पुणे : बारामती लोकसभेत यंदा नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. मात्र, आता या लढाईत एक नवीन ट्विस्ट आला आहे. बारामती लोकसभेतून स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्ज भरला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी निवडणूकीसाठी डमी अर्ज भरल्याची माहिती पुढे आली आहे.
यावर्षी बारामती लोकसभेची निवडणूक महायूतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यात होणार आहे. यासाठी सुनेत्रा पवार यांनी गुरुवार, १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यानंतर थोड्याच वेळात अजित पवारांनाही डमी अर्ज भरल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचलंत का? - उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवारांचं मोठं वक्तव्यं!
सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्जात काही अडचण आल्यास त्यांनी हा अर्ज भरला आहे. दरम्यान, काही कारणांमुळे सुनेत्रा पवारांच्या अर्जामध्ये अडथळे आल्यास अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राज्यात सध्या लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु असून शुक्रवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. दुसरीकडे, पुढील टप्प्यांतील निवडणूकांसाठी उमेदवारांकडून आपापल्या मतदारसंघात उमेदवारी अर्जही भरण्यात येत आहेत.