लांगूलचालनाचा हिंसक आविष्कार

    18-Apr-2024
Total Views |
ram
 
तीनेक वर्षांपूर्वीपर्यंत हिंदू धार्मिक मिरवणुकीच्या वेळी हिंसाचार, ही एक दुर्मीळ घटना होती. पण, काही वर्षांपासून हिंदू नववर्ष असो, रामनवमी असो, की हनुमान जयंती, या सणांच्या वेळी काढण्यात येणार्‍या मिरवणुकांवर मशिदींमधून दगडफेक करण्याच्या घटनांमध्ये एकाएकी वाढ झालेली दिसते. विशेष म्हणजे, असा हिंसाचार प्रामुख्याने बिगर-भाजपशासित राज्यांमध्येच घडून येत आहे. मुस्लीम मतांच्या लांगूलचालनाने घेतलेले हे हिंसक रूप विरोधकांमधील वैफल्यच दर्शविते.
 
यंदाही देशाच्या काही भागांमध्ये काढण्यात आलेल्या रामनवमीच्या मिरवणुकांवर दगडफेक करण्याच्या घटना घडल्या असून प. बंगालमध्ये तर बॉम्बस्फोटही घडविण्यात आले. झारखंडमधील बोकारो शहरालगतच्या जालागावमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आणि दोन समाजांमध्ये हाणामारीही घडल्याचे वृत्त आहे. बंगळुरूमध्येही भाजप समर्थकांवर हल्ले करण्यात आले. रामनवमीच्या मिरवणुकांवर होणारे हल्ले हे फक्त बिगर-भाजपशासित राज्यांमध्येच होत आहेत, हीसुद्धा लक्षणीय बाब आहे. अल्पसंख्याकांच्या मतांच्या लाचारीसाठी सत्तारूढ पक्षाकडून आता धार्मिक तणावाला उत्तेजन दिले जात असल्याचेच हे लक्षण मानावे लागेल.
 
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली ढासळती राजकीय कारकीर्द सावरण्यासाठी रामनवमीच्या दिवशी अखेरीस दंगे घडवून आणलेच. काही दिवसांपासून ममताबानो यांनी आपल्या भाषणांमध्ये रामनवमीच्या दिवशी राज्यात हिंसाचार घडवून आणला जाईल, अशी भाकिते वर्तविली होती. हा हिंसाचार भाजपचे कार्यकर्ते मुद्दाम घडवून आणतील, असा त्यांच्या बोलण्याचा हेतू होता. लोकसभा निवडणुकीत मतांचे धृवीकरण करण्यासाठी भाजप असा हिंसाचार घडवील, असे ममताबानो यांना सूचित करायचे होते. पण, बंगालमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेला हिंसाचार हा मुर्शिदाबाद या मुस्लीमबहुल भागात झाला होता, हे लक्षात घेतले पाहिजे. तेथे हिंदू हे अगदीच अल्पसंख्य असून जखमी झालेले हिंदूच आहेत.
 
ममताबानोंच्या राज्यात भाजपला हिंसाचार करण्याची गरजच नाही. तृणमूल काँग्रेसचे पोसलेले गुंड कार्यकर्ते त्यासाठी सदैव तयारच असतात. त्यानुसार यंदाही बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आहे. होळी खेळण्यासाठी आधीपासूनच रंग, पिचकारी आणून ठेवावी, तशी रामनवमीच्या मिरवणुकांवर दगडफेक करण्यासाठी मशिदींच्या आणि मुस्लीम वस्त्यांच्या छपरांवर दगडांची रास तयार ठेवली जाते. गतवर्षी हरियाणातील नूंह येथे झालेल्या दंगलीने, तसेच काही वर्षांपूर्वी ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलींनी ही गोष्ट स्पष्ट केली होती. दिल्लीतील दंगलीत तर तेथील आम आदमी पक्षाच्या मुस्लीम नगरसेवकाच्या घराच्या गच्चीवर रबराची गोफण तयार करून ठेवली होती. त्यातून लगतच्या हिंदू वस्त्यांवर पेटते बोळे आणि दगड फेकले जात होते.
 
मुस्लीम मतांच्या लांगूलचालनासाठी ममतांनी आधी रामनवमीची मिरवणूक काढण्यास परवानगीच नाकारली होती. ‘विश्व हिंदू परिषदे’ला अशी मिरवणूक काढण्यासाठी कलकत्ता उच्च न्यायालयात दाद मागावी लागली. उच्च न्यायालयाने मिरवणुकीस परवानगी दिली, तेव्हा कोठे डायमंड हार्बर परिसरात विहिंपतर्फे मिरवणूक काढण्यात आली. म्हणजे भारतासारख्या देशात बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाला आपलेच आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामाच्या जयंतीची मिरवणूक काढण्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागते, ही स्थिती ब्रिटिश राजवटीसारखीच म्हणावी लागेल. ममता बॅनर्जी यांनी तर ‘जय श्रीराम’ या घोषणेवरच बंदी घातली आहे. आपल्याच देशात आपल्याच देवाच्या नावाचा उद्घोष करणे, हा गुन्हा ठरला आहे. प. बंगालचे रूपांतर विस्तारित बांगलादेशात करण्याचा ममताबानोंचा उद्देश आहे.
 
लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने जारी केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात अपेक्षेप्रमाणेच ‘सीएए’ हा कायदा रद्द करणे, समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देणे आणि ‘एनआरसी’ रद्द करणे ही आश्वासने दिली आहेत. सार्‍या देशात जो कायदा लागू होईल, तो आपल्या राज्यात लागू करू दिला जाणार नाही, ही भूमिका निश्चितच देशविरोधी तर आहेच, पण हुकूमशाही आणि लोकशाहीविरोधी मानसिकता दर्शविणारी आहे.
 
मुस्लीमबहुल असलेल्या प्रदेशात आणि मुस्लीम मतांसाठी लांगूलचालनाचे राजकारण करणार्‍या पक्षांच्या राज्यांमध्ये हिंदूंच्या मिरवणुकांवर हल्ले होत आहेत. हैदराबादमध्येही अशा मिरवणुकीला सरकारने परवानगी नाकारली होती. पण तेथील भाजपचे आमदार राजा सिंह यांनी त्याची पर्वा न करता प्रचंड जनसहभागाने अशी मिरवणूक काढली. रामनवमीच्या दिवशी समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी मंदिरात जाऊन देवाची पूजा करणार्‍यांना ‘पाखंडी’ संबोधले होते. त्यांच्या या विधानावरून उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष चांगलाच अडचणीत सापडणार आहे. महाराष्ट्रातही एका माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आपल्या जाज्वल्य हिंदुत्वाची लाज वाटते, असे सूचित करून मुस्लीम समाजाला झाले-गेले विसरून जाण्याचे आणि आपल्या गटाला मते देण्याचे आवाहन केले होते.
 
या घटनांवरून देशातील राजकारणाने नव्हे, तर भाजपविरोधी पक्षांच्या राजकारणाने किती नीच पातळी गाठली आहे, ते दिसून येते. देशाच्या विकासासाठी, देशाला मजबूत करण्यासाठी आणि सामान्य माणसाचे जीवनमान उंचाविण्यासाठी या पक्षांकडे कोणतीही ‘व्हिजन’ नाही, योजना नाही, की त्या दिशेने काम करण्याची इच्छाशक्तीही नाही. उलट अल्पसंख्याक मतदारांना खुश करण्यासाठी धार्मिक भावनांना चिथावणी देण्याचा सोपा मार्ग त्यांनी अवलंबिल्याचे दिसते. कसेही करून सत्तेवर राहायचे, जनतेचा पैसा लुटायचा आणि निवडणुका आल्या की अल्पसंख्याक मतदारांच्या धार्मिक भावनांना हात घालून आणि आता प्रसंगी हिंसाचार करूनही मतांचे धृवीकरण करायचे, असा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. पण, हे नेते एक गोष्ट विसरतात आणि ती म्हणजे, आजचा मतदार हा अधिक समजूतदार, समंजस झाला आहे.
 
केंद्रात सरकार भाजपचे असले, तरी त्या सरकारने सुरू केलेल्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील सर्व वर्गांना आणि गरजूंना मिळत आहे, हा सामान्य माणसाचा अनुभव आहे. केंद्र सरकार कोणत्याही मुद्द्यावरून पक्षपात करीत नाही, हे लक्षात आल्यामुळे प. बंगालमध्येही भाजपचा पाया आणि समाजातील पाठिंबा विस्तारत असल्याचे दिसून येते. त्याची जाणीव झाल्यामुळेच ममताबानो बिथरल्या आहेत. संदेशखालीसारख्या घटनांनी तर त्यांची पक्षपाती आणि गुंडांना संरक्षण देणार्‍या राजवटीची लाज वेशीवर टांगली गेली आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत प. बंगालमधील सर्वाधिक जागा भाजप जिंकील, अशी स्पष्ट चिन्हे दिसून येत आहेत. तसे झाल्यास दोन वर्षांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत ममताबानोंची गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे.