कोलकाता (
West Bengal Ram Navami Violencel
) : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये श्रीराम नवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक आणि हातबॉम्ब फेकण्यात आले. या घटनेत अनेक रामभक्त जखमी झाले आहेत. काही रामभक्तांची स्थिती नाजूक आहे. बुधवार, दि. १७ एप्रिल २०२४ रोजी रामनवमीला ही दुर्घटना उघडकीस आली. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंज व्हायरल होत आहेत. देशभरातील रामभक्तांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
व्हिडिओत रामभक्तांवर फेकले जाणारे हातबॉम्ब स्पष्ट दिसत आहेत. यापैकीच एक व्हिडिओ पश्चिम बंगालच्या भाजप प्रदेशच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. ममता बॅनर्जींच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपने जोरदार टीका केली आहे. पश्चिम बंगाल सरकार रामनवमीच्या शोभायात्रेवर सुरक्षा करण्यात अपयशी ठरले आहेत. ही स्थिती भयाण आहे. मुर्शिदाबादच्या रेजीनगरमध्ये हिंदूंना कट्टरपंथींकडून निशाणा करण्यात आले आहे. विशिष्ट मतांसाठी आता त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही," असा आरोपही त्यांनी केली आहे.
या व्हिडिओत कित्येक जण छतांवर चढलेले दिसत आहेत. खाली जाणाऱ्या शोभायात्रेवर ते दगडफेक करत आहेत. खाली असलेल्या रामभक्तांची दगडफेकीमुळे तारांबळ होत आहे. व्हिडिओत हेम्लेट घालून पोलीस कर्मचारीही उभे आहेत. पोलीस घटनास्थळी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना यात अपयश आले आहे. २३ सेकंदाच्या या व्हिडिओत खाली असणाऱ्यांची धावपळ स्पष्ट दिसून येत आहे. भाजप नेते जगन्नाथ चट्टोपाध्याय यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. "ही संपूर्ण घटना ही निंदनीय असून प्रशासनाचा हलगर्जीपणा नडला आहे.", असा आरोपही त्यांनी केला.
असा हल्ला यापूर्वीही झाला होता, पोलीसांना अशा घटनांची माहिती असतानाही दुर्लक्ष का करण्यात आले, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. जगन्नाथ चट्टोपाध्याय यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात पोलीसांसह निमलष्करी जवान परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. विश्व हिंदू परिषदेने या घटनेची माहिती देत पीडितांसोबत उभे राहून त्यांना धीर देण्याचा प्रयत्नही केला आहे. “बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शक्तिपूरमध्ये रामनवमीतील शोभायात्रेत रामभक्त जखमी झाल्याची आणि अनेकांची प्रकृती नाजूक असल्याच्या बातम्या येत आहेत. ममता बॅनर्जींचे सरकार आणि स्थानिक पोलीस प्रशासन हे कशाप्रकारे फोल ठरत आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे.", असे आपल्या एक्स पोस्टवर त्यांनी म्हटले आहे.
“बंगालमध्ये केंद्रीय सुरक्षा बल तैनात करण्याची वेळ आता आली आहे. ज्यामुळे हिंदूंचे रक्षण होईल. सण साजरे करताना निर्भय आणि शांततेत होणे गरजेचे आहे. विहीपतर्फे आम्ही या घटनेची कठोर शब्दांत निंदा करतो.” विहीपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनीही या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. ते म्हणतात, "बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये जिहादी बे-लगाम झाले आहेत. रामभक्त संकटात आहेत. ममता दिदींनी दिलेल्या रामनवमीच्या धमक्यांचे पालन जिहादींनी केले आहे. स्थानिक पोलीस प्रशासन आणि शासन हिंदूंची रक्षा करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे."
या व्हिडिओत शोभायात्रेत बॉम्ब हल्ले करण्यात आले. काही घटनांमध्ये रामभक्तांच्या डोक्यातही जखमा झाल्या आहे. काही जणांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसत आहेत. त्याशिवाय काही जणांची डोकेही फोडण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून रामनवमीनिमित्त शोभायात्रा काढणे कठीण बनले आहे. मुर्शिदाबादच्या कित्येक ठिकाणी देशी बॉम्ब पोलीसांनी हस्तगत केले आहे. रामभक्तांबद्दल इतका द्वेष कि त्यांच्यावर हातबॉम्ब चालविण्यात आले. ममता सरकार इतके हतबल आणि लाचार बनले की, कुठलीही कारवाई करू शकलेले नाही. आतापर्यंत या घटनेत एकूण २० जण जखमी झाले आहेत. एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य काहींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
गेल्यावर्षीही याच ठिकाणी हावडा भागात अशाच प्रकारच्या घटना उघडकीस आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी कोलकाता उच्च न्यायालयाने सुरक्षा यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यास सांगितले होते. केंद्रीय दलांनाही पाचारण करण्यासाठी सांगितले होते.ममता सरकारने एकूण पाच हजार पोलीस दल रामनवमीनिमित्त तैनात केले होते. मात्र, त्यांना कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयश आले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान ममतांच्या रामनवमीला केलेल्या ट्विटची चर्चाही सोशल मीडियावर होत आहे. त्या म्हणाल्या, "सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा, पण सर्वांनी हा सण शांततेत पार पाडला पाहिजे."