‘ओम् फट स्वाहा!’ तात्याविंचू परत येणार; 'झपाटलेला ३' ची घोषणा
18-Apr-2024
Total Views |
महेश कोठारे दिग्दर्शित आणि आदिनाथ कोठारे अभिनीत ‘झपाटलेला ३’ तब्बल दहा वर्षांनी येणार
मुंबई : “माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात”, हे संवाद ऐकले डोळ्यांसमोर उभा राहतो तो विचित्र दिसणारा तात्याविंचू,ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि दिग्दर्शक महेश कोठारे. ९०च्या दशकात वेगळेच कथानक मांडत प्रेक्षकांचे पुरेपुर मनोरंजन करणारा चित्रपट म्हणजे ‘झपाटलेला’(Zapatlela 3) . १९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘झपाटलेला’ चित्रपटाचा आता तिसरा भाग 'झपाटलेला ३' (Zapatlela 3) लवकरच येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
दिग्दर्शक महेश कोठारे आणि विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीचा हा सुपरहिट चित्रपट आता आणखी नव्या रुपात येणार आहे. यापुर्वी २०१३ मध्ये ‘झपाटलेला २’ आला होता जो थ्रीडी चित्रपट होता. यात आदिनाथ कोठारे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता १० वर्षांनी येणाऱ्या ‘झपाटलेला ३’ मध्ये आदिनाथ कोठारेच प्रमुख भूमिकेत दिसणार असे दिसत आहे. आदिनाथनेच या चित्रपटाचा पोस्टर सोशल मिडियावर शेअर केला आहे.
'झपाटलेला ३' चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे करणार आहेत. ‘झपाटलेला' मी तात्या विंचू असं सिनेमाचं नाव असून पुन्हा प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी तात्या विंचू सज्ज झाला आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर कपाळावर गोळी लागलेला तात्या विंचू आणि आदिनाथ कोठारे दिसत असून २०२५मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.