गर!

    19-Apr-2024   
Total Views |
burger
 
पाकिस्तानात असा एकही दिवस जात नाही, जेव्हा या देशात काही अजबगजब घटना घडत नाही. नुकतेच पंजाबच्या आणि पाकिस्तानच्या प्रथम महिला मुख्यमंत्री म्हणून मिरवणार्‍या मरियम नवाझ यांनी शाळेतील मुलांना चक्क ‘मॅकडॉनाल्ड्स’चे बर्गर खाऊ घातले. त्यामुळे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लीम लीगचे सर्वेसर्वा नवाझ शरीफांच्या या कन्या पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत.
 
शालेय विद्यार्थ्यांना बर्गरच तर दिले, त्यात मरियमचे काय चुकले, असा प्रश्नही उपस्थित होणे साहजिकच. म्हणजे श्रीमंत मुले ‘मॅकडॉनाल्ड्स’चे बर्गर कधीही खाऊ शकतात, मग एखाद्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना एखादा दिवस बर्गर खायला दिले, तर काय कयामत आली का? असाही विचार करणार्‍यांची संख्या कमी नाही. बघा, स्वत: राज्याच्या कन्वाळू, दयावान मुख्यमंत्री गरीब मुलांसाठी कित्ती काय काय करतात, म्हणून लगोलग मरियम यांची प्रतिमा चमकावण्याचे उद्योगही पंजाब प्रांतात जोरात सुरू झाले. मरियमची ही कृती समाजसेवेच्या उद्देशाने योग्य वाटत असेलही, पण आपल्या या कृतीमुळे समाजात नेमका काय संदेश जाईल, याचा अंदाज मात्र मरियमला घेता आला नाही. म्हणूनच त्यांच्या बर्गरदानाचे फोटो सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाल्यानंतर मरियम यांच्यावर विरोधकांनी टीकेची अक्षरश: झोड उठवली.
 
म्हणजे एकीकडे इस्लामिक राष्ट्रांमध्ये गाझाच्या मुद्द्यावरून इस्रायलविरोधात रोष वाढीस लागलेला दिसतो. तिथे अमेरिका आणि इस्रायल समर्थक देशांमधील कंपन्या, त्यांची उत्पादने यांच्यावर बहिष्काराचे अस्त्रही कित्येक संघटनांनी उगारले आहे. तसे आवाहनही या संघटनांनी मुस्लीम नागरिकांनी केले आहे. त्यात ‘मॅकडॉनाल्ड्स’ ही जगविख्यात अमेरिकन कंपनी. त्याच इस्रायलला गाझाविरोधी पाठबळ देणार्‍या अमेरिकन कंपनीचे बर्गर शालेय विद्यार्थ्यांना देताना मरियम यांना लाज कशी वाटली नाही, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. तसेच गाझातील मुलांचा उपासमारीमुळे मृत्यू होत असताना, मरियम यांनी पाकिस्तानी विद्यार्थ्यांना बर्गर खायला घालून, मुसलमानांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच उद्योग केल्याचीही टीका त्यांच्यावर करण्यात आली.
 
आता केवळ ‘मॅकडॉनाल्ड्स’ ही अमेरिकन कंपनी आहे, हा एकमेव विरोधाचा मुद्दा नाही. मरियम या एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. हे एक अत्यंत जबाबदारीचे पद. त्यात त्या स्वत: महिला आणि माताही असल्यामुळे, पौष्टिक आहाराचे महत्त्व त्यांनी समाजात बिंबविणे अपेक्षित होते. शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार, फळे किंवा तत्सम खाद्यपदार्थ सहज उपलब्धही करून देता आले असते. त्यातून विद्यार्थ्यांचा पोषण आहार आणि आरोग्याबाबत एक सकारात्मक संदेशही समाजात गेला असता. पण, मुळातच शरीफांच्या शानोशौकतीत वाढलेल्या मरियम यांना पौष्टिक आहारापेक्षा ‘जंक फूड’ म्हणून आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेला बर्गर या विद्यार्थ्यांना द्यावासा वाटला, ही बाबही तितकीच खटकणारी. आपण आज या विद्यार्थ्यांना बर्गर फुकट का होईना खाऊ घातला, पण उद्या याच मुलांनी त्यांच्या गरीब आईबापांकडे बर्गरचा हट्ट धरला, तर आधीच अन्नान्न दशा असलेल्या पाकिस्तानी पालकांना हे बर्गर त्यांच्या पाल्यांना विकत घेऊन देणे परवडेल का? याचा विचारही मरियम यांच्या गावी नसावा.
 
एकीकडे त्या विद्यार्थ्यांना बर्गर देऊन खूश करण्याचा प्रयत्न करत असल्या, तरी मुलींच्या शिक्षणाबद्दलची, बालविवाह, आरोग्याच्या सोईसुविधांबाबतची पाकिस्तानातील अनास्था दूर करण्यात तेथील पंजाब सरकार आणि केंद्रातील शरीफ सरकारही आजवर सपशेल अपयशी ठरले आहे, हे वास्तव. तेव्हा, अशा बर्गरदानातून आपली प्रतिमा उंचावण्याच्या प्रयत्नात मरियम या टीकेच्या धनी ठरल्या आहेत. एकीकडे पाकिस्तानात महागाईने कहर केलेला, दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती, दहशतवादानेही नागरिक त्रस्त. महागाई दरही २५ टक्क्यांपलीकडे. ‘एशियन डेव्हलेपटमेंट बँके’च्या आकडेवारीनुसार, आशिया खंडातील पाकिस्तान हा राहणीमानाचा खर्च न परवडणार्‍या देशांत पहिल्या क्रमांकावर. पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही केवळ १.९ टक्के इतक्या कासवगतीने वाढण्याची शक्यता. म्हणूनच एकीकडे पाकिस्तानला घरघर लागलेली असताना, मरियमचे हे बर्गरदान वादाच्या भोवर्‍यात सापडले नसते, तरच नवल!

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची