उष्णतेची लाट; एमएमआरडीएकडून कामगारांची काळजी

बांधकाम कामगारांचे संरक्षण करण्याकरीता एमएमआरडीएची सक्रिय पावले

    19-Apr-2024
Total Views |

mmrda


मुंबई, दि. १९ :
उन्हाळ्यात संपूर्ण एमएमआर क्षेत्रामध्ये तापमानात सतत वाढ होत आहे. तसेच या प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. एमएमआरडीए संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प राबवत आहे आणि हजारो बांधकाम कामगार विविध प्रकल्प स्थळावर अथकपणे जबाबदारी सांभाळत आहेत. उन्हाळ्याच्या अतिउष्णतेचा सामना करण्यासाठी एमएमआरडीएने विविध सक्रिय पावले उचलून बांधकाम कामगारांची सुरक्षा आणि कल्याणाकरीता बांधकाम स्थळांवर अनेक प्रभावी उपाययोजना राबवून बांधकाम कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. त्याबाबत परिपत्रक काढत सर्व कंत्राटदारांना नियमांची अंमलबजावाणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बांधकाम कामगारांना जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा त्यांना विश्रांती घेता यावी म्हणून बांधकाम स्थळांच्या परिसरात निवारा शेड उभारणी केली जात आहे. शरीरातील निर्जलीकरण समस्येकरीता कार्यक्षमतेने सामना करण्यासाठी ओआरएस वितरणाचा काटेकोरपणे पुरवठा केला जात आहे. शिवाय पिण्याचे पाणी थंड ठिकाणी ठेवून बांधकाम कामगारांना वेळोवेळी पुरेसे पाणी पिण्यास प्रोत्साहित केले जाते. याव्यतिरिक्त कामगारांना त्यांच्या शिफ्ट दरम्यान पुरेशा विश्रांतीसाठी अतिरिक्त वेळ देण्यात येत आहे.

विशेषत: सुर्या पाणी पुरवठा योजनेच्या कंत्राटदाराने ग्लुकोज वितरण, नियमित डॉक्टरांच्या भेटी, नियतकालिक मॉक ड्रिल, उष्माघातावर कामगारांचे प्रशिक्षण, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विश्रांतीसाठी शेड यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. उष्णतेच्या हानिकारक प्रभावांपासून बांधकाम कामगार सुरक्षित आहेत अशी खात्री करण्यात येत आहे. एमएमआर क्षेत्र व आजूबाजूच्या अनेक क्षेत्रांमध्ये उन्हाळा उच्च बिंदू गाठत असल्याने तीव्र उष्णतेचा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण एमएमआर क्षेत्रामधील पायाभूत सुविधा प्रकल्प हाताळण्यासाठी कंत्राटदारांना बांधकाम कामगारांच्या संरक्षणासाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उदाहरणार्थ, उच्च उष्णतेच्या कालावधी दरम्यान बांधकाम साइट्सवरील बाहेरील कामकाज टाळणे, कारण या काळात कामगारांना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. शिवाय पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) ची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे कामगारांना प्रचंड उष्णतेपासून होणारा त्रास वाचेल. तसेच उष्णतेच्या लाटांपुढे राहण्यासाठी नियमित हवामान निरिक्षण करणे, उष्णतेशी संबंधित आपत्कालिन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी सर्वसमावेशक आपत्कालिन प्रतिसाद योजना आणि उष्माघातासारख्या परिस्थितीला सुलभतेने हाताळण्यासाठी योग्य डॉक्टर आणि रूग्णवाहिकांची उपलब्धता यासारख्या अनेक सक्रिय उपाययोजना बांधकाम कामगारांचे हित जपण्यासाठी कठोरपणे राबविल्या जात आहेत.