‘पतंजली’ची चूक कोठे झाली?

    17-Apr-2024
Total Views |

पतंजली
 
कायदा सर्वांना समान आहे, हा भारतातील प्रचलित विनोद आहे, पण तो वस्तुस्थितीवर आधारित आहे. तसे नसते, तर केजरीवाल हे ‘ईडी’च्या समन्सकडे नऊ वेळा दुर्लक्ष करूनही मुक्तपणे फिरू शकले नसते. कारण, सामान्य माणसाने एकदा जरी समन्सकडे दुर्लक्ष केले, तर त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाते. तिच गोष्ट जाहिरातींची. चुकीचे आणि दिशाभूल करणारे दावे करणार्‍या हजारो जाहिराती दररोज झळकत असल्या, तरी फक्त ‘पतंजली’वर ठपका ठेवण्यात आला.
 
सर्वोच्च न्यायालयाचा मनाई आदेश डावलून ‘पतंजली’ समूहाने आपल्या उत्पादनांची दिशाभूल करणारी जाहिरात केली. या कारणास्तव या समूहाचे प्रमुख आचार्य बालकृष्ण आणि विख्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई केली जात आहे. यासंदर्भात सध्या सुरू असलेल्या सुनावणीच्या वेळी बालकृष्ण आणि बाबा रामदेव यांनी सुनावणी करणार्‍या दोन्ही न्यायाधीशांपुढे हात जोडून माफी मागितली असून, यापुढे आपण असे काही करणार नाही, असे वचनही दिले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अहसानुल्ला यांनी या दोघांविरोधात कठोर टिप्पणी केली आणि त्यांना अद्दल घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी ‘आम्ही तुम्हाला फाडून टाकू (वुई विल रिप यू अपार्ट)’ यासारखी टिप्पणी या न्यायाधीशांनी केली होती. असे शब्द वापरणे हे अनुचित होते, असे मत सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या अनेक निवृत्त न्यायाधीशांनीही व्यक्त केले आहे.
 
बाब रामदेव यांनी आपण मधुमेह, कर्करोग वगैरे अनेक घातक आजार योगासने आणि आयुर्वेदिक औषधांद्वारे पूर्णपणे बरे करू शकतो, असा दावा करणार्‍या जाहिराती केल्या होत्या. त्याच जाहिरातींमध्ये अ‍ॅलोपथी या पाश्चिमात्य उपचार पद्धतीवर टीका केली होती आणि अ‍ॅलोपथीला असे आजार बरे करता येत नाही, असा दावा केला होता. या दाव्यांविरोधात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ या संस्थेने न्यायालयाकडे दाद मागितली. ‘पतंजली’चे दावे ग्राहकांची पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि अशास्त्रीय पायावर आधारित आहेत, असे या याचिकेत नमूद केले आहे. न्यायालयाने ‘पतंजली’ समूहाला असे दावे करणार्‍या जाहिराती प्रसिद्ध करण्यास मनाई केली असताना, या समूहाने त्यानंतरही काही काळ अशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. त्यामुळे संतापलेल्या सर्वोच्च न्यायालयाने या दोघांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला भरला. दिशाभूल करणार्‍या जाहिराती प्रसिद्ध करणार्‍यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण, फक्त ‘पतंजली’च अशा जाहिराती करीत आहे, अशी सर्वोच्च न्यायालयाची समजूत आहे का? अनेक क्षेत्रांतील अनेक कंपन्यांकडून सर्रास दिशाभूल करणार्‍या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. त्याबाबत सर्वोच्च न्यायालय का मौन पाळून बसले आहे? ‘हमदर्द’ नावाची कंपनी अशीच अनेक उत्पादने विकत असते.
 
‘पतंजली’ समूहाने प्रथमच हजारो वर्षे प्राचीन आणि प्रस्थापित असलेल्या आयुर्वेद उपचार पद्धतीनुसार औषधे बनविली. त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला; कारण त्या उत्पादनांचा लाभ होत असल्याचा अनुभव ग्राहकांना येत होता. ही उत्पादने इतकी यशस्वी झाली की जगभर अब्जावधी रुपयांचा व्यवसाय करणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफ्यावर त्याचा विपरित परिणाम झाला. या बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही आपल्या उत्पादनांमध्ये बदल करावे लागले आणि काही आयुर्वेदी तत्त्वे असलेली उत्पादने विक्रीस काढावी लागली. यावरून ‘पतंजली’च्या उत्पादनांची परिणामकारकता सिद्ध होते. या बहुराष्ट्रीय कंपन्यांची सध्या विकली जाणारी अनेक ‘हर्बल’ उत्पादने हा ‘पतंजली’च्या उत्पादनांचा विजय आहे. यातील वादाने आता काहीसे राजकीय-सांस्कृतिक वळण घेतले आहे. आयुर्वेद हे प्राचीन भारतीय शास्त्र आहे. पण, पाश्चिमात्य देशांमध्ये त्यास मान्यता मिळालेली नाही. भारतात आयुर्वेदाचे महत्त्व आणि प्रसार वाढत चालल्याचे पाहून काही पाश्चिमात्य कंपन्यांनी ‘पतंजली’ला कायदेशीर कारवाईत अडकविले आहे, असा सूर उमटत आहे. बाबा रामदेव हे भगवी वस्त्रे परिधान करून हिंदुत्त्वाचा प्रचार करतात, असाही आरोप करण्यात येत आहे.
 
सध्या टीव्हीवर जुगार खेळण्यास प्रोत्साहन देणार्‍या जाहिराती उघडपणे प्रसारित होतात. त्यात अनेक आघाडीचे चित्रपट कलाकार सहभागी झाल्याचे दिसते. अनेक सिनेतारेतारकांनी यापूर्वीच पान-गुटखा-मावा या पदार्थांच्या जाहिराती केल्या आहेत. व्यसनांना सरळसरळ प्रोत्साहन देणार्‍या जाहिरातींवर न्यायालयाचा आक्षेप नाही, हेही लक्षात घेण्यासारखे. पाश्चिमात्य देशांतील अनेक प्रस्थापित गृहितके भारतातही लागू करण्याचा आग्रह सर्वोच्च न्यायालय धरू लागले आहे. जी गोष्ट अमेरिकेसारख्या देशात सर्वमान्य आहे, ती गोष्ट भारतीय समाजमनास मान्य होईलच, असे नाही. याचे कारण भारतीयांच्या सांस्कृतिक संवेदना आणि आदर्श हे अमेरिकेपेक्षा भिन्न आहेत. ‘लिव्ह-इन’ संबंधांकडेही भारतीय समाजात अनैतिक दृष्टिकोनातून पाहिले जाते. पण, न्यायालयाने त्यांना कायदेशीर मान्यता दिली आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचारास मोकळीक देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा हेतू आहे, अशीही टीका यावर केली जाते. पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या गोष्टी स्वीकारल्या जातात, त्या भारतातही स्वीकारल्या जाव्यात, असा सर्वोच्च न्यायालयाचा आग्रह आहे. म्हणूनच ‘पतंजली’ विरोधातील कारवाईला ‘पाश्चिमात्य विरुद्ध भारतीय’ असा पैलू पडला आहे.
 
‘पतंजली’ची यात एवढीच चूक झाली की, त्यांनी अन्य उपचारपद्धतींच्या विश्वासार्हतेवर आणि परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयुर्वेदिक औषधांनी विकार किंवा रोग दूर करण्याचा दावा ‘पतंजली’ जरूर करू शकते, पण अ‍ॅलोपथी किंवा दुसर्‍या कोणत्याही उपचार पध्दतीद्वारे रोग दूर होऊ शकत नाही, असे म्हणणेही चुकीचे. अ‍ॅलोपथी ही एक शास्त्रसंमत उपचारपद्धती असून तिच्या गुणकारी औषधांचा लाभ कोट्यवधी रुग्ण जगभर घेत आहेत. पण, ‘पतंजली’च्या औषधांचा प्रसार करण्याच्या बाबा रामदेव यांच्या या चुकीच्या धोरणामुळे आधीच विवादास्पद असलेल्या आयुर्वेद उपचार पद्धतीवर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

-राहुल बोरगांवकर