इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील रोजगार निर्मितीत १५४ टक्क्यांनी वाढ!

क्वेस कॉर्पने दिलेल्या अहवालात समोर, रोजगार निर्मितीत टेलिकॉम क्षेत्र अग्रणी

    19-Apr-2024
Total Views |

Electronic
 
मुंबई: इलेक्ट्रोनिक क्षेत्रात मोठी रोजगार निर्मिती झाली असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.अहवालानुसार भारतातील इलेक्ट्रोनिक क्षेत्रातील कौशल्य विकास व रोजगार बांधणीत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ तब्बल १५४ टक्क्यांनी झाल्याचे यात म्हटले गेले आहे. वर्कफोर्स मॅनेजमेंट सोलूशन सेवा पुरवणारी कंपनी क्वेस कॉर्पने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विशेषतः टेलिकॉम क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती झाली आहे. एकूण भरतीतील ६४ टक्के भरती ही टेलिकॉम क्षेत्रात झाली असल्याचेही यात नमूद केले आहे. टेलिकॉम नंतर लाईटिंग व ऑटोमोटिव क्षेत्राचा क्रमांक यात लागला आहे.
 
क्वेस कॉर्प (Quess Corp) चा अहवाल मार्च 2023 ते मार्च 2024 या कालावधीतील अंतर्गत तसेच बाह्य डेटा तसेच उद्योग तज्ञांच्या मतांवर आधारित आहे.यात पुढे असे आढळून आले की इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात विशेषत: उत्पादन क्षेत्रात महिलांची विविध भूमिकांमध्ये लक्षणीय उपस्थिती आहे.
 
विशेषतः मोबाईल उत्पादनात ही रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. यानंतर किरकोळ व सेवा क्षेत्रात रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. तज्ञांच्या अंदाजाने आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत 1 दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि २०२५ पर्यंत बाजाराचा आकार ४०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
याविषयी बोलताना, ही वाढ केवळ ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळेच चालत नाही तर 'मेक इन इंडिया' आणि उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेसारख्या सरकारी उपक्रमांमुळेही त्याला चालना मिळाली आहे,असे क्वेस कॉर्पचे अध्यक्ष लोहित भाटिया म्हणाले आहेत.