हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये रामनवमी मिरवणुकीची परवानगी रद्द करण्यात आली आहे. गोशमहलचे भाजप आमदार टी राजा सिंह यांनी हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की मंगळवार, दि. १६ एप्रिल २०२४ रामनवमीच्या एक दिवस आधी, रात्री ८.३० वाजता, तेलंगणा पोलिसांनी त्यांना एक पत्र पाठवून कळवले आहे की यावर्षी रामनवमी मिरवणुकीची परवानगी रद्द केली आहे.
पत्रात १४ एप्रिलची तारीख लिहिली आहे, पण जाणून-बुजून पत्र अशीरा देण्यात आले, त्यामुळे आता पुढचे पाऊल उचलण्याला फारच कमी वेळ शिल्लक राहिला आहे, असे टी.राजा यांनी सांगितले. आमदार टी राजा सिंह म्हणाले की, अनेक वर्षांपासून आमची रामनवमी मिरवणूक भक्तीचे प्रतीक आहे, ज्यामध्ये केवळ तेलंगणातूनच नव्हे तर देशभरातून लाखो राम भक्त येत आहेत. हिंदूंच्या स्वातंत्र्यावर विनाकारण बाधा आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी अत्यंत निराशाजनक असल्याचे म्हटले.
ते म्हणाले की, केसीआर सरकारच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या काँग्रेस सरकारकडून आम्हाला अशा निर्णयाची अपेक्षा होती. 'जय श्री राम' लिहून ते पत्रही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. ही मिरवणूक आकाशपुरी हनुमान मंदिरापासून रामकोटी येथील हनुमान व्यायामशाळेपर्यंत जाणार होती.
अनिता टॉवर, पुराण ब्रिज, गांधी पुतळा, जुमरात बाजार, चुडी बाजार, बेगम बाजार छत्री, स्वस्तिक मिर्ची, सितांबर बाजार मशीद, गौलीगुडा गुरुद्वारा, कोटी महिला कॉलेज आणि सुलतान बाजार या मार्गे जाणार होते. त्यासाठी सकाळी १० ते रात्री १० अशी वेळ मागितली होती. मात्र, तेलंगणा पोलिसांनी ही मागणी फेटाळून लावली आहे.