दोडामार्ग - १२ फूटी 'किंग कोब्रा' सापाचे रेस्क्यू: बागायतीत आढळला नागराज

17 Apr 2024 16:29:54
king cobra dodamarg


मुंबई (अक्षय मांडवकर) -
वन विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधून साडे अकरा फुटांच्या 'किंग कोब्रा' सापाचा बुधवार, दि. १७ एप्रिल रोजी बचाव केला (king cobra dodamarg). दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावातून या सापाचा बचाव करण्यात आला आहे (king cobra dodamarg). पश्चिम घाटामध्ये या सापाचा अधिवास असून महाराष्ट्रामध्ये केवळ दोडामार्ग तालुक्यात हा साप आढळतो. (king cobra dodamarg)

'किंग कोब्रा' सापाला 'नागराज' असे म्हटले जाते. दोडामार्ग तालुक्यात त्याला 'डोम' किंवा 'काळा साप' म्हणतात. हा साप विषारी असून तो लांबीने साधारण २० फूटांपेक्षा अधिक वाढतो. कर्नाटक, गोवा आणि केरळमध्ये विस्तारलेल्या पश्चिम घाटामध्ये हा साप प्रामुख्याने आढळतो. पश्चिम घाटामधील 'किंग कोब्रा'च्या अधिवास क्षेत्राची उत्तरेकडील सीमा ही दोडामार्ग तालुका आहे. या तालुक्यातून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच 'किंग कोब्रा'च्या नोंदी आहेत. हा साप मोठा असल्याने त्याला मारून टाकले जाते. त्यामुळे सहजा दोडामार्गमध्ये त्याला जीवदान दिल्याच्या घटना घडत नाहीत. मात्र, बुधवारी सकाळी झोळंबे गावातील सतीश कामत यांच्या मालकीच्या बागायतीत 'किंग कोब्रा'चे दर्शन घडले. येथील एका झाडावर हा 'किंग कोब्रा' बसला होता. कामत यांनी यासंदर्भातील माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांना दिली. भिसे यांनी वन विभागाला कळवून या सापाचे बचाव कार्य करण्यास सांगितले.

सावंतवाडी वन विभागाचे संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन पथक दुपारी घटनास्थळी दाखल झाले. झाडावर बसलेल्या 'किंग कोब्रा' ११.५ फुटांचा असल्याने त्याला पकडण्यासाठी तज्ज्ञ सर्पमित्रांची गरज होती. म्हणून वन विभागाने गोव्यातील 'अॅनिमल रेस्क्यू स्काॅड' पथकातील सर्पमित्रांना पाचारण केले. पथकाचे प्रमुख अमृत सिंग यांनी काळजीपूर्वक सापाचे रेस्क्यू केले. यानंतर सापाची तपासणी करुन त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडल्याची माहिती संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन पथक वनपरिक्षेत्र अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) मदन क्षिरसागर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. दोडामार्ग तालुक्यामध्ये यापूर्वी 'किंग कोब्रा' दिसल्याच्या नोंदी आहेत. 'तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्रा'मध्ये या सापाचा प्रामुख्याने अधिवास आहे. मात्र, या सापाच्या भितीपोटी त्याला मारुन टाकण्याचे प्रकार याठिकाणी घडतात.

Powered By Sangraha 9.0